निसर्गोत्सव
लोकमतच्या मंथन या रविवार पुरवणीत 'सह्याद्रीचं सौंदर्य' या लेखमालेत आज प्रसिद्ध झालेला माझा लेख.
*निसर्गोत्सव!*
'राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा... अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा...' असं गोविंदाग्रजांनी महाराष्ट्र भूमीचं सार्थ वर्णन केलंय. वैशिष्ट्यपूर्ण भूगोलासोबत या भूमीला अभिजात निसर्गसौंदर्य लाभलंय. आकाशाला गवसणी घालणारे सह्याद्रीचे उत्तुंग पर्वतमाथे, डोंगर-सुळके, उरात धडकी भरविणाऱ्या खोल-खोल दऱ्या, उभे तुटलेले कडे आणि भल्या मोठाल्या कपारी... जैववैविध्यानं नटलेली समृद्ध वनसंपदा, ऋतूमानाप्रमाणं आगळंवेगळं रंग-रूप धारण करणारा निसर्ग... वर्षा ऋतूत सह्यगिरीच्या कुशीत थबथबणारा अनोखा जलोत्सव! पावसाळा संपतो न संपतो तोच सह्याद्रीच्या पठारांवर, डोंगर उतारांवर बहरतो तो नयनरम्य पुष्पोत्सव... अनेकविध रंग, रूप, आकार घेऊन इवलाली नाजूक रानफुलं भेटीला येतात. रानफुलांचा भारून टाकणारा रानगंध निसर्गप्रेमींच्या मनाला मोहिनी घालतो. सात वर्षांनी एकदा फुलणारी कारवी असो ऋतुराज वसंतातला मोहमयी फुलोत्सव. नभांगणातील तारांगणच जणू भुईवर उतरल्याचा आभास निर्माण करणारा काजव्यांचा प्रकाशोत्सव असो की डोळ्यांना सुखावणारे सूर्योदय-सूर्यास्ताचे देखणे देखावे... ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे...’ असं इथलं निसर्गचित्र. सगळेच निसर्ग विभ्रम विशेष नवलाईचे!
*जलोत्सव*
तळकोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून पाऊस घाटाच्या दिशेनं सरकायला लागतो तसा येथला निसर्ग चैतन्यानं मोहरतो. लहान मोठी शिखरे, डोंगरमाथे जलरंगांच्या छटांमध्ये न्हाऊन निघतात. माहेराला आल्यागत मोसमी पाऊस येथे रमतो. अवघ्या सृष्टीशी त्याचं गुज सुरु होतं. चैतन्याचा दाता असलेल्या पावसाच्या आगमनानं बघता-बघता सृष्टीचे रुपडंच बदलून जातं. चिंब पावसानं रान आबादानी होतं. चित्तवृत्ती प्रसन्न करणारी चैतन्याची सळसळ सगळीकडे जाणवू लागते. टपोऱ्या थेंबांनी ओघळणारा पाऊस, पर्वत-शिखरांवरून झेपावणारे सहस्रावधी जलधारांचे चंदेरी प्रपात, उताराच्या दिशेनं खळाळत, डोंगरदऱ्यांत उड्या घेत वाहात जाणारे ओढ्या-नाल्यांचे अगणित प्रवाह, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, लालसर विटकरी पाण्यानं तुडुंब भरलेली भातखाचरं, पर्वत-शिखरांच्या कानात कुजबुजणारं धुकं, सैरावैरा धावणारा उनाड रानवारा आणि जोडीला मस्त गारवा... पठारांवर दाटीवाटीनं उगवलेलं हिरवं-पोपटी गवत, निसर्गशिल्पांचं देखणं कोंदण लाभलेल्या सह्यगिरीच्या कुशीत असं अनोखं निसर्गचित्र अवतीर्ण होतं. इथल्या पावसाला मुळातच नाद आहे. लय, सूर आणि ताल आहे. म्हणूनच त्याचं येणं अनेकांच्या दृष्टीने आनंदाचं गाणं होऊन जातं. त्याच्या तो आला की, येथे जलोत्सव सुरु होतो. खपाटीला गेलेल्या जलाशयांची पोटं भरू लागतात. ‘हिरवा निसर्ग हा भोवतीने, जीवन सफर करा मस्तीने...’ असे म्हणत जलोत्सव पाहायला, झिम्माड सरीत भिजायला घाटघर-भंडारदरा परिसरात केवढी झुंबड उडते. नाशिक-मुंबई-पुणे येथील पर्यटक कुटुंबकबिल्यासह बाहेर पडतात, तेच मुळी जलोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी. मुत्खेल, रतनवाडी, साम्रद, घाटघर, उडदावणे, पांजरे, मुरशेत अशी भंडारदरा धरणाच्या काठाकाठानं गोल चक्कर मारत पाऊस अंगावर घेत, धबधब्यांखाली चिंब व्हायचं आणि गडकिल्ल्याच्या माचीवरून सह्याद्रीच्या कुशीत निवांत पहुडलेल्या टुमदार गावांची छानदार नक्षी बघत स्वतःला हरवून द्यायचं, असा जणू रिवाजच पडलाय. गुरुत्वाकर्षणाला धुडकावत वाऱ्याबरोबर हवेत उडणाऱ्या तुषारांमुळे दिसणारा साम्रद येथील आगळावेगळा 'रिवर्स फॉल' आणि प्रवरा नदीवरील रंधा धबधबा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानंतर अंब्रेला फॉल अवतीर्ण होतो. हा धबधबा म्हणजे म्हणजे इथल्या लोभस निसर्गसौंदर्याचा मानबिंदू. कुलंग, मदन आणि अलंग हे कुर्रेबाज दुर्गत्रिकूट आणि त्याला बिलगून असलेली शिखरस्वामिनी कळसुबाई, रतनगड, पाबरगड अशा उंचच उंच पर्वतशिखरांच्या मधात भंडारदरा धरणाचा जलाशय विसावलाय. इथल्या श्रावणाचा गर्भरेशमी हिरवा रंग ताजा ताजा असतो. तेव्हाच इंद्रधनुची कमान क्षितिजावर उमटते. सप्तरंगात सारी सृष्टी न्हावून निघते. हिरवे हिरवे गालिचे बघितले की, बालकवींच्या कवितेची ओळी मनात घोळत राहतात.
*फुलोत्सव*
जैववैविध्यानं नटलेल्या हरिश्चंद्रगड-भंडारदरा-कळसूबाई परिसराची आणखी एक ओळख पुढे येतेय, ती येथील रानफुलांच्या पुष्पोत्सवामुळे! पावसाळा संपतो न् संपतो तोच येथे फुलोत्सव सुरू होतो. फुलांची ही दुनिया अदभूत असते. किती किती फुले? त्यांच्या तऱ्हाही तितक्याच. रंग, रूप, गंध, आकार, रचना. प्रत्येकाचं आपलं निराळं वैशिष्ट्य. काही रात्री फुलतात, तर काही दिवसा. काही सुवासिक तर काही वासहीन. काही औषधी गुणधर्म असलेली तर काही चक्क कीटकभक्षी! पिवळीधमक सोनकी येते आणि आठ-पंधरा दिवस आपल्याच मस्तीत रंग उधळत राहते. हिमालयाच्या खालोखाल देशभरात सह्य पर्वताची ख्याती आहे. रानफुलांबाबत कळसुबाई-हरिश्चंद्रगडपासून कासच्या पठारापर्यंतचा परिसर जगभरातल्या १८ महत्त्वाच्या ठिकाणांपैकी(हॉट स्पॉटस्) समजला जातो.
