दोडामार्ग शहरासोबतच संपूर्ण तालुक्याचे
आराध्यदैवत व पावसाळी पर्यटकांच्या पसंतीस उतरलेले ठिकाण म्हणजेच कसईनाथ
डोंगर. धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आलेल्या या कसईनाथ डोंगरावर
असलेला शिवलिंग तसेच पांडवाच्या वास्तव्याच्या खुणा यामुळे दर श्रावणी
सोमवारी कोल्हापूर, बेळगाव, गोवा येथील हजारो भाविक आणि या पिरॅमिडरूपी या
डोंगरावरून चहूबाजूंचे दिसणारे विलोभनीय दृष्य पाहण्यासाठी पर्यटक मोठय़ा
संख्येने गर्दी करत आहेत. येणारा सोमवार हा चालूवर्षीच्या श्रावणातील पहिला
श्रावणी सोमवार असल्याने भाविक व पर्यटकांची कसईनाथवर मोठी गर्दी उसळणार
आहे.
दोडामार्ग शहरापासून अवघ्या पाच कि.मी.
अंतरावर वसलेल्या पांडवकालीन कसईनाथ डोंगरावर श्रावणी सोमवारी भाविकांचा
मोठय़ा प्रमाणावर गर्दी वाढत आहे. तपश्चर्येस बसलेल्या ऋषिमुनीप्रमाणे व
तालुक्याच्या प्रवेशद्वारावरून एका पिरॅमिडसारखा दिसणारा डोंगर म्हणजेच
दोडामार्गचा कसईनाथ डोंगर. या डोंगरावर स्वयंभू प्रकट झालेला शिवलिंग आहे.
विशेषकरून दर श्रावणी सोमवारी या डोंगरावर भाविकांची मोठी गर्दी उसळते.
त्याच बरोबर पावसाळय़ात डोंगरमाथ्यावरून दिसणारे हिरवेगार निसर्गसौंदर्य व
दोडामार्ग शहराचे दृष्य पाहण्यासाठी पर्यटक मोठय़ा संख्येने या ठिकाणी
येतात. गेल्या तीन श्रावणी सोमवारी भाविकांची गर्दी होतीच येता सोमवार
श्रावणातील शेवटचा असल्याने कसईनाथ डोंगरावर भाविकांची अलोट गर्दी उसळणार
आहे.
दरम्यान शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी
विद्यार्थिनीसाठी कसईनाथाची सफर ही एक श्रावणातील पर्वणीच ठरत आहे.
दोडामार्ग शहरवासीयांचे आराध्यदैवत असलेल्या या कसईनाथ डोंगरावर पांडवांनी
अज्ञातवासात असताना एक रात्र वास्तव्य केल्याचे जाणकारांकडून सांगण्यात
येते तसेच पांडवांच्या वास्तव्याच्या खुणादेखील त्याठिकाणी दिसून येतात.
पांडव अज्ञातवासात असताना डोंगरावर रात्रीच्या मुक्कामासाठी आले होते.
रात्री जेवणासाठी त्यांनी ‘वाळंण’ लावली होती. ही सर्व तयारी करत असतानाच
सूर्य केव्हा उगवला हे त्यांना कळलेच नाही. सूर्य उगवताच पांडव जाण्यास
निघाले. जाता-जाता त्यांनी जेवणासाठी लावलेली ‘वाळंण’ तशीच ठेवत त्याची
राखणं करण्यासाठी नंदीला त्याठिकाणी ठेवले होते. आतादेखील या डोंगरावर
पाषाण रूपी नंदी, ‘वाळंण’ व स्वयंभू शिवलिंग तसेच इतर देवतांच्या पाषाणरूपी
मूर्ती पाहावयास मिळतात. हा डोंगर सर करतानादेखील काही अंतरावर पाषाणरूपी
देवी देवतांच्या मूर्ती आढळतात व याच ठिकाणी भाविक थोडासा विसावादेखील
घेतात.
या डोंगराची निर्मिती रामायण काळात
झाल्याचेही सांगण्यात येते. रामायणातील शेवटच्या युद्धा दरम्यान लक्ष्मण
बाण लागून बेशुद्ध पडला होता. त्यावेळी त्याच्या औषधांसाठी रामभक्त
हनुमानाने हिमालयातून द्रौनागिरी पर्वत उचलून नेला होता. हा पर्वत उचलून
नेत असताना पर्वताचा एक तुकडा पडून या डोंगराची निर्मिती झाल्याचे
सांगण्यात येते. कसेही असले तरी एखाद्या पिरॅमिडसारखा शहरापासून लगतच
डौलदारपणे उभा असलेला कसईनाथ दोडामार्ग तालुक्यातील पर्यटनस्थळात मानाचे
स्थान मिळविण्यात यशस्वी झाला आहे.
श्रावण महिन्यात आजूबाजूचा संपूर्ण परिसर
हिरवागार असतो, जसे ‘धरणी मातेने हिरवी झालरच ओढली असावी’असा भास या
डोंगरावरून पाहताना वाटते. हा डोंगर चढत असताना मधे लागणा-या धबधब्यांवर
आंघोळ करण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होतेच तसेच काही पॉइंटवरून दिसणारी
मनमोहक दृश्य पाहण्यासाठीदेखील पर्यटकांची गर्दी होत आहे. एकदा येऊन
गेलेला भाविक वा पर्यटक हा पुन्हा या ठिकाणी आलाच पाहिजे, असेच काहीसे या
कसईनाथ डोंगराचे वैशिष्टय़ आहे.
केसरकरांना स्मरणपत्र पाठवायचे काय?
आमसभेत कसई दोडामार्ग पर्यटनस्थळ
श्रावणापूर्वी सुसज्ज केले जाईल, असे चंदन गावकर यांच्या प्रश्नाला उत्तर
देताना पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले. आमसभा उलटून आता तीन महिने झाले
तरी याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. बैठक घेतली जाईल, असे सांगण्यात
आले पण त्यासाठीही त्यांना वेळ मिळाला नाही. आता त्यांना स्मरणपत्र
पाठवायचे काय? असा सवाल ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home