Friday, October 23, 2020

नमस्कार मी सुवर्णा मिलिंद वैद्य (रा.रीळ रत्नागिरी) पूर्वाश्रमीची सुवर्णा विश्वास गोड बोले( रा. जंगली महाराज रोड पुणे )लौकीक अर्थाने पुणे ते रीळ हा साडेतीनशे किलोमीटर चा

श्रीराम
          नमस्कार मी सुवर्णा मिलिंद वैद्य (रा.रीळ रत्नागिरी) पूर्वाश्रमीची सुवर्णा विश्वास गोड बोले( रा. जंगली महाराज रोड पुणे )लौकीक अर्थाने पुणे ते रीळ हा साडेतीनशे किलोमीटर चा वळणावळणांचा आणि चढ-उतारांचा प्रवास हा माझ्यासाठी मोठा जीवन परिवर्तनाचा प्रवास होता पुण्यातल्या टिपिकल मध्यमवर्गीय सुखवस्तू कुटुंबात माझा जन्म झाला लहानपणापासून मला अभ्यासाची आवड असल्याने पुस्तकातला किडा असे सर्वजण चिडवायचे शाळेतला पहिला नंबर कॉलेजमध्येही कायम राहिला दहावीच्या परीक्षेत बोर्डात येण्याचं माझं स्वप्न थोडक्यात चुकले ते मी बारावीला बोर्डात सातवी येऊन पूर्ण केलं आणि माझ्या गुरूंमुळे राज्यशास्त्र या विषयात महाराष्ट्रात प्रथम येण्याचा बहुमान  मला मिळाला  तत्वज्ञान विषयात पीएचडी करण्याची इच्छा होती पण त्याच सुमारास माननीय डॉक्टर अविनाश धर्माधिकारी यांच्या विचारांच्या प्रभावाखाली येऊन मी प्रशासकीय सेवेसाठी अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा अभ्यास सुरू केला सुदैवाने पहिला प्रयत्नात मी एमपीएससीची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाले आणि मेंन्स ची तयारी करत असतानाच नेहमीप्रमाणे माझ्या आयुष्यात अचानक वेगळेच वळण आले
           आम्ही मे महिन्याच्या सुट्टीत फिरायला म्हणून माझ्या मैत्रिणीकडे सुमेधाकडे कोकणातल्या गणपती पुण्याजवळच्या रीळ या गावी आलो तेथील निसर्गसंपन्न वातावरण मला खूप आवडले समुद्रकिनारी माडपोफळीच्या आणि हिरव्यागर्द झाडीच्या कुशीतले इवलेसे रीळ गाव आणि तिथली  कष्टाळू माणसं त्यांची साधी राहणी मला खूपच आवडली तिथल्या मुक्कामात  सुमेधाने त्याच गावातील  मिलिंद वैद्य यांच्याशी आमचा परिचय करून दिला ज्यांनी अत्यंत गरीब  परिस्थितीतून जिद्दीने आणि चिकाटीने  आपले पदव्युत्तरशिक्षण पूर्ण केले घरात वैद्य परंपरेचा वारसा असल्याने त्यांनाही डॉक्टर बनण्याची खूप इच्छा होती परंतु परिस्थिती अभावी कमवा आणि शिकवा हे तत्त्व खऱ्या अर्थाने जगून त्यांनी आपले एम ए चे शिक्षण पूर्ण केले आणि नॅचरोपॅथी चा डिप्लोमा केला हा त्यांचा सर्व जीवन प्रवास आम्हा पुणेकरांना फारच आदर्शवत होता 
 रिक्षा किंवा बसशिवाय कधीही न फिरलेले आम्ही एक मुलगा शिक्षणासाठी कोणतीही मूलभूत सुविधा नसलेल्या दुर्गम खेडेगावात राहून रोज दहा किलोमीटरवरील मालगुंड गावा पर्यंत चालत जातो आणि चालतपरत येऊन आपले घर ,शेती उत्तम सांभाळतो हे सर्व आमच्या कल्पनेच्या पलीकडचे होते  खरं म्हणायचं तर डोळ्यात अंजन घालणारे होते कमी गरजा आणि साधन सुविधा नसूनही ही माणसं सुखी कशी हा प्रश्न मनात ठेवून आम्ही पुण्याला आलो आणि लगेच काही दिवसात हे वैद्यांचे स्थळ आम्हाला सुचवले गेले 'मी  आणि कोकणात अशक्य 'या मताशी  ठाम असल्याने तात्काळ नकार दिला पण लग्नाच्या गाठी यावरती जुळलेल्या असतात या उक्तीप्रमाणे एकदा भेटून तरी बघ या घरच्यांच्या  आग्रहामुळे मी मिलींदची चाळीस प्रश्नांची प्रदीर्घ मुलाखत घेतली होती हे आज आठवले की हसू येते त्यात मला त्यांचा कष्टाळू, जिद्दी स्वभाव आणि जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन खूप भावला आपल्या भावी जोडीदारामधेजे गुण मला हवे होते ते मला त्यांच्या मधे  दिसले 
 थोड्याशा असुविधेने तळमळणारे आम्ही शहरी लोक आणि  दुर्गम अशा खेडेगावात कोणतीही मूलभूत सुविधा नसतानाही स्वतःची रडकथा न सांगता अत्यंत आशावादी पद्धतीने जीवनमान बदलण्यासाठी धडपडणारी मिलिंद सारखी माणसं हे विरोधाभासी चित्र मनाला चटका लावून गेले त्यानंतर बरेच विचार मंथन, चर्चा,आदरणीय स्वामीजींचे मार्गदर्शन यानंतर खूप विचार करून मी लग्नाला होकार दिला पण माझा हा माझा होकार आमच्या पुण्यातल्या बऱ्याच नातेवाईकांसाठी मानसिक धक्का होता अगदी माझ्याआत्यानेही त्यामुळे आमच्याशी अबोला धरला होता अशा अनेक गमतीजमती घडत आमचे लग्न पार पडले
       लग्नानंतरचे पहिले काही महिने तर माझ्यासाठी परीक्षेचा काळ होता घरापर्यंत जायला रस्ता नाही गुडघाभर पाण्यातून नदीओलांडायची नाही तर साकवावरून जीव मुठीत धरून जाण्याशिवाय पर्याय नव्हता.धो धो पावसाळा ,अवती भोवती फिरणारे असंख्य जीवजिवाणू ,जंगली श्वापदे ,काळोख ,क्वचित असणारे लाईट यामुळे मी अक्षरशः अनेकदा रडवेली  व्हायचे त्यावेळी जर मला मिलिंदनी भक्कम साथ दिली नसतीआणि माझी तिथली भिती घालवली  नसती तर मी पुण्यालाच पळाले असते नंतर हळूहळू मला या सर्वांतली मजा अनुभवायला येऊ लागली शेती फक्त सिझनल व्यवसाय नाही तर यात किती वैविध्य, नवनवीन आव्हाने आणि नवे प्रयोग यांना वाव आहे हे मला कळायला लागले आणि मी या अनोळखी दुनियेत कधी सरावले ते माझे मलाच कळले नाही अगदी चूल पेटवणे, सारवण करणे, दूध काढणे यापासून आंबा सोरटींग पर्यंत असंख्य कामांची यादी, त्यातले वैविध्य व त्यातली वेगवेगळी कौशल्ये यामुळे कामाचा कधी कंटाळा आला नाही उलट कामात मजा वाटायला लागली