पावसाळ्याच्या अखेरीस भाद्रपद महिन्यात येथील पर्वत पठारांवर, डोंगरमाथ्यावर, उतारावर, कुठं खडकात फुललेल्या रानफुलांच्या रूपानं रंगांची उधळण सुरु असते. येथील रानसम्राज्ञीनं हिरवा शालू परिधान केलेला असतो. चुकार निर्झराचं मंजुळ गाणं ऐकू येत असतं. फुलांचा बहर फुलपाखरांना निमंत्रण देतो. मधमाश्या फुलांना बिलगतात. निसर्गानं गंधर्व-किन्नरांची मैफल भरविल्यासारखं वाटतं. नटखट-खोडकर वाऱ्यावर डोलणारी अगणित फुलं जणू भोवतीनं फेर धरून नाचत रानपऱ्यांच्या नृत्यांच्या आविष्काराचा भास घडवतात. फुलांचे नानाविशेष, रंग, गंध, निळाई, हिरवाई, पिवळाई असा रंगविलास पाहून आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. येथे गवतफुलांची संख्या मोठी आहे. दाटीवाटीनं उगवलेली वाऱ्यावर डोलणारी अगणित गवतफुलं पाहिली की, नकळत 'गवत फुला रे गवत फुला...’ हे गाणं ओठांवर येतं. सोनकीच्या पुष्पमळ्यांनी पठारे पीतवर्णी दिसतात. तिला सोबत असते रानतेरडा, श्वेतांबरा, फांगळा, आभाळी-नभाळी, ढालगोधडी, सोनटिकली, लाजाळू, जांभळी, मंजिरी, गोपाळी, रानतूर, सोनसरी, पांढरी कोरांटी, उंदरी, कुसुंबी... आणखी कितीतरी रानफुलांची. या फुलालंकारांनी सृष्टीला निराळीच झळाळी येते!
*कारवीची सप्तपदी*
कारवी ही सह्यगिरीत आढळून येणारी झुडूपवर्गीय वनस्पती. साधारणपणे १२०० ते १५०० मीटर उंचीवर कारवी आढळते. निसर्गानं कारवीला अलौकिकत्व बहाल केलंय. बाकीची फुलझाडं फुलताना कारवी रुसून बसल्याप्रमाणं सात वर्षे मुक्यानंच काढते. सात वर्षे झाली की असंख्य फुलांनी फुलते. सुगंधानं मोहरते. कारवीची फुले निळ्या-जांभळ्या रंगाची असतात. ती फुलली की सारे रान निळे निळे दिसते. कारवीच्या रंग आविष्काराला सुरुवात झाली की, स्थानिक आदिवासी ' नीळ आली, नीळ आली' असं म्हणतात. उंच कड्याच्या, खोल दरीच्या काठावरून, डोंगरकपारीतून चालताना तीव्र उतार पाहून डोळे फिरतात. रानवाटेलगतच्या कारवीच्या झुडूपांमुळे आपल्या मनातली भीती कमी होते.
*काजव्यांचा प्रकाशोत्सव!*
दरवर्षी मे महिन्याचा शेवटचा आणि जून महिन्याचा पहिला पंधरवडा या दरम्यानच्या काळात सह्याद्रीत विविध ठिकाणी काजव्यांची मायावी दुनिया अवतरते. हजारो झाडे लक्षावधी काजव्यांनी लगडतात. हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा 'बसेरा' असतो! ज्या झाडांवर काजव्यांची 'वस्ती' असते, ती 'ख्रिसमस ट्री'सारखी दिसतात! विशिष्ट पद्धतीने त्यांचा चमचमाट सुरु असतो, त्याला एक लय आणि ताल असतो. लुकलुकत होणारी काजव्यांची उघडझाप डोळ्यांना सुखावून जाते. नभांगणातील तारांगणच जणू भुईवर उतरलंय... साक्षात तारकादळेच जणू धरणीमातेच्या भेटीला आलीयेत. तासन-तास पाहत बसलो तरी मन तृप्त होत नाही. विस्मयचकित मुद्रेनं निसर्गाचं अनुपम वैभव आपण पाहतच राहतो. ग्रीष्म ऋतूला निरोप देताना वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्ग देवताच जणू काजव्यांची प्रकाश फुले उधळीत असते. मोसमी पावसाच्या तोंडावर भंडारदऱ्यात ही संख्या कोटींच्या घरात पोचते. तेव्हा काजवा महोत्सवाचा म्हणजेच प्रकाशोत्सवाचा 'क्लायमॅक्स' होतो. मोसमी पाऊस आला की, पुढं तो चांगलाच जोर धरतो. त्याचं रौद्र-भीषण तांडव सुरु होतं. पिटुकल्या काजव्यांच्या जीवनचक्राची अखेर होते, तशी ही ‘मयसभा’देखील संपते.
