Thursday, February 22, 2018

bhandardara














rahibai popere







* इमानदारीचं फळ *

* इमानदारीचं फळ *
सकाळची वेळ.शिल्पाने भाजीबाजाराच्या कडेला गाडी लावायला ड्रायव्हरला सागितलं आणि गाडीतून उतरुन ती एका भाजीच्या गाडीकडे निघाली.तिला असं सकाळी भाजी घ्यायला फार आवडायचं. कलेक्टर झाल्यापासून तिला वेळ फार कमी मिळायचा पण जमेल तेव्हा ती भाजी आणायला निघायची.
भाजीच्या गाडीवर एक नऊ-दहा वर्षाची गोड चेहऱ्याची मुलगी बसली होती. भाजी घेऊन शिल्पाने तिला पर्समधून पैसे दिले.तेवढ्यात फोन वाजला तशी मोबाईलवर बोलता बोलता ती आपल्या गाडीकडे आली.बोलणं संपल्यावर ती गाडीत बसणार तेवढ्यात तिला मागून कोणीतरी स्पर्श केल्यासारखं जाणवलं.चमकून तिने मागे वळून पाहीलं तर भाजीवाली मुलगी उभी होती.
"काय झालं?पैसे तर दिलेना मी तुला?"
त्यामुलीने काही न बोलता पर्स पुढे केली.
"तुमची पर्स.गाडीवर राहीली होती."
शिल्पाने ती पर्स हातात घेऊन पाहीली.पैसे,क्रेडिट कार्ड्स, बँकेचे कार्ड्स जागच्या जागी होती.तिला त्या मुलीच्या इमानदारीचं कौतुक वाटलं.
"थँक्स बेटा.काय नाव तुझं?"
"सोनाली"
तेवढ्यात फोन वाजला आणि शिल्पा बोलता बोलता गाडीत बसली.त्या मुलीने दुर जाणाऱ्या गाडीकडे क्षणभर बघितलं आणि मग ती आपल्या भाजीच्या गाडीकडे निघाली.
संध्याकाळी आँफिसमधून परत आल्यावर चहाचे घोट घेता घेता शिल्पाला त्या भाजीवाल्या मुलीची आठवण झाली आणि दुसऱ्या क्षणाला तिला तिचा भुतकाळ आठवला.होय असंच तर घडलं होतं तिच्याबाबतीत! आणि तिच्या इमानदारीचं जे बक्षीस मिळालं होतं त्यामुळेच तर ती इथपर्यंत पोहोचली होती.सगळा जीवनपट शिल्पाच्या डोळ्यासमोरुन सरकू लागला.
अठरा वर्षांपुर्वीची ती गोष्ट.शिल्पा तेव्हा पाचवीत होती.दुपारची वेळ.शाळा आटोपून शिल्पा आपल्या घराकडे चालली होती.चालता चालता अचानक तिला आपल्या पायाने काहीतरी उडाल्याचं जाणवलं.पुढे जाऊन पहाते तर एक पाकिट पडलेलं दिसलं.उत्सुकतेने तिने ते उचललं आणि उघडून पाहीलं.नोटांनी गच्च भरलेलं होतं ते पाकिट.तिचं ह्रदय धडधडू लागलं.आजच शाळेत बाई सांगत होत्या.ईमानदारीचं फळ गोड असतं म्हणून!ते पाकिट तिथंच टाकून द्यावं असं तिला वाटू लागलं.काय करावं काय नाही या संभ्रमात तिनं आजुबाजुला पाहीलं.एक माणूस आपल्या आलिशान कारला टेकून फोनवर बोलत होता.नक्कीच!नक्की त्याचंच असावं हे पाकिट.शिल्पा विचारातच त्याच्याजवळ पोहोचली.त्याच्या हाताला स्पर्श करुन तिने त्याचं लक्ष वेधून घेतलं.
"काय आहे?" बोलण्यात व्यत्यय आल्यामुळे त्याने थोडं चिडूनच विचारलं.
"हे पाकिट तुमचं आहे?"
शिल्पाने पाकिट पुढे करत विचारलं.पाकिट पाहून तो चमकला.झटकन त्याचा हात पँटच्या मागच्या खिशाकडे गेला.
"हो माझंच आहे ते.कुठं सापडलं?"
"त्या तिथे पडलं होतं" शिल्पा पाकिट सापडलेल्या जागेकडे बोट दाखवत म्हणाली.
त्याने पाकिट उघडून पाहीलं.सगळं जागच्या जागी असलेलं पाहून एक दिर्घ निश्वास सोडला.तेवढ्यात मागून दुसऱ्या गाडीचा हाँर्न वाजला.त्या माणसाने पटकन पाकिट खिशात कोंबलं आणि गाडीत बसून गाडी पुढे नेली.शिल्पाही आपल्या रस्त्याने पुढे निघाली.घरी पोहोचतांना शिल्पा खुप आनंदात होतीआपल्या इमानदारीचा तिला अभिमान वाटत होता.घरी जाऊन कधी एकदा आईला ही घटना सांगते असं तिला झालं होतं.
