Tuesday, May 10, 2016

कोंडमळा धनगर बांधवांनी पाण्यासाठी सोडले घरदार!

कोकणातील सह्याद्रीच्या कुशीत राहणा-या धनगर, कातकरी समाजाच्या पाचवीलाच दुष्काळ पुजलेला आहे, याचा विदारक अनुभव कोंडमळा धनगरवाडी घेत आहे. 
waterसावर्डे- विदर्भ, मराठवाडयातील दुष्काळाची नेहमीच चर्चा होते. त्यांना सरकार सर्वतोपरी मदत करते. मात्र, कोकणातील सह्याद्रीच्या कुशीत राहणा-या धनगर, कातकरी समाजाच्या पाचवीलाच दुष्काळ पुजलेला आहे, याचा विदारक अनुभव कोंडमळा धनगरवाडी घेत आहे. येथील ५० कुटुंबांना पाण्यासाठी आपले घरदार सोडून स्थलांतर करावे लागले आहे.
सावर्डे कोंडमळा येथील उघडया माळरानावर हे धनगर बांधव आपल्या पोराबाळांसह राहू लागले आहेत. मिळेल त्या पाण्यावर, प्रसंगी पाणी विकत आणून ते आपली गरज भागवत आहेत. मात्र, सरकारी यंत्रणा केवळ नियमावर बोट ठेवून या वस्तीमध्ये पाणीपुरवठा करण्यास असमर्थ ठरले आहे. त्यामुळे विस्थापित झालेल्या या धनगर बांधवांना सरकारचा टॅँकरही मिळालेला नाही, हे दुर्दैव आहे.
कोंडमळा धनगरवाडी येथील पाणीप्रश्न अनेक वर्षापासून आहे. आता येथे तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे.धनगरवाडा येथे ५० घरांची वस्ती आहे. येथील वाडीला अनारी अडरे येथून नळपाणी योजनेचे पाणी मिळत होते. मात्र, त्या योजनेचे वीजबिल न भरल्याने ही योजना बंद झाली. त्यानंतर धनगरवाडीतील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन पैसे काढले आणि बोअरवेलसाठी प्रयत्न केला.
मात्र, तो अयशस्वी ठरला. मुलांच्या शिक्षणासाठी साठवून ठेवलेले पैसे पाण्यासाठी खर्च केले. पण दुर्दैवाने ते पाण्यातच गेले. मोलमजुरी करून जगणारा धनगर समाजाचा पैसा वर्षानुवर्षे पाण्यासाठीच खर्च होत आहे. पाणीटंचाई भागवण्यासाठी चिपळुणातून ३ हजार रुपये देऊन टॅँकर मागवावा लागत आहे. तरीही महसूल प्रशासन व पंचायत समिती धनगरवासीयांच्या दुष्काळाकडे कानाडोळा करत आहे.
अनेक राजकीय पक्ष येतात, केवळ आश्वासने देतात, असा आरोप येथील समाजबांधवांनी केला आहे. येथील धनगर बांधवांना पाणीटंचाई तीव्र जाणवत असून पाण्याचा पुनर्वापर करून गरज भागवली जात आहे. येथील ग्रामस्थांनी अनेक वेळा तहसील कार्यालयात टॅँकर सुरू करावा म्हणून फेऱ्या मारल्या. परंतु त्यांची कोणीच दखल घेत नाही.
अनेक सरकारी योजना धनगरवाडीत राबवल्या गेल्या नाहीत. हागणदारीमुक्त गाव योजनादेखील गावात पोहोचल्या नाहीत. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू लागल्याने धनगर बांधव कोंडमळा, सावर्डा माळरानावर आपले कुटुंब आणि जनावरांसोबत राहात आहेत. दरवर्षी हीच वेळ त्यांच्यावर येते. मात्र, प्रशासकीय यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यांचा हा पाण्यासाठी वनवास सुरू आहे. सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या अशा अनेक धनगरवाडया अशाच परिस्थितीत जीवन जगत आहेत.
दुग्ध व्यवसायावर आणि मोलमजुरी करून धनगर बांधव जगतात. त्यामुळे पाणी त्यांच्यासाठी जीवन आहे. मात्र, आता पाणीच मिळवण्यासाठी त्यांच्यावर घर सोडण्याची वेळ आली आहे. अशाच प्रकारे अडरे, अनारी, टेरव, सावर्डे येथील धनगर वस्त्यांमध्ये विस्थापन होणार आहे. या प्रकाराची महसूल यंत्रणा दखल घेईल का? आणि त्यांना दिवसातून किमान एकदा तरी सरकारी यंत्रणेकडून पाण्याचा टँकर मिळेल का? अशी अपेक्षा येथील धनगर ग्रामस्थ करत आहेत.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home