झुला हितगुजाचा
कधी अलगद, कधी सुसाट, तर कधी
बेभान होणारा हा झुला उंचच उंच गेल्यावर पुन्हा खाली येणारा, त्यामुळे
तारतम्यतेचं दर्शन घडविणारा हा झुला जरी आकाशात उंचच उंच गेला तरी
वास्तवाचं भान राखणारा. आकाशाला गवसणी घालणा-या मनाला पुन्हा जमिनीवर
आणणारा. असं हे झुल्याचं ते अंगणातल्या फांदीवरचं हेलकावे खाणारं रूप मात्र
काळाच्या पल्याड लुप्त झालंय. आणि मैत्रिणींच्या समवेत झुल्यासोबत साधलेलं
हितगुजही काळाबरोबरच मागे सरलंय.

सुट्टीचा दिवस म्हणजे झुल्यासोबत झोके
घेण्याचा दिवस. मैत्रिणींचा गोतावळा अंगणात जमा करून हास्याचा खळखळाट करून
आता तुझी बारी, दहा झोके तुला.. दहा मला.. म्हणत एकमेकींना झोके देत
गप्पांना आलेलं उधाण म्हणजे सागराची भरतीच. तिन्हीसांजेची दिवेलागण
होईपर्यंत हुंदडण चालूच.
मे महिन्यात पाणी टंचाई. विहिरीवरून पाणी
आणण्यासाठी वापरली जाणारी रस्सी (दोरी) सकाळी पाणी आणून झालं की ती
झुल्यासाठी वापरावी पुन्हा काढून मग सकाळी पाणी आणण्यासाठी जावं. हा
नित्यक्रम ठरलेला. झुला म्हणजे खरं तर दोन मैत्रिणींच्या जीवांची सांगड.
खरं हितगुज, मनातलं गुपित या झुल्यासोबतच वाटून घेतलेलं.
दुपारी गार वा-याच्या झुळुकेबरोबर उंचच
उंच झोके घेताना काळजाचा ठोका चुकायचा खरा तर अंतरात धडकी माजायची. पण
स्वैर वाटायचं. हास्याच्या खळखळाटाने ती मजा खरोखर अनुभवण्याजोगी असायची.
मध्ये ब्रेक म्हणजे चहाचा टाईम. मैत्रिणींच्या संगे चहा-बिस्किटाचा आनंद
यावेळी वाटून घेतला जायचा. या झुल्याच्या निमित्तानेच तर मैत्रिणी घरी
यायच्या. नाहीतर अभ्यासाची चिंता कुणालाच पडलेली नसायची.
गावात सात दिवसांचा विठ्ठलाच्या मंदिरात
सप्ताह सुरू झाला की, आमच्या शनिवार, रविवारची दुपार मंदिराच्या बाहेर
भल्या मोठा वडाचा झाडाच्या पारंब्यावर रेंगाळलेली. मंदिरात सगळ्या स्त्रिया
भजन, अभंगात, टाळ-मृदंगाच्या सुस्वर स्वरात दंग झालेल्या असताना आम्ही या
वडाच्या पारंब्यावर झुल झुल झुलायचो. मनसोक्त झोके घ्यायचो. खेळून खेळून
घामाघूम झाल्यावरही न दमता, पुढच्या दुपारीही इथेच यायचं ठरवून एकमेकींना
जणू वचन द्यायचो.
पण भजनात दंग झालेल्या आमच्या घरातल्यांची
मनं मात्र आमच्याकडेच लागलेली असायची. घरी आल्यावर मग देवळात भजनाला यायचं
सोडून तिथे वडाच्या झाडाच्या पारंब्यावर जीव गुंतवत बसायचं. आम्ही त्या
पारंब्यावर मनसोक्त झोके घ्यायचो.
‘झुला’ बांधताना आंब्याच्या मजबूत फांदीवर
रस्सी बांधण्याची आमची जागा ठरलेली असायची. त्या रस्सीचे वळ फांदीवर
उमटायचे. पण झुल्यावर झोके घ्यायची हौस काही फिटायची नाही.
आजवर झुल्याचं रूप काही कथाकारांनी आपल्या
कथांमधून उलगडलं आहे तर कवितांमधूनही या झुल्याची रुपकं उलगडली गेली आहेत.
स्त्री मनाच्या कप्प्यात झुल्याचं स्थान अगदी अबाधित आहे. स्त्री मनाची
सांगड या झुल्याशी घातली गेली आहे. अगदी एकाकी स्त्रीचं मन या झुल्यापाशी
व्यक्त होऊ शकतं. मनातल्या भावना, सुख, दु:ख हे स्त्रिया झुल्यापाशी मांडू
शकते. एखादा आनंद व्यक्त करताना या झुल्यावर झोके घेताना एखादं गाणंही
यावेळी तिच्या ओठातून गुणगुणलं जाऊ शकतं.
झुल्यासोबत रममाण होताना खरोखरंच कशाचं
भान राहत नाही. तहान भूक हरपून या झुल्यासंगे स्त्री मन एकरूप होऊन जातं.