ती घरी आली तेव्हा आई चुलीवर पोळ्या करत होती.तिचं ते झोपडीवजा घर धुराने भरलं होतं.शिल्पाने दप्तर एका बाजुला टाकून आईला मोठ्या अभिमानाने झालेली घटना सांगितली.तिला वाटलं आई तिला शाबासकी देईल.पण पोळ्या करणं सोडून आई उठली.शिल्पाला धरुन हातातल्या लाटण्यानेच तिला मारु लागली.
"कारटे.इथे खायला काही नाहीये आणि तू हातातली लक्ष्मी फेकून दिली.काय गरज होती तुला ते पाकीट परत करायची.टाकून द्यायचं होतं दप्तरात! तुझ्यावर कोणाला संशय आला असता?" बोलता बोलता आई शिल्पाला मारत होती.शिल्पा जोरजोरात रडत होती,आईला 'नको ना मारु आई'अशी विनवण्या करत होती.आईच्या हातातल्या बांगड्या फुटल्या तेव्हाच शिल्पाची सुटका झाली.
संध्याकाळी तिचा बाप दारु पिऊन आला.शिल्पाचा रडवेला चेहरा पाहून त्याने काय झालं विचारलं.शिल्पा काही बोलायच्या आतच तिच्या आईने सगळी कहाणी त्याला सांगितली.शिल्पाला वाटलं बाप तरी तिला सहानभुती दाखवेल.पण त्याने तिच्याच दप्तरातील पट्टी काढून तिला मारायला सुरुवात केली.सोबतीला शिव्या होत्याच.शिल्पाला मारणं चालू असतांना तिचा लहान भाऊ एका कोपऱ्यात थरथर कापत रडत होता.इमानदारी दाखवली की काय होतं याची जणू शिकवणच त्याचे आईबाप त्याला देत होते.शिल्पाला मारुन थकल्यावर तिचा बाप दारुच्या नशेत बडबडत बसला.मार खाऊन थकलेली शिल्पा न जेवताच झोपून गेली.
दुसऱ्या दिवशी झालेली घटना शिल्पाने शाळेतल्या मैत्रिणींना सागितली.तिच्यासारख्याच झोपडपट्टीत रहाणाऱ्या त्या मुली.त्यांनी शिल्पालाच दोषी ठरवलं.
दोन दिवसांनी संध्याकाळी शिल्पा आपल्या झोपडीत ग्रुहपाठ करत असतांना तिला बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला.पाठोपाठ दारावर टकटक ऐकू आली.तिची आई दार उघडून बाहेर गेली.
"शिल्पा बाहेर ये.हे कोण आलेत बघ"
धडधडत्या छातीने शिल्पा बाहेर आली.समोर एका आलिशान कारजवळ एक माणूस उभा होता.होय.तोच तो माणूस ज्याला तिने पाकिट उचलून दिलं होतं.तिला पाहून तो हसला.
"हीच ती मुलगी."तो शिल्पाच्या आईला म्हणाला.
" बेटा त्या दिवशी तुला थँक्यू म्हणायचं आणि तुला बक्षीस द्यायचंही राहून गेलं.बोल काय पाहीजे तुला?"
शिल्पा भांबावली.काय बक्षीस मागावं ते तिला कळेना.
" आईस्क्रीम चालेल?"
"हो आईस्क्रीम. मला आईस्क्रीम पाहीजे" शिल्पाच्या आधी तिचा बाहेर आलेला भाऊच आनंदाने ओरडला.शिल्पानेही मान डोलावली.
"चला तर मग.बसा गाडीत"
त्या आलिशान गाडीत बसायच्या कल्पनेनेच दोघं हुरळून गेले आणि पटकन गाडीत जाऊन बसले.शिल्पाच्या आईने नाराजीनेच त्यांच्याकडे पाहीलं.या आईस्क्रीम ऐवजी या शेठजीने पाचशे हजार बक्षीस म्हणून दिले असते तर साचलेली उधारी कमी तरी करता आली असती असं तिला वाटून गेलंं.
शेठजीने त्या दोघांना अगोदर भेळ,पाणीपुरी खाऊ घातली.मग नंतर पोट भरुन आईस्क्रीम.
ते घरी परत आले तेव्हा शिल्पाचा बाप घरात बसला होता.एका मोडक्या खुर्चीवर शेठजी बसले.
" तुमची मुलगी खुप इमानदार आणि हुशारही आहे.आता गाडीत बसल्या बसल्या मी तिला बरेच प्रश्न विचारले.खुप छान उत्तरं दिलीत तिने.मला वाटतं तुम्ही तिला एखाद्या चांगल्या शाळेत टाकावं"
