Thursday, December 26, 2024

ऐसा नेता होणे नाही

मधुकरराव पिचड राजूरच्या एका शिक्षकाच्या घरात जन्मलेला एक मुलगा ज्याला स्वतःची जन्मतारीख सुद्धा माहीत नव्हती त्यामुळे ते 1 जून ही कॉमन जन्मतारीखच लावत असत त्या मधुकरराव पिचड यांचे आयुष्य हा एक खरेचच अचंबित करणारा प्रवास होता. एक साधारण आदिवासी मुलगा कुठल्याही पार्श्वभूमीविना केवळ स्वकर्तृत्वाने देशातील सर्वात महत्वाच्या आदिवासी नेत्यांपैकी एक बनतो, महाराष्ट्राच्या राजकारणातील मुख्य फळीतील नेता बनतो ही खरेच आश्चर्याची बाब आहे. पुण्याला फर्ग्युसन कॉलेजला शिक्षण घेत असलेल्या मधुकरराव पिचड यांना तिथेच विद्यार्थी नेत्याच्या रूपाने राजकारणाचे बाळकडू मिळाले. त्यानंतर तालुक्यात आल्यावर त्यांनी समाजकार्यात स्वतःला झोकून घेतले. सत्तरच्या दशकात पंचायत समिती सदस्य व सभापती म्हणून सुरू झालेली त्यांची राजकिय कारकीर्द सलग सात वेळा म्हणजे जवळजवळ 35 वर्षे तालुक्याचा आमदार तसेच विविध महत्वाची कॅबिनेट मंत्रीपदे भूषविण्यात व्यतीत झाली. 1978 च्या पहील्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागून थेट चौथ्या स्थानी फेकले गेलेल्या मधुकरराव पिचड यांनी दोनच वर्षांनी 1980 मध्ये विधानसभा जिंकून त्यानंतर सलग 7 वेळा निवडून येत तब्बल 35 वर्षे एकहाती विधानसभेत अकोले तालुक्याचा व आदिवासी जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडला. राजूर येथे तालुक्यातील पहिले दूध संकलन केंद्र त्यांनीच सुरू केले. त्या केंद्रात पहील्या दिवशी केवळ 30 लिटर दुध जमा झाले होते. पण संथ सुरुवात असली तरी ही अकोले तालुक्याच्या जनतेसाठीची एका प्रमुख आर्थिक स्रोताची मजबूत पायाभरणी होती. तेव्हा 30 लिटरने सुरू झालेले दूध संकलन आज तालुक्यात रोजच्या एकूण 2 लाख लिटरपर्यंत येऊन पोचले आहे. पिचड साहेबांना महाराष्ट्राचे जलनायक म्हंटले जाते. अकोले तालुक्यात आज तब्बल 19 धरणे आहेत. केटी बंधाऱ्यांची तर गणतीच नाही. एक भंडारदरा सोडले तर बहुतेक ही सगळी धरणे पिचड साहेबांच्याच काळात बांधली गेली असावीत. निळवंडे धरण हा तर साहेबांच्या परफेक्ट धोरणांचा व दूरदृष्टीचा मानबिंदू आहे. निळवंडे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या बाबतीत पिचड साहेबांनी केलेले कार्य हे राज्यातच नाही तर देशात एक आदर्श कार्य म्हणून नावाजले जाते. कित्येक धरणे व वीजप्रकल्प बांधून पिचड साहेबांनी नुसता अकोले तालुकाच नाही तर सगळा नगर जिल्हा सुजलाम करण्यात प्रमुख वाटा उचलला आहे. धरणांच्या रूपाने पिचड साहेबांनी तालुक्याच्या व जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राला एक नवी संजीवनीच दिली आहे. सोबतीला रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून त्यांनी रोजगार निर्मिती बरोबरच आदिवासी भागातील कितीतरी पडीक जमीन ही पिकाखाली आणली व आदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासास वेग मिळवून दिला. शेजारचा संगमनेर तालुका हा अकोले तालुक्यापेक्षा अतिशय समृद्ध आणि प्रगत व श्रीमंत तालुका समजला जातो. पण मी साधारण 1998 ते 2002 या काळात संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात फिरलो