Monday, August 17, 2015

|

धबधबा एकावर एक फ्री

पाऊस कोसळायला लागला की सिंधुदुर्गातील कडीकपा-यातून अवखळ धबधबे धावू लागतात. आंबोलीचा धबधबा, नांगरतासचा धबधबा, नापणे, मुटाट, मणचे, मांगेली, असनिये हे ज्ञात आणि डोंगरभागातून अजून कितीतरी अज्ञात धबधबे पावसाळयात उतू-मातू जात असतात. स्थानिक वृत्तपत्रे फोटोसहित हे धबधबे निसर्गप्रेमींपर्यंत पोहोचवत असतात. त्याबद्दल खरोखरंच त्यांच कौतुक करायला हवं. कारण डोंगरद-यात जाऊन कडयावरून कोसळणारे, फेसाळणारे हे धबधबे पाहणे आणि त्याखाली आंघोळ करणे म्हणजे स्वर्गीय आनंद म्हणजे नेमके काय हे अनुभवण्यासारखंच असतं. पण हा अनुभव एकटया-दुकटयाने घेण्यात मजा नाही. त्यासाठी हवा मित्र-मैत्रिणींचा ग्रुप. त्यातही नुसताच मैत्रिणींचा ग्रुप असला तर..? पूछो मत यार!
waterfall1
पाऊस कोसळायला लागला की सिंधुदुर्गातील कडीकपा-यातून अवखळ धबधबे धावू लागतात. आंबोलीचा धबधबा, नांगरतासचा धबधबा, नापणे, मुटाट, मणचे, मांगेली, असनिये हे ज्ञात आणि डोंगर भागातून अजून कितीतरी अज्ञात धबधबे पावसाळयात उतू-मातू जात असतात.
स्थानिक वृत्तपत्रे फोटोसहित हे धबधबे निसर्गप्रेमींपर्यंत पोहोचवत असतात. त्याबद्दल खरोखरंच त्यांच कौतुक करायला हवं. कारण डोंगरद-यात जाऊन कडयावरून कोसळणारे, फेसाळणारे हे धबधबे पाहणे आणि त्याखाली आंघोळ करणे म्हणजे स्वर्गीय आनंद म्हणजे नेमके काय हे अनुभवण्यासारखंच असतं. पण हा अनुभव एकटया-दुकटयाने घेण्यात मजा नाही. त्यासाठी हवा मित्र-मैत्रिणींचा ग्रुप. त्यातही नुसताच मैत्रिणींचा ग्रुप असला तर..? पूछो मत यार!
आम्ही इनरव्हील क्लब सावंतवाडीच्या मैत्रिणी दरवर्षी एका तरी धबधब्याला भेट द्यायची म्हणतो. त्यामुळे बरेचसे धबधबे पुन्हा पुन्हा पाहून आणि न्हाऊन झालेत. यावेळी कुणीतरी सुचवलं मुटाट धबधब्यावर जायचं. तिथे फारशी गर्दी नसते. यथेच्छ डुंबायला मिळेल. अर्थात या संदर्भातही वादविवाद होताच.
कुणी म्हणालं तिथं धबधब्याखाली डुंबायला फारस पाणीच नसतं, तर कुणी म्हणालं, पाणी इतकं जोरात असतं की त्या पाण्यात उतरताच येत नाही. शेवटी ‘हातच्या कांकणाला आरसा कशाला’ म्हणत निघालोच. तिथली दोन-तीन जुनी देवळेही पाहण्यासारखी आहेत, शिवाय विजयदुर्ग किल्लाही तिथून तसा जवळच.