" शेठजी आम्ही बांधकामावर मजुरी करणारी माणसं.आम्हाला ते कसं परवडणार?"शिल्पाचा बाप हात जोडत म्हणाला.
" तुम्ही काही काळजी करु नका.ते काम माझ्याकडे लागलं.तिच्या सर्व शिक्षणाचा खर्च मी करेन.मात्र एक गोष्ट. तिला या वस्तीवर ठेवता येणार नाही.आपण तिला होस्टेलवर ठेवू.त्याचाही खर्च मीच करेन."
शिल्पाच्या बापाला हायसं वाटलं.खाणारं एक तोंड कमी होणार होतं.तो म्हणाला.
"मग तर आम्हाला काहीच अडचण नाही.पोरीचं भलं होतंय त्यातच आमचं सुख!"
शेठजींनी चक्र फिरवली.नगरपालिकेच्या शाळेतून शिल्पा उच्चभ्रूंच्या शाळेत गेली.फाटके कपडे आणि तुटक्या चपलांच्या जागी कोराकरीत युनिफॉर्म आणि चकचकीत बुट आले.नवीकोरी पुस्तकं, आधुनिक स्कुलबँग आली.त्या इंग्लिश बोलणाऱ्या मुलांमध्ये गरीब शिल्पा अवघडून,बावचळून गेली.ती झोपडपट्टीतली आहे हे कळल्यावर बाकीची मुलंमुली तिला टोमणे मारायचे,टिंगलटवाळी करायचे.शिल्पा कोपऱ्यात जाऊन रडत बसायची.हे प्रकार तेव्हाच थांबले जेव्हा वार्षिक परीक्षेत शिल्पा वर्गातून पहीली आली . त्यानंतर शिल्पाने मागे वळून पाहीलं नाही.सातवीत स्काँलरशिप मिळवून तिने शेठजींवरचा आपला भार थोडा हलका केला.दहावीच्या परीक्षेत ती जिल्ह्यात पहीली आली तेव्हा तिच्या आईवडिलांसोबत शेठजींनाही खुप आनंद झाला.एका नामांकित काँलेजमध्ये त्यांनी तिचा प्रवेश करुन दिला.बारावीत तर शिल्पाने कमालच केली.राज्यात ती पहीली आली.ते कळताच शेठजींनी तिला मेडिकल काँलेजमध्ये प्रवेश घेण्याविषयी सुचवलं.पण तिला आय.ए.एस.करायचं होतं.तिचा निर्णय ऐकून शेठजींनी तिला विरोध केला नाही.पदवी मिळवल्यावर शिल्पाने युपीएससीचा अभ्यास सुरु केला.कोणतेही कोचिंग क्लासेस न लावता ती पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली.एक झोपडपट्टीतील मुलगी कलेक्टर झाली.
निकाल कळाल्यावर शेठजी तिला सन्मानाने आपल्या घरी घेऊन गेले.त्यांचा आलिशान बंगला पाहून तिचे डोळे दिपून गेले.बंगल्यापेक्षाही विशाल असलेल्या त्यांच्या मनाने शिल्पा भारावून गेली.शेठजींनी तिची सगळ्या परिवाराशी ओळख करुन दिली.' शिल्पा माझी मुलगीच आहे' असे ते सारखे म्हणत असतांना शिल्पाला अश्रु अनावर होत होते.तिच्या इमानदारीचं केवढं मोठं बक्षीस शेठजींनी तिला दिलं होतं.तिच्या कलेक्टर बनण्याच्या आनंदाप्रित्यर्थ शेठजींनी अख्ख्या झोपडपट्टीला जेवण दिलं.शिल्पाच्या आईवडिलांच्या तर आनंदाला पारावर उरला नव्हता.
एक मुलगी शिकली की घरादाराचा स्वर्ग बनवते हे शिल्पाने सिध्द केलं.नोकरीला रुजू झाल्यानंतर एका वर्षातच तिने आईवडिल आणि भावाला झोपडपट्टीतून बाहेर काढून एका चांगल्या घरात हलवलं.भावाला चांगल्या काँलेजमध्ये घातलं.वयस्कर वडिलांना मजूरी सोडायला लावून दुकान उघडून दिलं.
सकाळी शिल्पा परत बाहेर निघालेली पाहून तिच्या पोलिस अधिक्षक असलेल्या नवऱ्याला आश्चर्य वाटलं.
"आज परत सकाळी कुठे ?"त्याने विचारलं.
"काल माझी पर्स इमानदारीने परत करणाऱ्या त्या मुलीला आयुष्यभराचं बक्षीस द्यायला निघालेय" हे सांगतांना शिल्पाच्या चेहऱ्यावर आनंदासोबतच एक ठाम निश्चय दिसत होता.