असता लक्षात आले की संगमनेर या तालुक्याच्या ठिकाणापासून अगदी 10-15 किमी इतकेच अंतर असलेल्या काही गावांत देखील बरे रस्ते नव्हते की एसटी सुद्धा जात नव्हती. त्याउलट त्याचवेळी अकोले तालुक्यातील पेठेची वाडी या अतिदुर्गम गावात सुद्धा कच्चा का होईना पण मोटारेबल रस्ता होता. पाचनई या दुर्गम गावात पिचड साहेबांच्या काळातच पक्का डांबरी रस्ता बनला होता व एसटी सुद्धा जात होती. अगदी प्रत्येक वाडीवस्तीवर जात नसली तरी अपवाद वगळता तालुक्यातील जवळजवळ प्रत्येक गावात एसटी जात होती. म्हणजे दूध संकलनातून आर्थिक मिळकत देऊन, शेतजमीनीला पाणी उपलब्ध करून देऊन ते थांबले नाहीत तर विकासासाठी आवश्यक असलेले दळणवळणासाठीचे रस्तेही त्यांनी अगदी अतिदुर्गम भागापर्यंत निर्माण करून घेतले. अकोले तालुक्याची कनेक्टिव्हिटी इतर अनेक तालुक्यांपेक्षा त्यांनी नक्कीच खूप उत्तम केली. अकोले तालुका हा मुखत्वे आदिवासी तालुका असल्याने व अतिपर्जन्यवृष्टीचा तालुका असल्याने इथे साखर कारखाना चालू शकणार नाही या मतप्रवाहाला छेद देत पिचड साहेबांनी जिद्दीने अगस्ती सहकारी कारखाना स्थापन केला व अगदी यशस्वीपणे तो आजतागायत चालवूनही दाखवला. आज तालुक्याच्या आर्थिक समृद्धीत अगस्ती कारखान्याचाच सर्वात मोठा वाटा आहे असे निर्विवादपणे म्हणता येईल. शिक्षण हाच समाजाच्या विकासाचा सर्वात महत्वाचा मार्ग आहे हे ओळखून पिचड साहेबांनी शिक्षणाची गंगा खेडोपाड्यातील गरीब आदिवासी व दुर्बल घटकापर्यंत नेण्यासाठी आदिवासी उन्नती संस्थेची स्थापना करून तालुक्यात अनेक ठिकाणी शाळा व आश्रम शाळांचे जाळे उभे केले. आज अनेक शिक्षणसम्राटांनी शिक्षण क्षेत्रात भरमसाठ फी आकारून त्याला आर्थिक मिळकतीचे एक बाजारी साधन बनवून ठेवले आहे. पण उन्नतीच्या शाळांच्या माध्यमातून पिचड साहेबांनी विनामूल्य वा अगदी नाममात्र फी घेऊन आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गोरगरीब आदिवासी बांधवांच्या लेकरांना शिक्षणाची संधी मिळवून दिली आहे. महाराष्ट्रातील आदिवासी जनतेसाठी पिचड साहेबांचे योगदान अगदी अतुलनीय असेच आहे. आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट बनवण्याचे व मांडण्याचे काम संपूर्ण देशात सगळ्यात आधी पिचड साहेबांनीच केले. मुख्यमंत्री श्री शरद पवार यांच्या सोबतीने त्यांनी स्वतंत्र आदिवासी मंत्रालय व आदिवासी बजेटची निर्मिती केली तसेच समाजकल्याण मंत्रालयातून वेगळा व स्वतंत्र असा आदिवासी विकास विभाग सुद्धा स्थापन केला. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून अनेक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प उभारले जाऊन तसेच विविध कल्याणकारी योजना राबवून महाराष्ट्राच्या आदिवासींचे जीवनमान उंचावण्यात मोलाची भूमिका बजावली जात आहे. स्वतंत्र आदिवासी बजेट मांडण्याचे जे महत्वाचे काम देशात सर्वप्रथम पिचड साहेबांनी केले त्यांच्यानंतर देशातील इतरही अनेक राज्यांनी पिचड साहेबांचा कित्ता गिरवत स्वतंत्र आदिवासी बजेटचा स्वीकार केला. आदिवासी मंत्रालयाची स्थापना आणि पहिले मंत्रिपद हे पिचड साहेबांनीच भूषविले. आदिवासींमधील बोगस आदिवासींची घुसखोरी थांबवण्यासाठी पिचड साहेबांनी खूप