आयोजनाची सारी जबाबदारी प्रसिडेंट रियाने उत्साहाने घेतली आणि सल्लागार करंदीकर वहिनी. दोघींचा छोटया-मोठया सहली आयोजनाचा अनुभव दांडगा. सकाळीच निघालो. वीस मेंबर नक्की झालेत. नेहमीप्रमाणे ऐनवेळी काहींनी कारणे पुढे करीत दगा दिला. पण उरलेल्या शिलेदारांनी इतरांची कुमक असो वा नसो धबधबा लढवायचाच अशी स्वयंप्रतिज्ञा करीत ऐसपैस गाडीत ऐसपैस बैठक मारली. निघालो. दोन अडीच तासांचा तर प्रवास. गप्पा रंगल्या. हळूहळू पर्समधल्या चॉकलेटच्या, वेफर्सच्या, बिस्कीटच्या, चिवडया-चकलीच्या पुडया फुटून गाडीच्या प्रत्येक सीटवर फिरू लागल्या.
मुटाटचा धबधबा तसा आड बाजूलाच. फारसं तिथं कुणी जात नाही. आम्ही निघालो खरं पण तो कुठे आहे, ना धड आम्हाला माहीत ना आमच्या ड्रायव्हर अतुलला. गाडी थांबवून कुणाला विचारावं तर ‘हडेन आसा आणि तडेन आसा..’ खरं तर पावसात सगळीकडेच पाणी धबधबत असतं. खेडयातील लोकांना त्यांचं काय अप्रूप! आपली शेती भली की शेतीपुरता पाऊस भला! ह्या नसत्या हौशीमौजी करायला वेळ कुणाला असतो!!
शेवटी रस्ता चुकलोच. रस्त्यावरून जाणा-या एका गृहस्थाला विचारलं, तर तो म्हणाला, ‘हे मुटाट नव्हे, तुम्ही मंच्याला आलात. पण इथे सुद्धा खूप मोठा धबधबा आहे. फारसं कुणी येत नाही पाहायला. पण सिंधुदुर्गातील हा सर्वात उंच धबधबा. शंभर फुटांवरून कोसळतो. तुम्ही बघाच तिथे एक देऊळ आहे त्याच्या मागे आहे धबधबा. देऊळ जुनं आहे. आता तिथं गाववाल्यांनी..’ गृहस्थ उत्साही.
चुकून गावांत आलेल्या टुरिस्टना किती सांगू, किती नको अशी त्याची अवस्था.. आणि आमचा वैतागलेला ड्रायव्हर हां.. हां.. हो.. हो.. करीत नीट न ऐकता त्याने गाडी दामटवली. जंगलात एका छोटयाशा देवळापाशी थांबलो, धबधब्याबद्दल विचारावं तर आजूबाजूला कुणी नाही, देवळात कुणी चुकार भाविक किंवा निदान सकाळी पुजारी असेल म्हणून चौकशीसाठी देवळात गेला तर तिथेही कुणी नाही.
कोसळणा-या पाण्याचा आवाज येत होता, म्हणजे इथेच कुठे तरी जवळपास असावा.. आमचा ड्रायव्हर शोध मोहिमेवर निघाला. आम्हीही देवळाच्या आजूबाजूला भटकतोय. तेवढयात जोराचा पाऊस आला आणि आम्ही छत्र्या बंद करून ठेवल्या. मनसोक्त भिजलो. गुमास्ते, कुलकर्णी, सडेकर, देसाई वहिनी मात्र देवळांत बसून आमची मस्ती पाहत न भिजताच भिजत होत्या. त्यांनी पचेल तेवढाच पाऊस आणि मानवेल इतकीच मस्ती करायची ठरवली होती.
बहुधा मी, रिया, मिना, उल्का, कविता, करंदीकर वहिनी जशा पाऊसच झालो होतो. आजूबाजूला कुणीही नाही. आमचा ड्रायव्हरही नाही. आम्ही आणि पाऊस, पाऊस आणि आम्ही. कौलारू देवळाच्या चारी बाजूने केवढया तरी जोराने पागोळया सांडत होत्या. घर, संसार, वय, हुद्दा अन् मुद्दा विसरून, ‘सोहंम’ झालेल्या आम्ही! चक्क ‘झुकुझुकु आगीन गाडी’.. करत एकमेकांचे खांदे पकडत देवळाभोवती पागोळयाखालून धावलो.