मैत्रिणींचं हितगुज आपसुक इथे साधलं जातं. मनातलं गोड गुपित सांगताना झुला
नकळतच साक्षीदार बनून जातो. कधी झुल्यासोबत उंचच उंच झोके घेताना मन
आकाशाला गवसणी घालतं. तर गर्रकन गिरकी घेताना मनातील गूढ यावेळी उकललं
जातं.
घामाने चिंब झालेल्या मनाला गार वा-याची
झुलूक नकळतच सुखावून जाते. हिरमुसलेल्या मनाला झुल्याच्या साथीने मैत्रीचा
हिंदोळा खुद्कन हसवून जातो. मैत्री अंतरी ठसवून जातो. आंब्याच्या डहाळीवर
कारकूर होणारा झुला आंतरिक हितगुज साधत मैत्रिणींच्या मनाचा ठाव घेतो.
संवादाची परिसीमा गाठतो.
पूर्वी माहेरवाशिणी सणाच्या निमित्ताने
एकत्रित आल्या की झुल्यासंगे झोके घेत आपल्या आठवणींचे किस्से उलगडायच्या.
सुखं, दु:खं या झुल्यासोबतच वाटून घ्यायच्या. गुजगोष्टींची देवाण-घेवाण या
झुल्याच्या माध्यमातूनच व्हायची. कुणाचं सासर कसं आहे, नव-याच्या स्वभावाचं
वर्णन, सासूचा खाष्टपणा, नणंदेची गाथा आदी या झुल्याच्या माध्यमातूनच
उलगडत जाणारी तर कुणी माहेरी सासरच्या दोन्ही आठवणीत रममाण होऊन मनसोक्त
गप्पा मारताना या झुल्यातच गुंगून जाणारं.
आजवर झुला हा माहेरच्या आठवणींचा एक
हिस्सा बनून राहिला आहे. झुला म्हणजे आपल्याच माहेरचा पाहुणा. तो आपण सासरी
आणू शकत नाही. लग्नाआधी आंब्याच्या, चिकूच्या फांद्यांना बांधलेला हा झुला
आणि त्यासोबत अल्लडपणे घेतलेले उंचच उंच झोके, हे सासरी येता येताच लुप्त
होऊन जातात. आठवणींच्या रूपाने अलगद मनावर कोरले जातात. तो अल्लडपणा काहीसा
विरून जातो. मैत्रिणीच्या आठवणीही मनातल्या मनात झिरपून जातात.
‘झुला’ मनात असला तरी या झुल्यासोबतचे
क्षण मात्र ताजेतवाने करणारे ठरतात. मैत्रिणींच्या संगे घालवलेला,
हुंदडलेला काळ डोळ्यांसमोरून तरळत जातो. एकेएकीची वाट विखुरली जाते.
सासरच्या पाठवणीच्या रूपाने एक एक मैत्रीण आठवणींचे रूप बनून डोळ्यांत
सामावते.
ते अल्लड वय सरलं तरी झुला चिरतरुणच.
कधीतरी अभ्यासाची घोकंपट्टी त्या झुल्यावर बसून केल्याची जाणीव आहे. कधी
काही बिनसलं म्हणून रागानेही त्या झुल्यावर बसून स्वत:ला त्यात गुंतवून
घेतलं आहे. मैत्रिणींशी घेतलेला अबोलाही आणि त्यानंतर पुन्हा सारं सुरळीत
होऊन मनमुराद गप्पाही या झुल्यावरच बसून मारल्या आहेत.
चिंचा, बोरं खिसे भरून आणून या झुल्यासोबत
वाटून घेतली आहेत. कधी अलगद, कधी सुसाट, तर कधी बेभान होणारा हा झुला उंचच
उंच गेल्यावर पुन्हा खाली येणारा, त्यामुळे तारतम्यतेचं दर्शन घडविणारा हा
झुला जरी आकाशात उंचच उंच गेला तरी वास्तवाचं भान राखणारा. आकाशाला गवसणी
घालणा-या मनाला पुन्हा जमिनीवर आणणारा.
एप्रिल-मे महिन्यात हुंदडणा-या मनाला
झुल्याचा भक्कम आधार मिळायचा. उन्हाची तिरीप सरली की दुपारी झाडाच्या
सावलीत हा झुला सुखद जाणीव करून द्यायचा. झोके घेताना मनसोक्त मनमुराद
आठवणी सोबत घ्यायचा. पाणी टंचाई असे तोवरच आम्ही हा सारखा सोडायचो,
बांधायचो, कारण रस्सी लागायची पाणी आणण्यासाठी, पण एकदा का आकाशात विजा
चमकल्या, ढगांचा गडगडाट झाला, मुसळधार पाऊस पडला की तो झुला आंब्याच्या
त्या डहाळीवर एकटाच चिंब पावसासोबत तसाच निथळत राहायचा.. आम्हाला पुन्हा
त्याची आठवण होईपर्यंत..!
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home