महत्वाचे प्रयत्न केले. गोविंदजी गारे आणि मधुकरराव पिचड यांनी या बाबतीत फार मोठे योगदान दिलेले आहे. आजही महाराष्ट्रातील बोगस आदिवासींचे सर्वात मोठे शत्रू हे मधुकरराव पिचड आणि गोविंदजी गारे हेच आहेत. महाराष्ट्रात आदिवासी जमीन कायदा व वनहक्क कायदा यांच्या सुदृढीकरणात व अंमलबजावणीत त्यांनी अतिशय महत्वाचे योगदान दिले. ते सक्रिय असतानाच्या काळात आदिवासींच्या विविध महत्वाच्या प्रश्नांवर चोख आणि नेमक्या मार्गाने प्रशासकीय व राजकीय पातळीवर नेटाने झुंज देणारे महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही त्यांच्याइतके सामर्थ्यवान व प्रभावी नेतृत्व अन्य कोणतेही नव्हते असे म्हणता येईल. वैयक्तिकरित्या तर त्यांनी किती जणांची मदत केली व किती आयुष्ये घडवली याला गणती नाही. कित्येक जणांनी माझे आयुष्य हे केवळ त्यांच्यामुळेच घडले असे सांगितलेले व लिहिलेले मी ऐकले व वाचले आहे. पिचड साहेब हे बहुआयामी असे नेते होते. महाराष्ट्र राज्याची आदिवासी विकास, कृषी, रोहयो, पशुसंवर्धनवन व पर्यावरण मंत्री, दुग्ध विकास, मत्स्य विकास मंत्री, परिवहन व पूनर्वसन विकास मंत्री अशी विविध क्षेत्रातील मंत्रीपदे त्यांनी सक्षमपणे व कार्यक्षमरीत्या भूषविली आहेत. काही जिल्ह्यांचे पालकमंत्रीही ते राहीले आहेत. असे किती नेते आहेत या देशात ज्यांनी इतक्या विविध क्षेत्रांत यशस्वीपणे मंत्रीपदे भूषवली आहेत? फार पूर्वी एक प्रशासकीय अधिकारी मला म्हणाले होते की महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ सलगपणे लाल दिव्याची गाडी वापरणारा माणूस कोण असेल? मी म्हणालो शरद पवार, कारण तेच तेव्हा सर्वात मोठे नेते होते. पण ते अधिकारी म्हणाले शरद पवार नाहीत तर ते आहेत तुझ्याच तालुक्याचे आमदार म्हणजे मधुकरराव पिचड. तर असे होते की जेव्हा महाराष्ट्रात पहिल्यांदा काँग्रेस जाऊन युतीचे सरकार आले होते तेव्हाही पिचड साहेब हे विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. विरोधी पक्षनेत्याला सुद्धा कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा असतो आणि त्यामुळे लाल दिव्याची गाडी त्यांना त्या पाच वर्षांत सत्ता नसतानाही मिळाली होती. विरोधी बाकांवर बसल्यामुळे इतर कोणत्याही नेत्याला ही सुविधा व बहुमान मिळाला नाही. सलग ३० वर्षे त्यांना हा बहुमान मिळाला. अकोल्यात ऐंशीच्या दशकात पाण्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे पिचड यांच्यावर खटले दाखल झाले होते. त्यामुळे १९८४ मध्ये नव्याने सरकार स्थापन करणाऱ्या वसंतदादा पाटील यांनी त्यांना मंत्रिपद देण्याचा निर्णय घेतल्यावर अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता. हे कळल्यावर केवळ मधुकरराव पिचड यांच्यावरील हे खटले रद्द करून त्यांना मंत्रिपदाची शपथ घेता यावी म्हणून वसंतदादा पाटलांनी चक्क आपला शपथविधी चार तास थांबवून ठेवला होता. आजकालच्या शपथविधीचें ग्रँड सोहळे पाहता एका नव्याने व पहील्यांदाच आमदार झालेल्या व्यक्तीसाठी चक्क मुख्यमंत्र्यांनीच सगळा शपथविधी पुढे ढकलणे ही बाब ती व्यक्ती किती महत्वाचे नेतृत्व होते हेच अधोरेखित करते. व्यक्तिगतरित्या बोलायचे झाल्यास पिचड