        आमची तोट्यातील शेती फायद्यात आणण्यासाठी काही वेगळा प्रयोग करायला हवा अशी आमची दोघांची इच्छा होती त्यासाठी आम्ही आमच्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करायचे ठरवले पारंपारिक शेतीमधे मिलिंदनी हळूहळू बदल करायला सुरवात केली होतीच ट्रॅक्टर घेतला, गांडूळ खत प्लान्ट सुरू केला ,गोबर गॅस आणि त्यातील स्लरीचा शेतीसाठी वापर, जैविक शेतीसाठी कंपोस्ट खड्डा ,जमिनीची प्रत सुधारण्यासाठी जीवामृताचा वापर, नवनवीन बियाण्यांचा वापर, विविध प्रकारच्या लावणी च्या पद्धती जसे श्री पद्धत, जपानी पद्धत ,एक काडी ,एस आर टी अशा अनेक पद्धतींचा प्रयोग केला त्यामुळे अभ्यासपूर्ण शेती करता आली त्यातून आमचे भाताचे उत्पादन  तिप्पटीने वाढले हे बघून एकदा सहजच शिवार फेरीला  आलेल्या कृषी अधिकाऱ्यांना आमची शेती आवडली आणि त्यांनी भात पीक स्पर्धेसाठी आमचा प्लॉट निवडला त्याच वर्षी आम्हाला भात पीक स्पर्धेत तालुका जिल्हा आणि राज्य या तिन्ही पातळीवर सलग तीन वर्षे पहिला क्रमांक मिळाला त्यामुळे आम्हाला अनेक वृत्तपत्रे आणि मासिके यात प्रसिद्धी मिळाली यानंतर एस आर टी पद्धतीचे तांदळाचे सर्वाधिक उत्पादन घेण्यात आमचा जगात दुसरा क्रमांक आला पहिला क्रमांक मिळवलेल्या चीनच्या शेतकऱ्याचे तांदळाचे उत्पादन १९.४० क्विंटल पर हेक्टर आणि आमचं १९.२४ क्विंटल पर हेक्‍टर असे आले आणि  थोडक्यात आमचा पहिला क्रमांक गेला याची आम्हाला खूप हुरहुर लागली पण यामुळे आमचं नाव सर्वदूर झाले आम्हाला खूप प्रसिद्धी मिळाली ,अनेक चांगले पुरस्कार , मानमरातब मिळाले या सर्वांमुळे अधिक चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळाली
यानंतर  आम्ही सेंद्रिय शेती चा प्रयोग केला, देशी गायीचे संगोपन, अझोला निर्मिती, कातळावर चिरेखाणी चे शेततळ करून आंबा झाड लागवड ,ड्रिप इरिगेशन चा वापर ,गावठी बियाण्यांचे संवर्धन असे विविध प्रयोग करायला सुरुवात केली कोकणात भात पिकानंतर जमिनी ओसाड ठेवतात पण आम्ही त्यात सूर्यफूल ,भुईमूग, मका , मूग ,नाचणी कुळीथ, उडीद ,चवळी, अनेक वेगवेगळ्या भाज्या अशी विविध पिके पीकफेरपालट पद्धतीने घेतो त्यामुळे जमिनीचा पोत सुधारून सुपीकता वाढली आम्ही धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो आणि आम्हाला घरी वर्षभर पुरेल एवढे घरचे धान्य, घरच्या भाज्या, घरचे तेल हे सर्व करण्यातली आणि खाण्यातली मजा काही औरच असते नाही का ?
            या सर्वप्रयत्नांचे चीज म्हणून मिलिंद ला जिल्हा पातळीवरचा आदर्श शेतकरी पुरस्कार आणि राज्य पातळीवरचा शेतीनिष्ठ शेतकरी हा पुरस्कार मिळाला त्यामुळे आमच्या कामाची प्रसिद्धी सर्वत्र झाली अनेक वृत्तपत्रे, मासिकातून आमचे लेख छापून आले पण हे सर्व चालू असताना आमचा देशभरातील अनेक शेतकऱ्यांशी संपर्क आला देशाच्या एका कोपऱ्यात राहून छोट्याशा खेडेगावातून अशिक्षित असलेले अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये जे नवनवीन प्रयोग करत होते त्याची माहिती ते स्वतः जेव्हा आम्हाला सांगत तेव्हा आमचे हवेत जाणारे पाय जमिनीवर यायला खूप मदत झाली आपल्यापेक्षाही प्रतिकूल परिस्थितीत राहूनही संकटांवर मात करून शेतीत अभिनव प्रयोग करणारी ही सर्व सुज्ञ शेतकरी माणसे आम्हाला खूपच आदरणीय वाटतात त्यामुळे आम्ही त्यांचा आदर्श घेऊन आजही नवीन नवीन प्रयोग करण्यासाठी  नवी उमेद घेऊन प्रयत्न करत असतो
शेती महासागरआहे त्यात प्रयोग करायला जेवढा वाव आहे तेवढा दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात नाही असं माझं मत आहे  आम्ही जे करतोय ते म्हणजे समुद्रातून तांब्याभर पाणी काढण्यासारखे आहे.आम्हाला अजून बरेच काही काम करायचं आहे सध्या आम्ही भाताच्या पारंपारिक जातींचे संवर्धन करण्याचं काम करत आहोत त्यातली एक जात म्हणजे लाल कुडा म्हणजे लाल तांदळाची जात आणि बासमती सारखा सुगंध असलेली सुगंधा ही देशी वाणाची जात विकसित करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आंब्यांच्या ही विविध जाती चा अभ्यास करून अमृत पायरी हे पायरीच्या मोठ्या आणि अत्यंत गोड फळाची नवीन जात तयार करण्याचं काम चालू आहे
       आजही आपल्याला असं चित्र दिसतं की शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही परंतु जर आपला माल दर्जेदार असेल तर बाजारात आपल्या मालाला नक्की चांगला भाव मिळतो याची आम्हाला प्रचिती आली आहे.आमच्या सर्व धान्य ,भाज्या, आंबे यांना चांगली मागणी असते त्यामुळे आमचा ते पिकवण्याचा उत्साहही वाढतो पुणे आणि मुंबई येथे आम्ही हा सर्व शेतमाल योग्य दरामध्ये विकतो आम्हाला अजून बराच मोठा टप्पा गाठायचा आहे हे सर्व करताना आम्हाला सर्व काही अत्यंत सुरळीत पणे मिळालं असं अजिबात नाही अनेकदा संकटे आली निराशेचे प्रसंग आले पण आम्ही आमचं काम चालू ठेवण्याचा निर्धार केला आहे
पूर्वी पासून उत्तम व्यापार आणि कनिष्ठ शेती असं तत्व होतं पण आज करोनाच्या काळामध्ये शेती हे सर्वोत्तम उत्पन्नाचे साधन आहे हा विचार अधोरेखित झाला आहे आज मुंबईत नोकरी गेल्याने परतआलेल्या दहा जणांना आम्ही आमच्या शेतीत सहभागी करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सक्षम बनवले आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे
        आज बऱ्याचदा शेतकरी म्हटलं की आकाशाकडे डोळे लावलेला, भेगाळ जमीनीकडे बघणारा , आत्महत्या करणारा असे निराशावादी चित्र डोळ्यासमोर येते परंतु प्रत्यक्षात शेती हा खूप व्यापक आणि समृद्ध व्यवसाय आहे. शेती नक्कीच फायद्याची आहे परंतु त्यासाठी उत्तम काटेकोर नियोजन, भविष्यातील संधी ची उपलब्धता याचाअभ्यास करण्याची अत्यंत गरज आहे तरच शेती फायद्यात आहे असे म्हणता येईल. ज्याला काही जमत नाही तो नाईलाज म्हणून शेती करतो हे चित्र आजच्या तरुण पिढीने बदलण्याची खूप गरज आहे असे मला वाटते कारण या क्षेत्रामध्ये काम करण्याची व्यापक संधी ,अभ्यास पूर्ण नियोजन करून सहज यशस्वी करून दाखवता येईल यात काही शंका नाही शेतीकडे एक व्यवसाय म्हणून आपण बघत नाही तोवर आपली मानसिकता बदलणं खूप कठीण आहे परंतु  सध्या थोडे आशावादी चित्र समोर यायला लागले आहे अनेक सुशिक्षित तरुण तरुणी या  क्षेत्रामध्ये अभ्यास पूर्ण पाऊल टाकून नवनवीन प्रयोग करताना दिसत आहे हीआपल्या देशासाठी खरोखरच खूप आनंदाची गोष्ट आहे आपणही आपापल्या परीने या सर्वांना मदत केली पाहिजे आणि प्रोत्साहन दिले पाहिजे तरच येत्या काही काळात आपल्याला अनेक आदर्श शेतकरी खेडोपाडी आनंदाने काम करताना दिसतील यात काहीच शंका नाही
आणि शेवटी मी एवढंच सांगेन की....  