कल्पना करा, चाळिशी, पन्नाशी, सत्तरीच्या कुणी आम्ही धो-धो पावसात ‘झुकुझुकु आगीन गाडी खेळतोय..’ भल्याभल्यांना वेड लावायची ताकद निसर्गात असते ती अशी! या सगळया ‘आनंदी आनंद गडे..’मध्ये आमच्या ड्रायव्हरने धबधबा सापडल्याची सुवार्ता देऊन आमच्या आनंदाचा अगदी कडेलोट केला होता.
खरं म्हणजे आम्ही गाडी करून निघालो होतो, मुटाटचा धबधबा पाहायला आणि पोहोचलो ‘मंचा’च्या धबधब्यापाशी जो आमच्या ध्यानीमनीही नव्हता. जसा काही हा एकावर एक फ्री धबधबा मिळाला आम्हाला. तेव्हा त्याचं अप्रुप होतंच. अडचणीतून वळचणीतून झाडीतून आवाजाच्या रोखाने निघालो. आणि तो दिसला! त्याने जिंकलं! केवढा मोठा निसर्गाचा हा खजिना झाडामाडात लपलाय! वा-यावर लांबवर येणा-या त्याच्या तुषाराने सांगावा आणला. पण त्याच्या मुळाशी जाणं सोपं नव्हतं. नाही म्हणायला थोडीशी वाट सिमेंट-दगडांनी तयार केली होती. पण त्यावरही शेवाळ दाटलं होतं.
पण धबधबा पाहून अंगात वारं शिरलेली मी त्या निसरडया दगडावरून घसरत, उठत बसत ‘इंच इंच लढवू’च्या आवेशात धबधब्याच्या दिशेने निघाले. ग्रुप मागे पडला. उडणारे तुषार नाका-तोंडाला गुदगुदल्या करताहेत, कोसळणा-या पाण्याच्या आणि भणाणणा-या वा-याच्या आवाजात त्यांचं बोलणं, हसणं कानाच्या पलीकडे जात चाललेलं. पण तेवढयात एकच गिल्ला. ‘थांब.. थांब.. पुढे जावू नकोस, ही बघ उल्का पडली.. उल्का पडली.. आम्ही मागे फिरतोय..’’ मागे वळून पाहिलं तर उल्का थरथरत उभी. तिने ब-यापैकी गटांगळया खाल्ल्या होत्या.
हातापायाला लागलं होतं. तिला पाहून आता माझेही पाय कापायला लागलेत. मी बरीच धबधब्यापाशी पोहोचले होते. आता पंधरा-वीस फुटांवर धबधबा. पण मला मागे बोलावण्याचा रेटा इतका वाढला की हातातोंडाशी आलेला धबधबा सोडून मी मागे फिरले. त्या निसरडयातून मागे फिरणं आणखीनच कठीण. धोपटत घसरत झाडांच्या काटक्या, खडकाची टोकं पकडत मी कशी तरी आले खाली.
आपल्या जिल्ह्यात कितीतरी असे नैसर्गिक खजिने डोंगरद-यात लपले आहेत. अलौकिक आनंदाचे हे ठेवे! भरभरून आनंद लुटावा असे. पण असा हा आनंद लुटायला त्यांच्यापर्यंत पोहोचता तर आलं पाहिजे! नुसतच ‘येवा कोकण तुमचाच आसा..’ म्हणून कसं चालेल.. ‘या’ म्हणताना तिथवर पोहोचायला आवश्यक सुविधा तर पाहिजेत! पण हे करायचं कुणी..? इथंच तर घोडं पेंड खातंय!! असो!