*सूर्यास्त-सूर्योदयाचे रमणीय देखावे!*
वैविध्यानं नटलेल्या सह्याद्रीच्या रांगेत वर्षभरात निसर्गाचे अनेकानेक सोहळे साजरे होतात. रोज सूर्य उगवतो आणि मावळतो, तेव्हाचे दृश्य तर पाहण्यासारखं असतं. खासकरून सूर्यास्ताच्या कातरवेळी ‘सायंकाळची शोभा’ आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. ती पाहताना आपण तिथल्या निरव शांततेत स्वतःला हरवून बसतो. भोवतालात विरघळून जातो. हरिश्चंद्रगड, घाटघर येथील सूर्यास्ताचा देखावा केवळ अवर्णनीय असतो. सह्याद्रीत कोकणकड्यावर उभं राहून बघितलं की, ठिकठिकाणी सूर्यास्ताचे विलोभनीय देखावे दिसतात. खास सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी दर्दी पर्यटक येथे मुक्काम थाटतात.
*हा खेळ उन-सावल्यांचा!*
वर्षा ऋतूच्या तोंडावर अरबी समुद्राकडून घाटाच्या दिशेनं ढग पळू लागतात. अर्थातच अजून पावसाला उशीर असल्यानं ढगांत बाष्प नसतं. कापूस पिंजारल्यागत ते भासतात. आभाळात अशा कृष्णधवल मेघांची गर्दी होते. हे ढग पाठशिवणीचा खेळ खेळू लागतात. तेव्हा संपूर्ण सह्याद्रीच्या आसमंतात उन-सावल्यांचा अनोखा खेळ सुरू होतो. कधी कधी मधूनच उन्हाची तिरीप पडून लख्ख उजळल्यानं कुठं प्रकाशाचं बेट दिसते; तर उन्हाचा ‘फोकस’ पडल्यानं एखादा कडा रुपेरी भासतो. पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे जसजसे वाहत राहतात, तसा हा खेळ रंगात येतो. हा खेळ पाहण्यातही मौज असते! पुढे पावसाळा सुरु होतो. पावसाने चांगला ताल धरला की हा उन-सावल्यांचा खेळ संपून जातो.
*इंद्रवज्र!*
पावसाळ्याच्या दिवसांत हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर देखण्या इंद्रवज्राचा अनोखा देखावा दिसतो. या परिसरात इंद्र्वज्राची पहिल्यांदा अधिकृत नोंद केली ती कर्नल साईक्स या ब्रिटीश अधिकाऱ्यानं. हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर. १८३५ साली. घोड्यावरून रपेट मारत सकाळच्या वेळेला कोकणकड्यावर गेलेल्या साईक्सला मोठं विलोभनीय दृश्य दिसलं. मध्यभागी साईक्स आणि त्याचा घोडा, सोबतची माणसं यांच्या प्रतिमाच त्याला समोरच्या गोलाकार ढगांमध्ये उमटलेल्या दिसल्या! सृष्टीची ही नवलाई पाहून सारेचजण चकित झाले, बुचकळ्यातही पडले. नगर जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये याची नोंद आपल्याला आढळून येते. इंद्र्वज्राचं वैशिष्ट्य असं की जी व्यक्ती हे दृश्य बघते ती स्वत:ची सावली त्यात बघते. डोकं मध्यभागी दिसतं आणि मधात अत्यंत तेजस्वी दिसणारे वर्तुळाकार इंद्रधनूष्याचे तेजोवलय कडेला फिकट होत जातं.
महाराष्ट्राला लाभलेला विशाल सह्याद्री म्हणजे ‘भटक्यांची पंढरी’च जणू. म्हणूनच इथल्या रानवाटा निसर्गप्रेमींना, दुर्गवेड्यांना, हौशी गिर्यारोहाकांना आषाढी-कार्तिकीच्या वाटतात. पश्चिम घाटातील हे ‘निसर्गोत्सव’ नेहमीच खुणावत असतो. ऋतू म्हणजे फिरता काल. कालचक्र अव्याहतपणे पुढं जात असतं. डोळ्यांसमोर ऋतू कुस बदलतात. सृष्टीची रुपंही बदलतात. निसर्गाच्या लावण्यविभ्रमाचं अनोखं जग आपल्या पुढ्यात येऊन उभं राहतं. उत्तर-दक्षिण पसरलेल्या सह्यकड्याच्या कुशीत मनमुराद भटकताना जीवाला वेड लावणारं हे अनुपम वैभव पाहणं म्हणजे एक मर्मबंधातली ठेव असते.
*भाऊसाहेब चासकर,*
9422855151
bhauchaskar@gmail.com
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home