Wednesday, February 21, 2018

kumshet










kumshet जलसंधारणातून कुमशेतची बारमाही शेतीकडे वाटचाल शांताराम काळे

जलसंधारणातून कुमशेतची बारमाही शेतीकडे वाटचाल

शांताराम काळे
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018
नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील चाळीसगाव डांग भागातील धारेगाव आदिवासींचे श्रद्धास्थान आहे. या धारेगावच्या प्रांगणात व मुळा नदीचे उगमस्थान असलेल्या आज्या पर्वताच्या पायथ्याशी कुमशेत हे टुमदार गाव वसले आहे. जलसंधारणाच्या विविध कामांतून गावातील पिण्याच्या पाण्याचा टॅंक बंद झाला आहे. शिवारात विविध हंगामांत पिके डोलू लागली आहेत. जोडीला ठिबक सिंचन आहे. पर्यटकांसाठी अत्यंत मनमोहक असलेल्या या गावातील महिला हस्तकलेतून विविध वस्तू तयार करतात. त्या विक्रीतून संसाराला हातभार लावतात.


नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील चाळीसगाव डांग भागातील धारेगाव आदिवासींचे श्रद्धास्थान आहे. या धारेगावच्या प्रांगणात व मुळा नदीचे उगमस्थान असलेल्या आज्या पर्वताच्या पायथ्याशी कुमशेत हे टुमदार गाव वसले आहे. जलसंधारणाच्या विविध कामांतून गावातील पिण्याच्या पाण्याचा टॅंक बंद झाला आहे. शिवारात विविध हंगामांत पिके डोलू लागली आहेत. जोडीला ठिबक सिंचन आहे. पर्यटकांसाठी अत्यंत मनमोहक असलेल्या या गावातील महिला हस्तकलेतून विविध वस्तू तयार करतात. त्या विक्रीतून संसाराला हातभार लावतात.