धबधब्यापाशी पोहोचायची इच्छा तर अपुरीच राहिली. दुरूनच दर्शन झालं. धबधब्याखाली नाही निदान धबधब्याच्या खाली वाहत आलेल्या पाण्यात तरी आंघोळ करायची म्हणून वहाळासारख्या वाहणा-या त्या गार गार पाण्यात शिरलो. मला पोहता येतं या पूंजीवर बिनधास्त पाण्याच्या धावत्या धारेत शिरण्याचं माझं धाडस आणि जशी काही मी आता त्या धारेला लागून वाहून जाणारच अशा खात्रीने मैत्रिणींचा आरडाओरडा. अर्धा तास डुंबलो.
एव्हाना दुपार होत आलेली. पण पावसाळी वातावरण असं की सकाळचे सहा वाजलेत असं वाटावं. पण पोट दुपार होत आल्याचं सांगत होतं. आणि आमची जेवायची सोय तर मुटाटला एका घरगुती खानावळीत केली होती. तेव्हा तिथं जाणं क्रमप्राप्त होतं. पण ह्या नाही तरी मुटाटच्या धबधब्याखाली आंघोळ करायचीच ठरवून ओल्यात्या अंगाने अन् निथळत्या कपडयाने आम्ही गाडीत चढलो. सिट्स भिजू नयेत म्हणून उभ्याच राहिलोत. मुटाट तसं मंचापासून अगदी जवळ. पोहोचलोत आमच्या इच्छीत धबधब्यापाशी. बाप रे! धबधब्याचे ते अक्राळ विक्राळ रूप!! तोबा! तोबा!!
सकाळपासून धो-धो कोसळणा-या पावसाचा लोंढा त्या धबधब्याच्या रूपाने खडकांना टक्कर देत उसळत फुसांडत धावत होता. त्याचं लाल पाणी खालच्या दरीत कोसळत होतं. त्या प्रवाहात हत्ती शिरला असता तरी मुंगीसारखा पाण्याबरोबर उडाला असता. तिथं आमची त्याच्या आजूबाजूलाही जायची काय प्रज्ञा. नुसतच काठाशी कुडकुडत उभं राहून धबधब्याचे ते रौद्र तांडव नृत्य पाहत होतो. जशी काही एक मोठी पांढरीशुभ्र सुनामी लाट आदळत खिदळत अंगावर धाऊन येतेय, असं वाटत होतं.
न राहून मी जरा पुढे सरकले. काठावरून त्या धावत्या पाण्याला नुसता स्पर्श करावा वाटलं. पण पाण्याची अजिबात भीती नसलेली मी प्रवाहात शिरायचा आगाऊपणा करीन म्हणून मीना, रियाने मला पकडूनच ठेवलं. मी पुढे गेले तर प्रवाहात सापडून माझे कसे बारीक तुकडेच नव्हे तर खीमा होणार इथपासून, आम्हाला सावंतवाडीत परतून लगेच तुझी शोकसभा घ्यावी लागणार, दरवर्षी तुझ्या स्मृतिप्रीत्यर्थ तुझ्या घरच्यांच्या खर्चाने कसे कविसंमेलन घ्यावं लागणार, इथपर्यंत उपस्थित सर्व भगिनींचा उत्स्फूर्त परिसंवाद रंगला आणि मी जित्याजागतेपणी तो अनुभवला.
साहजिकच त्या धबधब्यात भिजण्याची इच्छा करकच्चून बांधून ठेऊन आम्ही त्या छोटयाशा पुलावरून समोरच्या देवळात देवदर्शनाला निघालो. एवीतेवी भिजलोच होतो आणि ओल्यात्या अंगाने देवदर्शन घेतलं. तर अधिक फलदायी होतं! त्यामुळे आधी दर्शन आणि मग ओले कडपे बदलाचे ठरवून आम्ही पूल पार करायला निघालो. तर त्या तेवढया वाटेतही निसरडं.