मी एक शेतकरी आहे याचा मला खूप अभिमान आहे.

           जय हिंद जय महाराष्ट्र 🙏
_______________________________________
Whtsappfrwrd

फोटो सौजन्य : ईसकाळ

Sunday, October 18, 2020

निसर्गोत्सव

लोकमतच्या मंथन या रविवार पुरवणीत 'सह्याद्रीचं सौंदर्य' या लेखमालेत आज प्रसिद्ध झालेला माझा लेख. 

*निसर्गोत्सव!*
 
'राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा... अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा...'  असं गोविंदाग्रजांनी महाराष्ट्र भूमीचं सार्थ वर्णन केलंय. वैशिष्ट्यपूर्ण भूगोलासोबत या भूमीला अभिजात निसर्गसौंदर्य लाभलंय. आकाशाला गवसणी घालणारे सह्याद्रीचे उत्तुंग पर्वतमाथे, डोंगर-सुळके, उरात धडकी भरविणाऱ्या खोल-खोल दऱ्या, उभे तुटलेले कडे आणि भल्या मोठाल्या कपारी... जैववैविध्यानं नटलेली समृद्ध वनसंपदा, ऋतूमानाप्रमाणं आगळंवेगळं रंग-रूप धारण करणारा निसर्ग... वर्षा ऋतूत सह्यगिरीच्या कुशीत थबथबणारा अनोखा जलोत्सव! पावसाळा संपतो न संपतो तोच सह्याद्रीच्या पठारांवर, डोंगर उतारांवर बहरतो तो नयनरम्य पुष्पोत्सव... अनेकविध रंग, रूप, आकार घेऊन इवलाली नाजूक रानफुलं भेटीला येतात. रानफुलांचा भारून टाकणारा रानगंध निसर्गप्रेमींच्या मनाला मोहिनी घालतो. सात वर्षांनी एकदा फुलणारी कारवी असो ऋतुराज वसंतातला मोहमयी फुलोत्सव. नभांगणातील तारांगणच जणू भुईवर उतरल्याचा आभास निर्माण करणारा काजव्यांचा प्रकाशोत्सव असो की डोळ्यांना सुखावणारे सूर्योदय-सूर्यास्ताचे देखणे देखावे... ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे...’ असं इथलं निसर्गचित्र. सगळेच निसर्ग विभ्रम विशेष नवलाईचे!  

*जलोत्सव*

तळकोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून पाऊस घाटाच्या दिशेनं सरकायला लागतो तसा येथला निसर्ग चैतन्यानं मोहरतो. लहान मोठी शिखरे, डोंगरमाथे जलरंगांच्या छटांमध्ये न्हाऊन निघतात. माहेराला आल्यागत मोसमी पाऊस येथे रमतो. अवघ्या सृष्टीशी त्याचं गुज सुरु होतं. चैतन्याचा दाता असलेल्या पावसाच्या आगमनानं बघता-बघता सृष्टीचे रुपडंच बदलून जातं. चिंब पावसानं रान आबादानी होतं. चित्तवृत्ती प्रसन्न करणारी चैतन्याची सळसळ सगळीकडे जाणवू लागते. टपोऱ्या थेंबांनी ओघळणारा पाऊस,  पर्वत-शिखरांवरून झेपावणारे सहस्रावधी जलधारांचे चंदेरी प्रपात, उताराच्या दिशेनं खळाळत, डोंगरदऱ्यांत उड्या घेत वाहात जाणारे ओढ्या-नाल्यांचे अगणित प्रवाह, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, लालसर विटकरी पाण्यानं तुडुंब भरलेली भातखाचरं, पर्वत-शिखरांच्या कानात कुजबुजणारं धुकं, सैरावैरा धावणारा उनाड रानवारा आणि जोडीला मस्त गारवा... पठारांवर दाटीवाटीनं उगवलेलं हिरवं-पोपटी गवत, निसर्गशिल्पांचं देखणं कोंदण लाभलेल्या सह्यगिरीच्या कुशीत असं अनोखं निसर्गचित्र अवतीर्ण होतं. इथल्या पावसाला मुळातच नाद आहे. लय, सूर आणि ताल आहे. म्हणूनच त्याचं येणं अनेकांच्या दृष्टीने आनंदाचं गाणं होऊन जातं. त्याच्या तो आला की, येथे जलोत्सव सुरु होतो. खपाटीला गेलेल्या जलाशयांची पोटं भरू लागतात. ‘हिरवा निसर्ग हा भोवतीने, जीवन सफर करा मस्तीने...’ असे म्हणत जलोत्सव पाहायला, झिम्माड सरीत भिजायला घाटघर-भंडारदरा परिसरात केवढी झुंबड उडते. नाशिक-मुंबई-पुणे येथील पर्यटक कुटुंबकबिल्यासह बाहेर पडतात, तेच मुळी जलोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी. मुत्खेल, रतनवाडी, साम्रद, घाटघर, उडदावणे, पांजरे, मुरशेत अशी भंडारदरा धरणाच्या काठाकाठानं गोल चक्कर मारत पाऊस अंगावर घेत, धबधब्यांखाली चिंब व्हायचं आणि गडकिल्ल्याच्या माचीवरून सह्याद्रीच्या कुशीत निवांत पहुडलेल्या टुमदार गावांची छानदार नक्षी बघत स्वतःला हरवून द्यायचं, असा जणू रिवाजच पडलाय. गुरुत्वाकर्षणाला धुडकावत वाऱ्याबरोबर हवेत उडणाऱ्या तुषारांमुळे दिसणारा साम्रद येथील आगळावेगळा 'रिवर्स फॉल' आणि प्रवरा नदीवरील रंधा धबधबा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानंतर अंब्रेला फॉल अवतीर्ण होतो. हा धबधबा म्हणजे म्हणजे इथल्या लोभस निसर्गसौंदर्याचा मानबिंदू. कुलंग, मदन आणि अलंग हे कुर्रेबाज दुर्गत्रिकूट आणि त्याला बिलगून असलेली शिखरस्वामिनी कळसुबाई, रतनगड, पाबरगड अशा उंचच उंच पर्वतशिखरांच्या मधात भंडारदरा धरणाचा जलाशय विसावलाय. इथल्या श्रावणाचा गर्भरेशमी हिरवा रंग ताजा ताजा असतो. तेव्हाच इंद्रधनुची कमान क्षितिजावर उमटते. सप्तरंगात सारी सृष्टी न्हावून निघते. हिरवे हिरवे गालिचे बघितले की, बालकवींच्या कवितेची ओळी मनात घोळत राहतात.
 