नगर जिल्ह्यात अकोले या तालुका ठिकाणापासून सुमारे ५५ किलोमीटरवर कुमशेत हे निसर्गाच्या कुशीत वसलेले गाव येते. रामायणात वाल्मीक ऋषींचा आश्रम असल्याचा उल्लेख आज्या पर्वतासंबंधी आहे. हा पर्वत तसेच वाकडा, सुपली, करंडा आदी डोंगरांच्या मध्यावर गावठा, पाटीलवाडी, बोरीची वाडी, ठाकरवाडी, मुडाची वाडी व नाडेकरवाडी अशा सहा वाड्यांचे मिळून कुमशेत गाव तयार झाले आहे. गावाच्या एका बाजूस धारेगाव कोकणकडा आहे.
दुष्काळापासून मुक्ती
कुमशेतचे भौगोलिक क्षेत्र सुमारे ३०२७. ५४ हेक्टर आहे. त्यात वनक्षेत्राचा मोठा वाटा आहे. पावसाळ्यात तीन हजार मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र खडकाळ जमीन असल्याने उन्हाळ्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न जाणवतो. सतत टँकर तर रोजगारासाठी दाही दिशा अशा दुष्काळाच्या झळा सोसणारे गाव आता परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करू लागले आहे. पाणीदार गाव म्हणून आपली ओळख निर्माण करू लागले आहे. विशेष म्हणजे गाव दुष्काळमुक्त होण्यामध्ये व आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यामध्ये लोकसहभाग व त्यातही महिलांचा सहभाग महत्त्वाचा ठरला आहे. बचत गटाच्या माध्यमातूनही गावाचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न होतो आहे.
जलसंधारणातून ठिकठिकाणी अडले पाणी
नजीकच्या काळात कुमशेत गावशिवारात कृषी विभागामार्फत सिमेंट काँक्रीटचे सात दगडी बंधारे, लघू पाटबंधारे विभागाकडून पाच तर लोकसहभागातून वनराई बंधारे झाले. त्यातून डोंगरदऱ्यांतून वाहून जाणारे लाखो लिटर पाणी शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी अडविले. जलयुक्त अभियान कार्यक्रमातून पाणी अडविण्याचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला. तत्कालीन जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनीता भांगरे यांनी पुढाकार घेऊन जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळवण्याचा प्रयत्न केला. बंधाऱ्यांमध्ये मेअखेरपर्यंत पाणी टिकले. त्याचा फायदा म्हणजे गावाला पिण्यासाठी पाणी मिळालेच, शिवाय उन्हाळी पिकेही शेतकरी घेऊ लागला आहे.
शिवारात डोलू लागली विविध पिके
पाटीलवाडी, ठाकरवाडी, चोंढी उत्तर ओढा आदी काँक्रीट बंधाऱ्याच्या काठावरील भात खाचरात गहू, हरभरा, भुईमूग, देशी वाल, वांगी, मेथी, पालक अशी पिके डोलू लागली आहेत. कमी पाण्यावर येणाऱ्या गव्हाच्या वाणाला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले. नैसर्गिक पाण्याचा ओलावा, त्याला बंधाऱ्यातील २५ ते ३० दशलक्ष घनफूट पाण्याची जोड व ठिबक सिंचन यांचा वापर झाला. त्या आधारे कांदा, बटाटा या पारंपरिक पिकांसह आंबा, आवळा, पेरू, बोरे, मेथी अशी विविधताही शिवारात दिसू लागली आहे.
शेतकरी समाधानी
कुमशेत शिवारातील बहुतांश उत्पादने सेंद्रियच म्हणावी लागतील. वेगवेगळ्या हंगामात शेती करणे शक्य झाल्याने रोजगारासाठी होणारी भटकंती थांबली आहे. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनीही झालेल्या कामांविषयी समाधान व्यक्त करून निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन दिले आहे. यावर्षी पाऊस अधिक झाल्याने बंधारेदेखील पूर्ण क्षमतेने भरले आहेत. चारसूत्री भात लागवड करून परिसरात मार्गदर्शकाची भूमिकाच गावाने बजावली आहे.
हस्तकला व्यवसायातून संसाराला हातभार
कृषी विभागाने गावातील महिलांना बांबू उद्योग सुरू करून देण्यासाठीही मदत केली आहे. नेहमीच्या कामातून वर्षातून थोडा फुरसतीचा वेळ मिळतो. त्यावेळी ग्रामस्थ हस्तकलेचा व्यवसाय करतात. पावसाची वाट पाहण्याच्या किंवा पीक तयार होण्याच्या काळात ते आपल्याच शेतीस्त्रोतांच्या आधारे वस्तू तयार करण्याकडे वळतात. अशा हंगामी आदिवासी कारागिरांमध्ये सर्वात उल्लेखनीय कारागीर म्हणजे वेताच्या व बांबूच्या टोपल्या आणि तट्टे विणणारे लोक. पूर्वी बांबूपासून बनविण्यात येणाऱ्या वस्तूंना अधिक मागणी होती. काही वर्षांपूर्वी या वस्तूंचा मोठ्या प्रमाणात घरगुती वापर होत असे. मात्र आताच्या जमान्यातही बांबूपासून हारे, टोपल्या, तट्टे, खुराडे, कणगी आदी घटक बनवून देणारी कुमशेत गावातील आदिवासी कुटुंबीय दोन वर्षे बांबूच्या साहाय्याने बुरूडकाम करीत आहेत. टोपल्या, रोवली, सूप, करंडा आदी वस्तूंचे विणकाम करीत त्यांनी या व्यवसायातून आपल्या संसाराला हातभार लावला आहे.
जलयुक्त शिवार अभियानातून कृषी विभाग व वन विभागाने गावात कामे केली. त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. पाण्याची समस्या दूर झाली अाहे. शेतीशिवार हिरवेगार झाल्याने पर्यटकांचा ओढा इथे वाढू लागला आहे. कुमशेत गाव नजीकच्या काळात पर्यटनासाठी नावारूपास येईल.
- सौ. सुनीता भांगरे,
जिल्हा परिषद सदस्य

