संपणार का फरफट माझ्या डामसेवाडीची....?
आदिवासीन्नी सुविधान्ची मागणी करावी की नाही हा प्रश्न तरी आम्ही विचारावा की नाही?
माझे मूळ गाव अकोले तालुक्यातील शेणित हे आहे. त्यामुळे या गावचा इतिहास, भूगोल यांच्याशी माझी नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे येथील प्रत्येक घटना ही माझ्या अस्मितेचा भाग आहे असे मला वाटते. इतकी जाणीव तर आपण आपल्या मातीची ठेवली पाहिजे हे संस्कार आहेत आपल्याच महाराष्ट्र भूमीचे....!
एकीकडे विकासाचे अपचन व्हावे इतका निधी खर्च केला जात आहे, तर दुसरीकडे अकोले तालुक्यातील संघर्षमय ऐतिहासिक वारसा असणारी डामसेवाडी आज उपेक्षित का? असा प्रश्न माझ्या मनाला पडला आणि त्याविषयी आपण लिहिलेच पाहिजे म्हणून थोडासा प्रयत्न केला....
शेणित येथील डामसेवाडी ही अकोले तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि संघर्षशील वाडी आहे, जी आदिवासी अस्मितेचे प्रतीक मानले जाते.( ज्याला इतिहास माहीत आहे, तो हे मान्य केल्याशिवाय राहत नाही) या वाडीने पेशवे, ब्रिटिश आणि इतर सत्ता व्यवस्थांशी संघर्ष करत आदिवासी समाजाच्या स्वाभिमानासाठी आणि अस्तित्वासाठी झुंज दिलेली आहे. आजही डामसेवाडीचा इतिहास महानायक राघोजी भांगरे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडासाठी ओळखला जातो. या भूमीने आदिवासींच्या आत्मसन्मानासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी उभ्या केलेल्या संघर्षांला जिवंत ठेवण्याचे काम करून अकोले तालुक्यातील आदिवासिंवर उपकार केलेले आहेत असे मला वाटते. परंतु दुर्दैवाने याचे भान आजच्या प्रशासकीय व राजकीय व्यवस्थेला नाही असेच म्हणावे लागेल.
महानायक राघोजी भांगरे यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेल्या बंडाला आवश्यक असणारी रसद या वाडीतील लोकांनी जीवावर उदार होऊन पुरवली. त्यातून प्रेरणा घेऊन परिसरातील अनेक गावांतून लोकं पुढे आली व त्यांनी महानायक राघोजी भांगरे यांच्या लढ्याला बळ दिले. यातून प्रेरणा घेऊन अनेक आदिवासी क्रांतिकारक निर्माण झाले.
बाडगीची माची ते डामसेवाडी हा परिसर आदिवासी स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृतींना जागृत ठेवण्याचे काम करत आहे. परंतु दुर्दैवाने आपण आपल्याच या ऐतिहासिक व भौगोलिक महत्त्व असणाऱ्या या वाडीला न्याय देण्यात कमी पडत आहोत.
डामसेवाडीतील समाज बांधवांनी ब्रिटिशांच्या जंगलसंपत्तीच्या शोषणाविरोधात शेणित येथे सन 1930 साली उभारलेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. त्याचेच फलीत म्हणून ब्रिटिशांच्या फोरेस्ट ऍक्टमध्ये आदिवासीन्ना विशेष सवलती देण्यात आल्या.
जंगल आणि जमिनीवरील हक्कांसाठीचा हा आदिवासींचा लढा हा राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्याचा महत्त्वाचा भाग होता.
डामसेवाडीने अनेक संघर्षांचा सामना करून आदिवासींच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि नैसर्गिक अस्तित्वाचे संरक्षण केले आहे याचे भान येथील प्रशासकीय व राजकीय यंत्रणेने ठेवणे आवश्यक आहे.
इतिहासाच्या दुर्लक्षित पानांत डामसेवाडीचा उल्लेख असतानाही आज उपेक्षित आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना या वाडीला विकासाच्या प्राथमिक सुविधाही मिळालेल्या नाहीत. असे असताना आम्ही कोणत्या विकासाचा बडेजाव मिरवत आहोत असा मला प्रश्न पडतो.
