Monday, June 1, 2015

म्हातारे, म्हातारे वाट फावांदे!

‘म्हातारे बाय तुझो वरांडो वाडादे आणि वाट फावांदे’ ग्रामीण भागातले जगणेच वेगळे असते.
munge stopआचरा- ‘म्हातारे बाय तुझो वरांडो वाडादे आणि वाट फावांदे’ ग्रामीण भागातले जगणेच वेगळे असते. प्रत्येक पाऊल कष्टाचे असते. ओझे वाहण्यासाठी कोणतेही साधन नाही. त्यामुळे डोक्यावरून नेण्यात येणारे जड ओझे आणि पायाखाली न संपणारी अवघड वाट अशा अवघडलेल्या अवस्थेत या वरांडय़ाकडे आल्यावर वाटसरूच्या तोंडातून आपोआपच वाक्य यायचे आणि हात वळायचे ते दगड टाकायला. यामुळे ओझे हलके होऊन वाट लवकर संपायची, असा अनुभव त्यावेळच्या लोकांना येऊ लागला. यातूनच वरांडय़ाला दगड टाकण्याची प्रथा सुरू झाली. काळ बदलत गेला, वाहतुकीची साधने बदलली आणि एस.टी.च्या जमान्यात मुणगे आडबंदर रस्त्यावरील या वरांडय़ाला ‘म्हातारीचा वरांडा एस.टी.स्टॉप’ म्हणून शासन मान्यताही मिळाली. आता इथे निवाराशेडही उभी राहिली आहे. मुणगे (ता.देवगड) आडबंदर रस्त्याला मुणगे आपयवाडी रस्ता ज्याठिकाणी जोडला जातो त्या तीन तिठय़ावर म्हातारीचा वरांडा कित्येक र्वष उभा आहे. सुंदर समुद्रकिनारा आणि आडबंदर येथे पूर्वी सुरू असलेली बोट सेवा यामुळे मुणगे आडबंदर हा रस्ता पूर्वी जरी पक्का नसला तरी जवळचा आणि सोयीचा म्हणून गजबजलेला असायचा. याच रस्त्यावर तीन तिठय़ावरच वसलेल्या म्हातारीच्या वरांडय़ाच्या निर्मितीबाबत अनेक कथा सांगितल्या जातात.
शिवपूर्व काळापासूनच याचे अस्तित्व असावे, असे मानले जाते. मुणगे आपय वाडीतील ८६ वर्षाचे कृष्णा दाजी पेडणेकर सांगतात, पूर्वी या भागात एक-दोन घरं होती. तेथे एक श्रीमंत म्हातारी राहायची. तिला कोणी मुलंबाळ नसल्याने ती मेल्यावर तिचे घर पोरके झाले.
तिची गडगंज संपत्ती कोणालाच सापडली नाही. पण ती मेल्यावर वरांडा मात्र तयार झाला. त्यामुळे तिची सर्व संपत्ती या वरांडय़ाखालीच पुरलेली असावी, असा समज होता. ही संपत्ती मिळविण्यासाठी त्यावेळच्या काही लोकांनी वरांडा खोदण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या हाती दगड -मातीशिवाय काही लागले नाही. परंतु खोदकाम करणा-या मंडळींना म्हातारी दिसू लागली. ही मंडळी घाबरली. त्यांनी दगड पुन्हा जागेवर टाकले. म्हातारीच्या त्या भागावरचा दगड कोणी उचलला तर त्याला म्हातारी त्याला त्रास द्यायची आणि म्हातारी त्याला साथ करायची. त्याच्या इच्छापूर्तीसाठी प्रयत्न करायची. यामुळे या परिसरात येणारा-जाणारा म्हातारीच्या या भागातला दगड काढण्यापेक्षा नव्याने आणखी एक दगड टाकण्याचा प्रयत्न करू लागला. आजही ही प्रथा सुरूच आहे. आता तर पंचक्रोशीतील मंडळी या भागातून जाताना म्हातारीला दगड टाकल्याशिवाय जात नाही. वर्षानुवष्रे दगड पडून या भागात दगडांचा मोठा थर साचला आहे. ग्रा.पं.सदस्य धर्माजी आडकर याविषयी सांगतात.
पूर्वी आडबंदराला जेव्हा बोट सेवा सुरू होती. त्यावेळी या कातळावरून नेहमी रहदारी असायची. आडबंदर आपयवाडी आचरा, जामडूल, पिरावाडी या भागात १०० वर्षापूर्वी काथ्या उद्योग भरभराटीस आला होता. त्यावेळी वाहतुकीची साधने आतासारखी नसल्याने डोक्यावरूनच सुंभाचे जड ओझे घेऊन बाजाराला जावे लागायचे. त्यामुळे सुंभाचे जड ओझे नेणारा ओझेकरी आपय आडबंदराची चढ चढल्याने दमून या वरांडय़ाच्या वडाच्या छायेत विश्रांती घ्यायचा.
या वरांडय़ाला साकडे घालायचा ‘म्हातारे तुझो वरांडो वाढा दे आणि वाट फावांदे’ म्हणजेच वाट लवकरच संपू दे आणि या वरांडय़ात दगड टाकला जायचा. कालानुरूप ही प्रथा भावनिक प्रथा म्हणून रुजू झाली. या भागात कातळी जमिनीवर मातीचे रस्ते निर्माण झाले त्यांचे डांबरीकरण झाले आणि २०/२५ वर्षापूर्वी आडबंदरला सुरू झालेल्या एसटी प्रवासाने म्हातारीचा वरांडा स्टॉप म्हणून प्रसिद्धही झाला .

No comments:

Post a Comment