शिवारात पाणी आहे, पण वीज नाही. ती उपलब्ध झाल्यास शेतीसाठी बंधाऱ्यातून पाणी उचलल्यास येथील शेती आठमाही होईल. त्या दृष्टीने पावले टाकीत आहोत.
- विठल अस्वले
शेतकरी, कुमशेत
सर्वांच्या मदतीतून गाव बदलतेय
कुमशेतच्या सरपंच सोनाबाई विठ्ठल अस्वले म्हणाल्या की, प्रत्येक उन्हाळ्यात गावाला वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागे. पाण्याच्या टँकरवर सतत अवलंबून राहावे लागे. आता उन्हाळ्यात गावात येणारा पिण्याचा पाण्याचा टँकर बंद झाला आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे. शेतीलाही पाणी उपलब्ध होऊन रब्बी, उन्हाळी क्षेत्र वाढले आहे. गावातील महिलांचा तनिष्का गट स्थापन केला आहे. त्या आधारे वीस महिलांना एकत्र करून छोटे, मोठे उद्योग करण्याचे काम सुरू अाहे. बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी सकाळ रिलीफ फंडातून दोन लाख रुपयांचा निधी मिळाला. हा गाळ खडकाळ माळरानावर असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात टाकला. त्यातून पाच हेक्टर क्षेत्र तयार होऊन त्यात पिके डोलू लागली आहेत. आता या जमिनींची पाणीक्षमताही वाढीस लागली आहे. या बंधाऱ्यांना भेट देण्यासाठी पर्यटक येतात. येथे वस्ती करतात. आमचे ग्रामस्थ त्यांना चुलीवरची भाकर तसेच अन्य जेवण देतात. पर्यटकांसाठी हुरडा पार्टीचे आयोजनही करण्यात येते. त्यातून ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे पर्यटनाचे केंद्र म्हणून आमच्या गावाची ओळख झाली आहे. सरकारने पर्यटन विकासातून निधी दिल्यास तसेच रस्ते काँक्रीटचे तयार झाले तर पर्यटकांचा ओघ अधिक वाढेल, असेही सरपंच सोनाबाईंनी सांगितले.
- सोनाबाई अस्वले, ९४२३१४९१६८
गावात सिमेंट बंधारे, नाला खोलीकरण, गाळ काढणे, गॅबियन वनराई बंधारे आदी कामे झाल्याने पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. गहू, भाजीपाला, उन्हाळ्यात भुईमूग, बाजरी त्याचबरोबर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत आंबा, आवळा आदींचीही लागवड झाली आहे. एक महिन्याचे प्रशिक्षण घेऊन बांबूपासून वस्तू तयार करून महिला त्यांची विक्री पर्यटक व बाजारात करतात. त्यातून त्यांचा आर्थिक स्थर उंचावण्यास मदत होत आहे.
बाळासाहेब मुसमाडे, ९४२२४३०४५१
उपविभागीय कृषी अधिकारी
हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या कुमशेत परिसरावर निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केली आहे. हा परिसर अतिशय निसर्गरम्य असून, पर्यटकांना मोहवून टाकणारा आहे. येथील ग्रामस्थांनी एकोप्याने राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा व प्रगतीची वाटचाल सुरू ठेवावी.
भागवत डोईफोडे, प्रांत, संगमनेर

















Sunday, February 18, 2018

rajur band