*फुलोत्सव*

जैववैविध्यानं नटलेल्या हरिश्चंद्रगड-भंडारदरा-कळसूबाई परिसराची आणखी एक ओळख पुढे येतेय, ती येथील रानफुलांच्या पुष्पोत्सवामुळे! पावसाळा  संपतो न् संपतो तोच येथे फुलोत्सव सुरू होतो. फुलांची ही दुनिया अदभूत असते. किती किती फुले? त्यांच्या तऱ्हाही तितक्याच. रंग, रूप, गंध, आकार, रचना. प्रत्येकाचं आपलं निराळं वैशिष्ट्य. काही रात्री फुलतात, तर काही दिवसा. काही सुवासिक तर काही वासहीन. काही औषधी गुणधर्म असलेली तर काही चक्क कीटकभक्षी! पिवळीधमक सोनकी येते आणि आठ-पंधरा दिवस आपल्याच मस्तीत रंग उधळत राहते. हिमालयाच्या खालोखाल देशभरात सह्य पर्वताची ख्याती आहे. रानफुलांबाबत कळसुबाई-हरिश्चंद्रगडपासून कासच्या पठारापर्यंतचा परिसर जगभरातल्या १८ महत्त्वाच्या ठिकाणांपैकी(हॉट स्पॉटस्) समजला जातो.
पावसाळ्याच्या अखेरीस भाद्रपद महिन्यात येथील पर्वत पठारांवर, डोंगरमाथ्यावर, उतारावर, कुठं खडकात फुललेल्या रानफुलांच्या रूपानं रंगांची उधळण सुरु असते. येथील रानसम्राज्ञीनं हिरवा शालू परिधान केलेला असतो. चुकार निर्झराचं मंजुळ गाणं ऐकू येत असतं. फुलांचा बहर फुलपाखरांना निमंत्रण देतो. मधमाश्या फुलांना बिलगतात. निसर्गानं गंधर्व-किन्नरांची मैफल भरविल्यासारखं वाटतं. नटखट-खोडकर वाऱ्यावर डोलणारी अगणित फुलं जणू भोवतीनं फेर धरून नाचत रानपऱ्यांच्या नृत्यांच्या आविष्काराचा भास घडवतात. फुलांचे नानाविशेष, रंग, गंध, निळाई, हिरवाई, पिवळाई असा रंगविलास पाहून आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. येथे गवतफुलांची संख्या मोठी आहे. दाटीवाटीनं उगवलेली वाऱ्यावर डोलणारी अगणित गवतफुलं पाहिली की, नकळत 'गवत फुला रे गवत फुला...’ हे गाणं ओठांवर येतं. सोनकीच्या पुष्पमळ्यांनी पठारे पीतवर्णी दिसतात. तिला सोबत असते रानतेरडा, श्वेतांबरा, फांगळा, आभाळी-नभाळी, ढालगोधडी, सोनटिकली, लाजाळू, जांभळी, मंजिरी, गोपाळी, रानतूर, सोनसरी, पांढरी कोरांटी, उंदरी, कुसुंबी... आणखी कितीतरी रानफुलांची. या फुलालंकारांनी सृष्टीला निराळीच झळाळी येते!
 
*कारवीची सप्तपदी*

कारवी ही सह्यगिरीत आढळून येणारी झुडूपवर्गीय वनस्पती. साधारणपणे १२०० ते १५०० मीटर उंचीवर कारवी आढळते. निसर्गानं कारवीला अलौकिकत्व बहाल केलंय. बाकीची फुलझाडं फुलताना कारवी रुसून बसल्याप्रमाणं सात वर्षे मुक्यानंच काढते. सात वर्षे झाली की असंख्य फुलांनी फुलते. सुगंधानं मोहरते. कारवीची फुले निळ्या-जांभळ्या रंगाची असतात. ती फुलली की  सारे रान निळे निळे दिसते. कारवीच्या रंग आविष्काराला सुरुवात झाली की, स्थानिक आदिवासी ' नीळ आली, नीळ आली' असं म्हणतात. उंच कड्याच्या, खोल दरीच्या काठावरून, डोंगरकपारीतून चालताना तीव्र उतार पाहून डोळे फिरतात. रानवाटेलगतच्या कारवीच्या झुडूपांमुळे आपल्या मनातली भीती कमी होते.
 
