Tuesday, August 25, 2015

मुसळधार पावसाचे तडाखे देऊन झाल्यावर आषाढ ओसरतो. अनेकदा ओला दुष्काळ, महापूर, अशा संकटातूनही जीवघेणी परीक्षा घेत आषाढ सरतो आणि श्रावण उजाडतो.
shravan‘‘आला श्रावण हो चला, बांधा झाडावर झुला
रिमझिम, रिमझिम जीव झाला वेडाखुळा!’’
असा सर्वानाच मोहून टाकणारा श्रावण! हिरव्यागार वनश्रीने नटलेला, सुगंधी फुलांनी सजलेला, अनेक उत्सवी सणांनी चैतन्यमय झालेला श्रावण! चैत्रादी मासगणनेतील पाचवा महिना. पौर्णिमेच्या आगेमागे श्रावण नक्षत्र असते म्हणून याचे नाव श्रावण.
मुसळधार पावसाचे तडाखे देऊन झाल्यावर आषाढ ओसरतो. अनेकदा ओला दुष्काळ, महापूर, अशा संकटातूनही जीवघेणी परीक्षा घेत आषाढ सरतो आणि श्रावण उजाडतो. ऊनपावसाच्या मनोहारी खेळाने श्रावण माणसांना थोडा दिलासा देतो. श्रावणात दरदिवशी काही ना काही धर्मकृत्ये असतातच.
श्रावण सोमवार म्हणजे शंकाराच्या व्रताचा वार. लोक दिवसा उपवास करून सायंकाळी तो सोडतात. शंकरावर अभिषेक, लघुरूद्र, ज्योर्तिलिंगाना भेट असे उपक्रम असतात. नवीन लग्न झालेल्या स्त्रिया शंकाराला, विविध धान्यांची शिवामूठ वाहतात. मंगळवारी देवीची पूजा, सर्व सुवासिनी सौभाग्याचं, समृद्धीचं दान मागतात. विविध खेळांनी सर्व स्त्रिया रात्र जागवतात, हा मोठा आनंदोत्सव असतो. श्रावण शुद्ध पंचमी म्हणजे नागपंचमी. नागोबाला दूध, लाहया वाहून पूजा करायची! निसर्गाचा समतोल राखणारे असे अनेक सण आपल्या धर्मशास्रत आढळतात.
पर्यावरणाचा एवढा सखोल विचार प्राचीन काळात झालेला बघून कौतुक वाटतं. शनिवारी पिंपळाची पूजा, शनीला तेल, तिळाच्या लाडूचा नैवेद्य! मुंज्या मुलाला जेवायला बोलवायचं! रविवारी आदित्याची पूजा! खिरीचा नैवेद्य! या सर्व प्रथांमागे विज्ञान आहे. आषाढातले ठप्प वातावरण हळूहळू निवळू लागते. हवेतील उष्णता वाढते. शेतामध्ये अन्नरस तयार होऊ लागतो. आषाढात रात्री जागवणारा सण एकही नसतो. पण श्रावणात गोकुळाष्टमी येते ती मध्यरात्रीच! ओल्या चा-यामुळे दुधदुभते वाढते. आहारावरचे नियंत्रण थोडे ढिले होते. गोडाधोडाचे सुगंध घराघरातून येऊ लागतात. रिमझिम पावसाबरोबरच सारे जनजीवन उत्साहित होते. वाजतगाजत येते, नारळीपौर्णिमा! किनारपट्टीवर वस्ती करणा-या बहुसंख्य लोकांना मत्स्यरुपाने अन्न पुरवणारा, व्यवसाय देणारा, जलचरांना आणि जलवाहनांना अंगाखांद्यावर सांभाळणारा समुद्र! सागरासंबंधीचे ऐन पावसाळयात बंद असलेले सर्व व्यवहार श्रावण पौर्णिमेपासून पुन्हा सुरू होणार पण त्यापूर्वी कृतज्ञताभावाने सागराची पूजा करायची. त्याला श्रीफळ अर्पण करून शांत व्हायची प्रार्थना करायची. घरातही नारळीभात करून नैवेद्य दाखवायचा.