डामसेवाडीतील प्रमुख समस्या:
1. पिण्याच्या पाण्याची कमतरता
डामसेवाडीत शुद्ध पाण्याचा अभाव आहे. महिलांना आणि वृद्धांना पाणी आणण्यासाठी दूरवर जावे लागते. पावसाळ्यात धो धो कोसळणारा वारा व अंगाला झोम्बणारी थंडी, त्यात सोसाट्याचा वारा असताना दुरवरून डोक्यावर हंड्यात पाणी वाहून आणावे लागते. प्रत्येक घराला पिण्याचे स्वच्छ पाणी ही नरेंद्र मोदी यांची घोषणा अजूनही कागदावरच आहे की काय असे या वाडीत आल्यावर दिसून येते.
2. रस्त्यांची दुरवस्था :
शेणीत येथील डामसेवाडीपर्यंत जाणारा रस्ता उखडलेला आहे. अपुरा रस्ता विकास व संपर्क साधनांची कमतरता ही गावातील मोठी समस्या आहे.
3. गटार व्यवस्थेचा अभाव
डामसेवाडीत गटारांची कोणतीही व्यवस्था नाही, त्यामुळे आरोग्यविषयक समस्या उद्भवतात.
4. वृद्धांसाठी केंद्राचा अभाव :
डामसेवाडीत वृद्धांसाठी कोणतेही विरंगुळा केंद्र नाही. त्यांना वेळ घालवण्यासाठी आणि आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. का आदिवासी भागातील वृद्धान्ना सन्मानाणे जगण्याचा अधिकार नाही का?
5. आरोग्य सुविधा अपुऱ्या
डामसेवाडीत प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध नाही. कोणतीही आरोग्य समस्या उद्भवली तर लोकांना शेणित गावात जावे लागते. चांगला व पुरेसा रस्ता नसल्याने रात्रीच्या वेळी प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
सरकारकडे मागण्या :
डामसेवाडीच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी येथील लोकं पुढील मागण्या करत आहेत, पण दुर्दैवाने आपले सरकार त्याकडे लक्ष्य देत नाही....
1. पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना :
गावात पाणीपुरवठा योजना राबवली जावी आणि जलसंधारण प्रकल्प उभारले जावेत.
2. रस्त्यांचा विकास :
शेणीत येथून डामसेवाडीपर्यंतचा रस्ता पक्का आणि सुलभ करावा.
3. गटार व्यवस्थापन सुधारणा :
गटारांचे योग्य व्यवस्थापन करून गावातील स्वच्छता राखली जावी.
4. विरंगुळा केंद्रांची निर्मिती :
वृद्ध आणि महिलांसाठी विरंगुळा केंद्र व लहान मुलांसाठी खेळण्याच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
5. आरोग्य सुविधा निर्माण :
डामसेवाडीत प्राथमिक आरोग्य केंद्र उभारून वैद्यकीय सेवा पोहोचवावी. फिरते वैद्यकीय पथक नेमणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे वृद्ध, गरोदर माता व महिला यांच्या आरोग्याची वेळीच काळजी घेता येईल.
6. शिक्षणाचा दर्जा उंचावणे :
गावात उच्च दर्जाचे शिक्षक, प्रयोगशाळा आणि वाचनालय सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात.
जागतिक पातळीवर सरकार आपल्या विकासाची जाहिरात करत असताना अकोले तालुक्यातील डामसेवाडीतील लोकांना सरकारकडून दुर्लक्षित का केले जात आहे? हा अगदी साधा प्रश्न माझ्या मनात येतोय...
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना, डामसेवाडीला मूलभूत सुविधा देण्यासाठी सरकार आता तरी पावले उचलणार का?
आदिवासींच्या संघर्षाचा इतिहास जागतिक आदिवासी दिनाला डोक्यावर घेऊन मिरवणारे आपण त्यांचा वर्तमान का विसरतो?
डामसेवाडी हा फक्त इतिहासाचा एक भाग नाही, तर आजही संघर्ष आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. डामसेवाडीतील लोकांचा प्रश्न हा फक्त त्यांचा नाही, तर संपूर्ण समाजाचा आहे. सरकारने आणि प्रशासनाने या वाडीच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे. डामसेवाडीतील लोक माणूस म्हणून जगण्यासाठी त्यांच्या हक्कांसाठी लढत आहेत. त्यांना न्याय मिळवून देणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारीच नाही, तर नैतिक कर्तव्यही आहे. ही नैतिकता जोपासण्याची जबाबदारी कोणाची?
- एक शेणितकर
( फोटो : नामदेव डामसे यांनी सोशल मीडियातून पोस्ट केलेले आहेत)
#डामसेवाडी #आदिवासीसंघर्ष #न्यायाचीप्रतिक्षा
#अकोलेविधानसभा