*काजव्यांचा प्रकाशोत्सव!*

दरवर्षी मे महिन्याचा शेवटचा आणि जून महिन्याचा पहिला पंधरवडा या दरम्यानच्या काळात सह्याद्रीत विविध ठिकाणी काजव्यांची मायावी दुनिया अवतरते. हजारो झाडे लक्षावधी काजव्यांनी लगडतात. हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा 'बसेरा' असतो! ज्या झाडांवर काजव्यांची 'वस्ती' असते, ती 'ख्रिसमस ट्री'सारखी दिसतात! विशिष्ट पद्धतीने त्यांचा चमचमाट सुरु असतो, त्याला एक लय आणि ताल असतो. लुकलुकत होणारी काजव्यांची उघडझाप डोळ्यांना सुखावून जाते. नभांगणातील तारांगणच जणू भुईवर उतरलंय... साक्षात तारकादळेच जणू धरणीमातेच्या भेटीला आलीयेत. तासन-तास पाहत बसलो तरी मन तृप्त होत नाही. विस्मयचकित मुद्रेनं निसर्गाचं अनुपम वैभव आपण पाहतच राहतो. ग्रीष्म ऋतूला निरोप देताना वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्ग देवताच जणू काजव्यांची प्रकाश फुले उधळीत असते. मोसमी पावसाच्या तोंडावर भंडारदऱ्यात ही संख्या कोटींच्या घरात पोचते. तेव्हा काजवा महोत्सवाचा म्हणजेच प्रकाशोत्सवाचा 'क्लायमॅक्स' होतो. मोसमी पाऊस आला की, पुढं तो चांगलाच जोर धरतो. त्याचं रौद्र-भीषण तांडव सुरु होतं. पिटुकल्या काजव्यांच्या जीवनचक्राची अखेर होते, तशी ही ‘मयसभा’देखील संपते.

*सूर्यास्त-सूर्योदयाचे रमणीय देखावे!*

वैविध्यानं नटलेल्या सह्याद्रीच्या रांगेत वर्षभरात निसर्गाचे अनेकानेक सोहळे साजरे होतात. रोज सूर्य उगवतो आणि मावळतो, तेव्हाचे दृश्य तर पाहण्यासारखं असतं. खासकरून सूर्यास्ताच्या कातरवेळी ‘सायंकाळची शोभा’ आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. ती पाहताना आपण तिथल्या निरव शांततेत स्वतःला हरवून बसतो. भोवतालात विरघळून जातो. हरिश्चंद्रगड, घाटघर येथील सूर्यास्ताचा देखावा केवळ अवर्णनीय असतो. सह्याद्रीत कोकणकड्यावर उभं राहून बघितलं की, ठिकठिकाणी सूर्यास्ताचे विलोभनीय देखावे दिसतात. खास सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी दर्दी पर्यटक येथे मुक्काम थाटतात. 

*हा खेळ उन-सावल्यांचा!*

वर्षा ऋतूच्या तोंडावर अरबी समुद्राकडून घाटाच्या दिशेनं ढग पळू लागतात. अर्थातच अजून पावसाला उशीर असल्यानं ढगांत बाष्प नसतं. कापूस पिंजारल्यागत ते भासतात. आभाळात अशा कृष्णधवल मेघांची गर्दी होते. हे ढग पाठशिवणीचा खेळ खेळू लागतात. तेव्हा संपूर्ण सह्याद्रीच्या आसमंतात उन-सावल्यांचा अनोखा खेळ सुरू होतो. कधी कधी मधूनच उन्हाची तिरीप पडून लख्ख उजळल्यानं कुठं प्रकाशाचं बेट दिसते; तर उन्हाचा ‘फोकस’ पडल्यानं एखादा कडा रुपेरी भासतो. पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे जसजसे वाहत राहतात, तसा हा खेळ रंगात येतो. हा खेळ पाहण्यातही मौज असते! पुढे पावसाळा सुरु होतो. पावसाने चांगला ताल धरला की हा उन-सावल्यांचा खेळ संपून जातो.
 
*इंद्रवज्र!*

पावसाळ्याच्या दिवसांत हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर देखण्या इंद्रवज्राचा अनोखा देखावा दिसतो. या परिसरात इंद्र्वज्राची पहिल्यांदा अधिकृत नोंद केली ती कर्नल साईक्स या ब्रिटीश अधिकाऱ्यानं. हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर. १८३५ साली. घोड्यावरून रपेट मारत सकाळच्या वेळेला कोकणकड्यावर गेलेल्या साईक्सला मोठं विलोभनीय दृश्य दिसलं. मध्यभागी साईक्स आणि त्याचा घोडा, सोबतची माणसं यांच्या प्रतिमाच त्याला समोरच्या गोलाकार ढगांमध्ये उमटलेल्या दिसल्या! सृष्टीची ही नवलाई पाहून सारेचजण चकित झाले, बुचकळ्यातही पडले. नगर जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये याची नोंद आपल्याला आढळून येते. इंद्र्वज्राचं वैशिष्ट्य असं की जी व्यक्ती हे दृश्य बघते ती स्वत:ची सावली त्यात बघते. डोकं मध्यभागी दिसतं आणि मधात अत्यंत तेजस्वी दिसणारे वर्तुळाकार इंद्रधनूष्याचे तेजोवलय कडेला फिकट होत जातं.

महाराष्ट्राला लाभलेला विशाल सह्याद्री म्हणजे ‘भटक्यांची पंढरी’च जणू. म्हणूनच इथल्या रानवाटा निसर्गप्रेमींना, दुर्गवेड्यांना, हौशी गिर्यारोहाकांना आषाढी-कार्तिकीच्या वाटतात. पश्चिम घाटातील हे ‘निसर्गोत्सव’ नेहमीच खुणावत असतो. ऋतू म्हणजे फिरता काल. कालचक्र अव्याहतपणे पुढं जात असतं. डोळ्यांसमोर ऋतू कुस बदलतात. सृष्टीची रुपंही बदलतात. निसर्गाच्या लावण्यविभ्रमाचं अनोखं जग आपल्या पुढ्यात येऊन उभं राहतं. उत्तर-दक्षिण पसरलेल्या सह्यकड्याच्या कुशीत मनमुराद भटकताना जीवाला वेड लावणारं हे अनुपम वैभव पाहणं म्हणजे एक मर्मबंधातली ठेव असते.
 
*भाऊसाहेब चासकर,*
9422855151
bhauchaskar@gmail.com

Saturday, October 3, 2020

टँकर चे गाव ओसाड माळरान जमीन असलेले गाव म्हणून ज्याची ओळख नकाशावर होती ती पुसून त्या नकाशावर पाणीदार व विकासाच्या वाटेवर चालणारे

अकोले (शांताराम काळे )टँकर चे गाव ओसाड  माळरान जमीन असलेले गाव म्हणून ज्याची ओळख नकाशावर होती ती पुसून त्या नकाशावर  पाणीदार व विकासाच्या वाटेवर चालणारे आदर्शवत गाव म्हणून गावातील सरपंच सयाजी अस्वले व त्याच्या टीमने श्रमदान , एकोप्याने एकत्र येत  या गावाला  नव्याने ओळख करून  दिली आहे . नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील चाळीसगाव डांग भागातील धारेगाव आदिवासींचे श्रद्धास्थान आहे. या धारेगावच्या प्रांगणात व मुळा नदीचे उगमस्थान असलेल्या आज्या पर्वताच्या पायथ्याशी कुमशेत हे टुमदार गाव वसले आहे. जलसंधारणाच्या विविध कामांतून गावातील पिण्याच्या पाण्याचा टॅंकर  बंद झाला आहे. शिवारात विविध हंगामांत पिके डोलू लागली आहेत. जोडीला ठिबक सिंचन आहे. पर्यटकांसाठी अत्यंत मनमोहक असलेल्या या गावातील महिला हस्तकलेतून विविध वस्तू तयार करतात. त्या विक्रीतून संसाराला हातभार लावतात.