नारळीपौर्णिमेचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे रक्षाबंधन! राखीपौर्णिमा याच दिवशी. बहिणभावाचं प्रेम राखी रुपाने व्यक्त करण्याचा, कौटुंबिक जिव्हाळयाचा हा सण. उत्तर भारतात तर रक्षाबंधन फार मोठया उत्साहात साजरे होते. भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घ्यावी याची जाणीव करून देणारा हा हृद्य सण श्रावणाचं महत्त्व वाढवतो. सुताची पोवती करून विष्णू, शिव, सूर्य यांना वाहतात आणि कुटुंबातील स्री-पुरूषही ती हातात धारण करतात. श्रावण वद्य अष्टमी म्हणजे कृष्णाष्टमी. भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस. गोकुळाष्टमी नावाने तो मोठया जल्लोषाने साजरा होतो. सप्तमीच्या रात्री श्रीकृष्णाच्या प्रतिमेची पूजा करून उपवास करतात. काही ठिकाणी गोकुळाची प्रतिकृती उभी करतात. अष्टमीला जागोजागी उंचावरती दहीहंडी उभारतात. ती फोडण्यासाठी बालगोपाळ सज्ज होतात. त्यांच्यात स्पर्धा चालतात. बक्षिसे लावली जातात.
गोविंदा आला रे आला
मटकी संभाल ब्रीजबाला
असा जल्लोष सर्वाच्या परिचयाचा आहे. उत्तर भारतात या दिवशी नंदोत्सव करतात. राधाकृष्णाला झोपाळयावर बसवून झोके देतात. गीते गातात. वाद्यगान होते. श्रीकृष्ण जीवनाचे नाटयरुप दर्शनही विविध ठिकाणी सादर केले जाते. हळद-कुंकू मिसळलेले पाणी पिचकारीने एकमेकांवर उडवतात. श्रावणातल्या प्रत्येक दिवसाला, तिथीवाराला काहीना काही महिमा चिकटलेला आहेच. श्रावण शुद्ध षष्ठी म्हणजे वर्णषष्ठी तिच्या पाठोपाठ शीतलासप्तमी. शीतलादेवीची पूजा करून दहीभाताचा नैवेद्य दाखवायचा.
नमामी शीतलादेवी रासभस्थां दिगम्बरीम्।
मार्जनी किलशोपेतां शूर्पालश्चकृत मस्त काम्।।
श्रावणी हा महत्त्वाचा विधी. वैदिक विधी. श्रावणातल्या श्रवण नक्षत्रावर करावयाचा हा विधी. होमहवनपूर्वक सर्व ब्राह्मणांसह यथाविधी नवीन यज्ञोपवीत धारण करावयाचे. त्याआधी परमेश्वराची प्रार्थना. ‘मी अध्यापन, अध्ययन केलेल्या वेदांचे शिळेपण नष्ट होऊन त्यांची वृद्धी व्हावी. अशी प्रार्थना उत्सर्जन कर्म करावयाचे. पंचगव्य प्राशन करून नदीवर गोमयस्नान, भस्मस्नान, मृत्तिकास्नान करून देहशुद्धी, चित्तशुद्धी करायची. नव्या बटूनी मेखला, जानवे, दंड, कृष्णाजिन, कटिसूत्र, वस्र् धारण करून नव्या दमाने अध्ययनाला सुरूवात करायची. असे संस्कार गुरूशिष्य सर्वानाच प्ररेणा, उत्साह ताजेपणा देतात.
श्रावण अमावास्येला पोळयाचा सण! कृषिप्रधान अशा आपल्या देशात बैलांची पूजा, त्यांना सजविणे, मिरवणुकी काढणे, पुरणपोळी खाऊ घालणे इत्यादी उपचारांनी त्यांच्यावरचे प्रेम व्यक्त करायचे. ही अमावास्या पिठोरी अमावास्या म्हणूनही ओळखली जाते. एकंदरीत संपूर्ण श्रावण महिना सण, व्रते, दानधर्म यांनी परिपूर्ण झाला आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home