Monday, June 1, 2015

इथे नांदते सुख-समृद्धी

तालुक्यातील छोटे आणि सुखी गाव म्हणून विशेष ओळख असलेले गाव म्हणजे तिरवडे तर्फ सौंदळ गाव.
भुईबावडा - तालुक्यातील छोटे आणि सुखी गाव म्हणून विशेष ओळख असलेले गाव म्हणजे तिरवडे तर्फ सौंदळ गाव. या गावाचे क्षेत्रफळ ६९७ हेक्टर एवढे लहान असून लोकसंख्या सहाशेच्या दरम्यान आहे. गावचा विस्तार अवघ्या चार वाडय़ांमध्ये झालेला आहे. प्रत्येक नागरिकाला समाधान वाटावे, अशी विकासाची कामे गावात झाली आहेत. यामुळे हे गाव आनंदाने नांदत आहे. संगणकीय युगात आपली ग्रामपंचायत कुठेही मागे राहू नये यासाठी विशेष ओळख बनवण्याचा ध्यास सरपंच मनोहर घागरे यांनी घेतला आहे.
गावात होणा-या विकासकामांमुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. तिरवडे तर्फ सौंदळ गावाची वाटचाल शांततेकडून समृद्धीकडे होत असताना दिसत आहे. गावाची विशेष ओळख अशी की, ग्रामपंचायत स्थापनेपासून आतापर्यंत गावात बिनविरोध निवडणुका पार पाडल्या जात आहेत. गावातील तंटे गावातच मिटवले जातात. गावचे तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र इंदुलकर तसेच गावचे पोलिस पाटील दीपक घागरे या समितीमार्फत गावातील तंटे मिटवण्याचे काम करतात. गावचे सरपंच घागरे यांनी ग्रामपंचायत निधीचा प्रत्येक वाडीत समतोल विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. तिरवडे तर्फ सौंदळ गावात पाणीपुरवठय़ाची सोय चांगली आहे. गावात मुबलक पाणी आहे. येथे कोणाच्याही डोक्यावर हंडा दिसत नाही. व्यसनापासून दूर असणारे गाव म्हणूनही या गावाला ओळखले जाते. गावातील वाडीवाडींमध्ये रस्त्यांच्या सोयी आहेत. गावातील ८० टक्के घरापर्यंत गाडी जाण्याच्या सोयी उपलब्ध आहेत. गावच्या वेशीवरून वाहणा-या जामदा नदीवर कार्जिडा येथे कालवा बांधण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. या कालव्याच्या उजव्या कालव्याचे पाणी थांबवल्यास गावाला पाणी मिळणार आहे. यामुळे गावात कृषी संजीवनी होणार आहे. येथे जामदा नदीजवळील जमिनीत उसाच्या औद्योगिक शेतीची लागवड केली जात आहे. गावाची लोकसंख्या ६००च्या दरम्यान असल्याने गावात बाजारपेठ नाही. आरोग्याच्या सोयी शेजारील नेर्ले गावात पुरवल्या जातात. नर्ले येथे आरोग्य उपकेंद्राची सुसज्ज इमारत आहे.
या गावचे ग्रामदैवत श्रीदेव गांगेश्वर हे आहे. श्रीगांगेश्वर पंचायतन हे प्रसिद्ध व जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या देवस्थानापैकी एक आहे. मंदिराचे बाहेरील लाकडी खांब पाषाणी असून हे खांब मंदिराचे आकर्षण ठरतात. मंदिरातील गाभाराही लाकडी असून तो आकर्षक व चित्तवेधक आहे. या देवालयात त्रिपुरारी पौर्णिमा, घटस्थापना, महाशिवरात्रीनिमित्त उत्सव साजरे केले जातात. मोठय़ा उत्साहाने स्थानिक तसेच चाकरमानी मंडळी यात सहभागी होतात. पुरातन काळातील हे मंदिर असून मंदिराचे कौलारू छत व मंदिरासमोरील दगडाची दीपमाळ आकर्षक आहे. गावरहाटीप्रमाणे मानपानानुसार सर्व वार्षिक धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी पार पाडले जातात. या देवालयाबरोबर गावात इतर मंदिरे आहेत. या देवस्थानाचीदेखील पंचक्रोशीत प्रसिद्धी आहे. या ठिकाणी अक्षय्य तृतीयेला मोठा उत्सव साजरा केला जातो. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात पालखीची मिरवणूक निघते. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
तिरवडे तर्फ सौंदळ गावाने सन २००८-२००९ या वर्षात निर्मल ग्रामपुरस्कार पटकावला. त्याचप्रमाणे सन २०१०-११ या वर्षी महात्मा गांधी तंटामुक्त गाव हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. गावातील अनेक महान व्यक्तींनी देशसेवेसाठी आयुष्य वेचले. कै. बाबुराव इंदुलकर यांनी सैनिक म्हणून कामगिरी केली. गावात दोन प्राथमिक शाळा तसेच दोन अंगणवाडय़ा अशी ज्ञानदानाची मंदिरे आहेत. गावामध्ये विकासकामे, सार्वजनिक तसेच धार्मिक कामांबरोबरच शैक्षणिक कामकाजाचा दर्जाही उंचावलेला दिसतो.

No comments:

Post a Comment