नगर जिल्ह्यात अकोले या तालुका ठिकाणापासून सुमारे ५५ किलोमीटरवर कुमशेत हे निसर्गाच्या कुशीत वसलेले गाव येते. रामायणात वाल्मीक ऋषींचा आश्रम असल्याचा उल्लेख आज्या पर्वतासंबंधी आहे. हा पर्वत तसेच वाकडा, सुपली, करंडा आदी डोंगरांच्या मध्यावर गावठा, पाटीलवाडी, बोरीची वाडी, ठाकरवाडी, मुडाची वाडी व नाडेकरवाडी अशा सहा वाड्यांचे मिळून कुमशेत गाव तयार झाले आहे. गावाच्या एका बाजूस धारेगाव कोकणकडा आहे.
दुष्काळापासून मुक्ती
कुमशेतचे भौगोलिक क्षेत्र सुमारे ३०२७. ५४ हेक्टर आहे. त्यात वनक्षेत्राचा मोठा वाटा आहे. पावसाळ्यात तीन हजार मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र खडकाळ जमीन असल्याने उन्हाळ्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न जाणवतो. सतत टँकर तर रोजगारासाठी दाही दिशा अशा दुष्काळाच्या झळा सोसणारे गाव आता परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करू लागले आहे. पाणीदार गाव म्हणून आपली ओळख निर्माण करू लागले आहे. विशेष म्हणजे गाव दुष्काळमुक्त होण्यामध्ये व आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यामध्ये लोकसहभाग व त्यातही महिलांचा सहभाग महत्त्वाचा ठरला आहे. बचत गटाच्या माध्यमातूनही गावाचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न होतो आहे.
जलसंधारणातून ठिकठिकाणी अडले पाणी-कुमशेत गावात जरी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असला तरी गावाला कायमस्वरूपी जानेवारी महिन्यापासूनच टँकरची मागणी करावी लागत होती हा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी गावातील सर्व महिला पुरुष एकत्र करून सातत्याने बैठक घेऊन माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या माध्यमातून 
नजीकच्या काळात कुमशेत गावशिवारात कृषी विभागामार्फत सिमेंट काँक्रीटचे सात दगडी बंधारे, लघू पाटबंधारे विभागाकडून पाच तर लोकसहभागातून वनराई बंधारे झाले. त्यातून डोंगरदऱ्यांतून वाहून जाणारे लाखो लिटर पाणी शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी अडविले. जलयुक्त अभियान कार्यक्रमातून पाणी अडविण्याचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला. तत्कालीन आमदार वैभव पिचड  यांनी पुढाकार घेऊन जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी  मिळवण्याचा प्रयत्न केला. बंधाऱ्यांमध्ये मेअखेरपर्यंत पाणी टिकते . त्याचा फायदा म्हणजे गावाला पिण्यासाठी पाणी मिळालेच, शिवाय उन्हाळी पिकेही शेतकरी घेऊ लागला आहे.
शिवारात डोलू लागली विविध पिके
पाटीलवाडी, ठाकरवाडी, चोंढी उत्तर ओढा आदी काँक्रीट बंधाऱ्याच्या काठावरील भात खाचरात गहू, हरभरा, भुईमूग, देशी वाल, वांगी, मेथी, पालक अशी पिके डोलू लागली आहेत. कमी पाण्यावर येणाऱ्या गव्हाच्या वाणाला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले. नैसर्गिक पाण्याचा ओलावा, त्याला बंधाऱ्यातील २५ ते ३० दशलक्ष घनफूट पाण्याची जोड व ठिबक सिंचन यांचा वापर झाला. त्या आधारे कांदा, बटाटा या पारंपरिक पिकांसह आंबा, आवळा, पेरू, बोरे, मेथी अशी विविधताही शिवारात दिसू लागली आहे.हे सर्व करत असताना गावाला जलयुक्त शिवारचा ३रा क्रमांक मिळाला हे सर्व गावातील ग्रामस्थांच्या एकजुटीचे श्रेय आहे त्यामध्ये आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य , पोलीस पाटील आणि सर्व ग्रामस्थ यांच्या अथक प्रयत्नाने हे शक्य झाल्याची भावना सरपंच सयाजी अस्वले यांनी सांगितले . गावात वनाधिकार कायद्याची अमलबजावणी करण्यासाठी सरपंच यांनी अभ्यास केला कायदा समजून घेतला त्यासाठी वैजापूर , गडचिरोली , मेंढालेखा , चंद्रपूर , गुजराथ , राजस्थान , दिल्ली , छत्तीसगड , मुंबई या ठिकाणी जाऊन तेथील तज्ज्ञांकडून हा कायदा समजून गावातील गाव बैठक , ग्रामसभा , बचतगट , बैठक , शेतकरी बैठक , जिव्हाळा गट बैठकांच्या माध्यमातून वनाधिकार कायदा गावातील ग्रामस्थांना समजून दिला तसेच लोकपंचायत कार्यशाळेच्या माध्यमातून जाणीवजागृती केल्यानंतर गावाला वनाधिकार कायद्याच्या आधारावर गावाला सामुदायिक क्षेत्र ४६२ हेक्टर  हे गावाच्या मालकीची जमीन म्हणून जिल्हास्तरीय वनहक्क समितीने कुमशेत गावाला याचे प्रमाणपत्र दिलेले असून उर्वरित राहिलेली जमीन मागणीसाठीचा पाठपुरावा चालू असून जोपर्यंत जमीन मिळत नाही तोपर्यंत हा पाठपुरावा चालू राहणार असल्याचे सयाजी अस्वले म्हणाले गावातील वैयक्तिक दावेदारांचे १०७ दावे  २००८ साला  मध्ये तालुकास्तरीय वन हक्क समिती व उपविभागीय समिती यांचेकडून दाखल केले असून त्यापैकी ११ दावेदारांचे  दावे मंजूर झाले आहेत 
शेतकरी समाधानी
कुमशेत शिवारातील बहुतांश उत्पादने सेंद्रियच म्हणावी लागतील. वेगवेगळ्या हंगामात शेती करणे शक्य झाल्याने रोजगारासाठी होणारी भटकंती थांबली आहे. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान आहे. . यावर्षी पाऊस अधिक झाल्याने बंधारेदेखील पूर्ण क्षमतेने भरले आहेत. चारसूत्री भात लागवड करून परिसरात मार्गदर्शकाची भूमिकाच गावाने बजावली आहे.
हस्तकला व्यवसायातून संसाराला हातभार