मघापासून दगड धोंडयात सावरलेल्या मी, तिथं मात्र देवळासमोरच पाय घसरून सपशेल लोटांगण घातले आणि पुढे पुढे करणा-या मला समोरच्या देवानेच अद्दल घडवली. अशा दोन समजुतीने माझ्या सख्या मनापासून खिदळल्या. हायहुय करीत थोडं नाराजीनेच देवाकडे पाहिले. ती एक मोठी सुरेख शंकराची पिंडी होती. दरवाजा बंद होता. त्यावर लिहिलं होतं ‘स्त्रीयांनी आत येऊ नये’ ब-याच देवळात असा बोर्ड वाचायला मिळतो. काय पाप केलंय बापडया स्त्रियांनी? ‘आम्ही सारी तुझी लेकुरे’ म्हणताना हा भेदभाव का? आता मनू नाही तरी मनूचे वारस असे अजूनही इथे तिथे भेटतात. असो. देऊळ मात्र छान होतं.
तिथं शांतपणे बसून धबधब्याचं ते संगीत ऐकत बसावं! धावत येऊन दरीत उडी मारणारं पाणी डोळय़ांत साठवून घ्यावं! तोही अनुभव थोडा वेळ घेऊन बाजूच्या शेडमध्ये कपडे बदलायला गेलो. दरम्यान अर्धा तास गेला असेल आणि अहो आश्चर्यम्!! मघा चवताळलेला धबधबा आता शांत होत आला होता. त्यातून धावणारं पाणी अध्र्याहून कमी झालेलं. चक्क पाण्याखालचा काळा कातळ दिसत होता. किती छान! मघाशी जवळपासही फिरकू न देणारा धबधबा आता त्यातून आरपार चालत जावं असा. हवं तर मस्त बसून खेळत पाणी अंगावर घ्यावं. अध्र्या तासात हा इतका बदल! कमालच!! बराच वेळ पाऊस थांबला होता. पाण्याचा लोंढा कमी झाला होता अर्थातच धबधब्यानेही बालरूप घेतलं होतं. एकूणच हा धबधब्याचा मूड पावसावर अवलंबून असतो तर! पण आता काही उपयोग नव्हता. पुन्हा कपडे बदलून धबधब्यात शिरण्याइतकं त्राण नव्हते. भूक पोटात तणतणत होती. तेव्हा आधी पोटपूजा.
टीपटॉप घाटे काकू आमच्या स्वागताला पुढे आल्या. घराच्या पुढच्या पडवीवर भला मोठा झोपाळा. एकावेळी पाच-सहा माणसं मागे-पुढे बसतील असा. अंगणात इतर फुलझाडांसोबत कळयाफुलांनी बहरलेले दुर्मीळ ब्रह्मकमळाचे झाड. सगळया त्या झोपाळयावर झेपावल्याच. आत जेवणं वाढायची तयारी. अगदी पाहुण्यांकडे जाऊन घरगुती चविष्ठ जेवण जेवावं असं मस्त(आणि स्वस्तपण) गरम गरम जेवण. आग्रहाने हवं नको वाढणं. आम्हा बायकांच्या नशिबी असं कुणीतरी आग्रहाने वाढलं जाणारं आयतं जेवण म्हणजे पर्वणीच की!
जेवण झाल्यावर सुस्ती आली होती. पण ३०-३२ किमी. वर विजयदुर्ग किल्ला साद घालत होता. भरल्या पोटाने तृप्त मनाने ‘अन्नदाता सुखीभव’ म्हणत निघालो. अंधारण्याआधी निघायचं होतं. पावसाने आता शहाण्यासारखं आम्हाला छत्रीशिवाय मोकळं सोडलं होतं. चक्क ढगांना बाजूला सारून सूर्य डोकावत होता. मुटाटचा तो धबधबा (त्यांच्यावर फ्री मिळालेला) अनपेक्षित सापडलेल्या मंचेचा धबधबा, पाऊसधारा! गार गार वारा!! एकूणच खूप न्यारा गेला तो दिवस!!

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home