कृषी विभागाने गावातील महिलांना बांबू उद्योग सुरू करून देण्यासाठीही मदत केली आहे. नेहमीच्या कामातून वर्षातून थोडा फुरसतीचा वेळ मिळतो. त्यावेळी ग्रामस्थ हस्तकलेचा व्यवसाय करतात. पावसाची वाट पाहण्याच्या किंवा पीक तयार होण्याच्या काळात ते आपल्याच शेतीस्त्रोतांच्या आधारे वस्तू तयार करण्याकडे वळतात. अशा हंगामी आदिवासी कारागिरांमध्ये सर्वात उल्लेखनीय कारागीर म्हणजे वेताच्या व बांबूच्या टोपल्या आणि तट्टे विणणारे लोक. पूर्वी बांबूपासून बनविण्यात येणाऱ्या वस्तूंना अधिक मागणी होती. काही वर्षांपूर्वी या वस्तूंचा मोठ्या प्रमाणात घरगुती वापर होत असे. मात्र आताच्या जमान्यातही बांबूपासून हारे, टोपल्या, तट्टे, खुराडे, कणगी आदी घटक बनवून देणारी कुमशेत गावातील आदिवासी कुटुंबीय दोन वर्षे बांबूच्या साहाय्याने बुरूडकाम करीत आहेत. टोपल्या, रोवली, सूप, करंडा आदी वस्तूंचे विणकाम करीत त्यांनी या व्यवसायातून आपल्या संसाराला हातभार लावला आहे.
जलयुक्त शिवार अभियानातून कृषी विभाग व वन विभागाने गावात कामे केली. त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. पाण्याची समस्या दूर झाली अाहे. शेतीशिवार हिरवेगार झाल्याने पर्यटकांचा ओढा इथे वाढू लागला आहे. कुमशेत गाव नजीकच्या काळात पर्यटनासाठी नावारूपास येईल.अशी माहिती सरपंच सयाजी अस्वले यांनी दिली आहे तर कुमशेत गाव हे बांबू प्रशिक्षण केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे 
-
शिवारात पाणी आहे, पण वीज नाही. ती उपलब्ध झाल्यास शेतीसाठी बंधाऱ्यातून पाणी उचलल्यास येथील शेती आठमाही होईल. त्या दृष्टीने पावले टाकीत आहोत.
सर्वांच्या मदतीतून गाव बदलतेय
कुमशेतच्या सरपंच सोनाबाई विठ्ठल अस्वले म्हणाल्या की, प्रत्येक उन्हाळ्यात गावाला वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागे. पाण्याच्या टँकरवर सतत अवलंबून राहावे लागे. आता उन्हाळ्यात गावात येणारा पिण्याचा पाण्याचा टँकर बंद झाला आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे. शेतीलाही पाणी उपलब्ध होऊन रब्बी, उन्हाळी क्षेत्र वाढले आहे. गावातील महिलांचा तनिष्का गट स्थापन केला आहे. त्या आधारे वीस महिलांना एकत्र करून छोटे, मोठे उद्योग करण्याचे काम सुरू अाहे. बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी सकाळ रिलीफ फंडातून दोन लाख रुपयांचा निधी मिळाला. हा गाळ खडकाळ माळरानावर असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात टाकला. त्यातून पाच हेक्टर क्षेत्र तयार होऊन त्यात पिके डोलू लागली आहेत. आता या जमिनींची पाणीक्षमताही वाढीस लागली आहे. या बंधाऱ्यांना भेट देण्यासाठी पर्यटक येतात. येथे वस्ती करतात. आमचे ग्रामस्थ त्यांना चुलीवरची भाकर तसेच अन्य जेवण देतात. पर्यटकांसाठी हुरडा पार्टीचे आयोजनही करण्यात येते. त्यातून ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे पर्यटनाचे केंद्र म्हणून आमच्या गावाची ओळख झाली आहे. सरकारने पर्यटन विकासातून निधी दिल्यास तसेच रस्ते काँक्रीटचे तयार झाले तर पर्यटकांचा ओघ अधिक वाढेल, असेही  सोनाबाईंनी सांगितले.
- सोनाबाई अस्वले, ९४२३१४९१६८
हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या कुमशेत परिसरावर निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केली आहे. हा परिसर अतिशय निसर्गरम्य असून, पर्यटकांना मोहवून टाकणारा आहे. येथील ग्रामस्थांनी एकोप्याने राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा व प्रगतीची वाटचाल सुरू ठेवावी.
२०१८ तें २०२० पर्यंत कुमशेत गावात केलेली कामे व राबविण्यात आलेले उपक्रम -*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुमशेत गावठा उंबरवाडी या शाळांना सुंदर कंपाऊँ ङ वाल बांधकाम , *उंबरवाडी पिण्याच्या पाण्याची टाकी बांधकाम पूर्ण , दलित वस्ती पिण्याच्या पाण्याची टाकी बांधकाम पूर्ण , गावातील वड्या वस्त्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले , धरराव देवाचे मंदिर बांधकाम पूर्ण व जीर्णोद्धार कार्यक्रम , गावातील बंधाऱ्यातील गाळ काढणे व लिकेज काढणे , धरराव मंदिर व कोकणकड्याकडे जाणाऱ्या रोटीचे काम चालू , गावाला सामुदायिक वन हक्काच्या माध्यमातून ४६३ हेक्तर क्षेत्र जमिनीचे जिल्हास्तरीय वन हक्क समितीने गावाच्या मालकीची जमीन प्रमाणपत्र मिळाले . *गावात जातीच्या दाखल्यांचा कॅम्प आयोजित करून ग्रामस्थांना गावातच जातीचे दाखले उपलब्ध करून देण्यात आले गावातील एका अंगणवाडीला आदर्श अंगणवाडी पुरस्कार मिळाला तर कुमशेत गावालाही जलयुक्त शिवार पुरस्कार मिळाला आहे , आदर्श गाव करण्यासाठी सरपंच सयाजी अस्वले यांनी अभ्यास सहलीचे नियोजन करून पाटोदा , चंद्रपूर ,गडचिरोली ,येथे जाऊन अभ्यास केला गावात महिला बचत गटाची स्थापना करून त्याद्वारे  लघु उद्योग सुरु करण्यात आले आहे . महिलांना व तरुणांना बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देण्यात आले , गावात सुधारित बांबूची लागवड २१ शेतकरी ४००० रोपांची वैयक्तिक शेतकऱ्यांच्या शेतावर लागवड पूर्ण झाली सुधारित पद्धतीने चार सूत्री पद्धतीने भट लागवड व पारंपरिक पद्धतीने बियाणांचे संवर्धन करण्यात येते , गावातील शेतकऱ्यांचे सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे कला असून पेसा कायद्याची अमलबजावणी स्वतंत्रपणे ग्रामसभा पिण्याच्या पाण्यासाठी गावात तीन ठिकाणी बॉयरवेल मारले असून गावात शेतीला व पिण्याला मुबलक पाणी उपलब्ध असल्याचे दिसून आले . पर्यटन वाढीसाठी गावातील युवकांनी गाईड प्रशिक्षण दिले जात असून पर्यटकांना राहण्याची सुरक्षित व्यवस्था करण्यात येते त्यातून तरुणांना रोजगार उपलब्ध होतो तर महिला बचतगट पर्यटकांना घरगुती जेवणाचे नियॉन करतात त्यामुळे महिलांच्या हाताला काम मिळून दोन पैसे मिळतात .गावातील महिलांना कृषी माळावर प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण दिले जाते तसेच महिला व युवकांना वनौपजावर प्रक्रिया उद्योगाचेही प्रशिक्षण दिले जाते , गाव स्वच्छता अभियान राबवते त्यामुळे गाव शतर टक्के हागणदारी मुक्त करण्यात आले आहे . गावातील सर्व कुटुंबाना गॅस वाटप करण्यात आले आहे , गावातील युवकांना वाचन साठी वाचनालय मदतीच्या माध्यमातून सुरु केले आहे तर एमपीएससी चे पुस्तकेही उपलब्ध करण्यात अली आहेत गावात विविध डॉक्तरांच्या माध्यमातून गावात दर महिन्याला आरोग्य शिबीर  आयोजन  केले जाते तर जिव्हाळा संस्था स्थापन करून गावात सामाजिक कामे केली जातात गावात कोरोना समितीची स्थापना करून त्या माध्यमातून नियोजन करून प्रत्येक कुटुंबाला गोळ्यांचे वाटप मास्क चे वाटप करण्यात येत आहे . गावातील ५५ कुटुंबाचे बंद असलेले रेशनवरील धान्य मिळण्यास सुरुवात झाली असून अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत त्यासाठी मदतही गोळा झाली आहे गावात श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेची सुरळीतपणे अमलबजावणी करून त्यातून वेगवेगळ्या योजनांचा गावातील ग्रामस्थांना लाभ मिळवून दिल्याचे सरपंच सयाजी अस्वले यांनी सांगितले आहे . तर वनविभागामार्फत कुमशेत गावात मोटार ड्रायव्हिंगचे कोर्स महिनाभर चालू करून प्रशिक्षण देऊन लायसन्स देण्यात अली आहेत   गावात पर्यटन वाढविण्यासाठी १९९६ मध्ये गावात युको टुरिझमच्या ट्रेनींग घेऊन त्यानंतर गावातील लोकांना ते समजून सांगण्यात आले तरुणांचे लक्ष्य याकडे केंद्रित होण्यासाठी गावात तीन दिवसाचे सरपंच अस्वले यांनी प्रशिक्षण दिले . व हिमाचल प्रदेश ,सिपती काझा या ठिकाणी चालणारे होमस्टे नावाने चालणारे पर्यटन गावातील तरुणांना दाखविण्यात आले त्याप्रमाणे गावात युको टुरिझम वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत , गावातील अंगणवाडी , प्राथमिक शाळा डिजिटल करण्यात अली आहे .  सरपंच - सयाजी अस्वले ९४२१३५०६५६ ,९९२२२५७६६४ 
कुमशेत आर्थिक प्रगतीकडे --- कुमशेत गावातील शेतकरी , तरुण , महिला आपापल्या कुवतीप्रमाणे शेती , व्यवसाय करून सुखी समाधानी झाले आहेत प्रत्येकाच्या हाताला काम मिळाल्याने पैसा उप्लब्ध्तेतून घरात टीव्ही , फर्निचर , मोटार सायकल , जीप व  शेती आधुनिकतेकडे नेण्यासाठी ट्रकटर,आदी यंत्रसामुग्री आणून शेतीची मशागत  करत आहेत . बांबूचे वनविभाग व स्वमालकीच्या जमिनीवर सुमारे ७ हजार रोपे लावून बांबूचे मोठे बन तयार करण्यात आले आहे त्यातून लोकपंचायत संस्थेने साहित्य, कारागीर कीट पुरवठा मार्गदर्शन करून आज गावातील व परिसरातील तरुणांना व महिलांना काम मिळाले आहे . नाशिक , नगर , संगमनेर , पुणे या ठिकाणी त्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री केली जाते त्यंच्या कलेत असणारी सुबकता पर्यटकांना भावते . त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येतात त्यांना राहण्याची जेवणाची व्यवस्था करून नंतर कोबड नाच करून त्य्तुन्ही त्यांना आर्थिक उत्पन्न मिळते . गावात नौ बंधारे असून त्याद्वारे पिण्यास पाणी तर मिळतेच मात्र शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल्याने भात पिकानंतर गहू , हरबरा ,बटाटे , सोयाबीन ,असे डबल पिक हे आदिवासी घेतात , जमिनीचा पोट सुधार्ण्य्साठी गांडूळ खत , शेणखत ,पाला पाचोळा  वापरल्याने त्यांच्या  जमिनीचा पोत  सुधारला असून गतवर्षीपेक्षा उतपादंही वाढले आहे , सेंद्रिय पद्धतीने घेत असलेल्या त्यंच्या , तांदूळ , गहू , वाटणा , व भाजीपाल्याला मोठी मागणी असते बाहेरील शेतकरी त्यंची शेती पाहण्यसाठी भेट देतात . प्रत्येक घरात कोंबड्या , शेळ्या व डांगी जनावरे असून त्य्तुन्ही उत्पन्न मिळते . बाळू बरामते यांचा गायींचा मोठा गोठा असून त्यन्च्य्सोबत ढवळा मुठे , ज्ञानेश्वर अस्वले , बन्सी अस्वले यांचेकडे  ट्रकटर,आहे  वनिता बरामते , च्निधाबाई अस्वले , वनिता बारामते,नवसू मधे, गोविंद धिंदळे, गोविंद मधे, काळू अस्वले , विठ्ठल अस्वले हे ग्रामस्थ सतत गावाच्या विकासासाठी एकत्र येतात माजी सरपंच पोलीस पाटील , सरपंच हे दर आठवड्याला बसून गाव विकासाच्याबाब्त चर्चा करून व गावात आर्थिक बाबीचा विचार करून प्रत्येक ग्रामस्थाला श्सानाच्या विविध योजनाचा लाभ देण्यसाठी धडपडत असतात. कुमशेत चे १० हेक्टर क्षेत्र भिजत असून हे क्षेत्र सिंचनाखाली  २५ हेक्टर पर्यंत नेण्याचा मानस या गावचा आहे . तर महिला बचत गट मार्फत  महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असून , हस्तकला , शेळीपालन , कोंबडी पालन , मत्स्य पालन , साठी नियोजन करून त्या दिशेने पूल उचलली जात आहे . कोरोना मुळे सध्या पर्यटक येत नसले तरी पर्यटक साठी निवास व्यवस्था ,भोजन , बैलगाडी सफर ,कोंबडनाच , टेंट, ट्रेकिग इत्यादी सुविधा देण्यासाठी तरुणांनी आपल्या शेतामध्ये नियोजन केले आहे तर कृषी पर्यटन , इको टुरिझम च्या दिशेने त्यंची पाऊले पडत आहे तर प्रतेकाच्या हाताला काम मिळाल्याने रोजगाराचा प्रश्न सुटला आहे . या सर्व कामासाठी माजी सरपंच , सदस्य , महिला , तरुण , ग्रामस्थ यांचे मोठे सहकार्य मिळत असल्याचे सरपंच सयाजी अस्वले यांनी सांगितले