साहेब हे एक अगदी राजबिंडे आणि रुबाबदार असे व्यक्तिमत्व होते. मला तर त्यांच्या चेहऱ्यात राज कपूर यांचीच छटा दिसत असे, तसाच अतिशय गोरा वर्ण आणि तसेच नाक व चेहरा.! पिचड साहेब हे अतिशय बुद्धिमान व्यक्ती तर होतेच पण त्यांची स्मरणशक्ती सुद्धा अत्यंत दांडगी होती. तालुक्यातील प्रत्येक गावातील अनेक लोकांना ते नुसते नावानेच नाही तर त्यांच्या आयुष्यात काय चालले आहे या तपशिलांनिशी ओळखत असत. कुठे काय काम चालू आहे वा कोणते काम रखडले आहे याची त्यांना पूर्ण आणि अपडेटेड माहिती असे. कधी काय झाले होते व तेव्हा कोणता माणूस कसा वागला होता हे त्यांच्या कायमचे आठवणीत राहत असे. एवढेच नाही तर मूळचे हाडाचे काँग्रेसी असल्याने (शेवटी मुलाच्या आग्रहामुळे बीजेपीत गेले असले तरी) त्यांनी नेहमी अहिंसा आणि सहिष्णूतेचाच पुरस्कार केला. त्यांनी कधी कुणावर हिंसक डूख धरला नाही की कुणाचे बदल्याच्या भावनेतून नुकसान केले नाही. स्वतः आदिवासी समाजाचे असूनही त्यांनी कधीही बिगर आदिवासींसोबत भेदभावाची वा अलिप्ततेची भूमिका घेतली नाही. आणि उलटपक्षी अंदर की बात सांगायचीच झाली तर आजही त्यांच्या अगदी जवळच्या बहुतांश कार्यकर्त्यांना देखील वाटते की उलट त्यांनी बिगर आदिवासींनाच अंमळ जास्त फेवर दिला. आजच्या फक्त माझी जात आणि फक्त माझा धर्म हेच श्रेष्ठ या वैचारिक घाणीत लोळण्याच्या वातावरणात सगळ्यांना असे समानपणे सोबत घेऊन चालण्याची पिचड साहेबांची ही जीवन कारकीर्द म्हणजे खरेच एक सन्माननीय अपवादच म्हणावी लागेल. त्यांना राजकीय विरोधक व शत्रू खूप असतीलही पण ते सगळे त्यांच्या राजकीय भूमिकेचे विरोधक आहेत. एक व्यक्ती म्हणून पिचड साहेब हे नक्कीच अजातशत्रू होते. जे लोक त्यांना सोडून विरोधात गेले ते सुद्धा हे मान्य करतील की पिचड साहेबांनी कधीही कुणावर पातळी सोडून टीका केली नाही वा कुणाचे आयुष्य ते विरोधात गेले म्हणून सूडाने उध्वस्त केले नाही (हेही खूपच दुर्मिळ आहे). या माणसात सूड व हिंसक भावनाच नव्हती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही अशीच त्यांची वर्तणूक होती. उलट जे त्यांना सोडून गेले ते बहुतांश लोक हे स्वतःची वैयक्तिक राजकीय महत्वाकांक्षा जोपासण्यासाठी किंवा पिचड साहेबांपासून मिळणारा आर्थिक लाभ थांबल्यानेच गेले असे लक्षात येते. अर्थात पिचड साहेबांचेही काही राजकीय निर्णय चुकले असतील, काही चुका त्यांच्याकडून घडल्याही असतील, कारण शेवटी ते मनुष्यच होते. पण माझी जाण त्यांच्या चुका शोधण्याइतकी वा त्यांना दोष देण्याइतकी सक्षम नाही हे मी नम्रपणे नमूद करतो. मात्र त्याचवेळी पिचड साहेबांची एक मला वाटणारी सर्वात मोठी कमतरता अशी की त्यांनी तालुक्यात वा एकंदरच आदिवासी समाजात नेतृत्वाची पुढची खंबीर व त्यांच्यासारखीच अभ्यासू, कार्यशील, झुंजार व वैचारिक नवी पिढी निर्माण केली नाही. यशवंतराव भांगरे यांनी मधुकर पिचड यांच्यातील नेतृत्व घडवले पण मधुकरराव पिचड हे स्वतः मात्र दुसरे मधुकर पिचड घडवू शकले नाहीत. अर्थात हे देशात प्रत्येक नेतृत्वाच्या बाबतीत म्हणता येईल. लोक आपले स्थान अबाधित रहावे म्हणून नवे प्रतिभाशाली नेतृत्व घडवत नाहीत. पण या भूमिकेमुळे समाजाचे व देशाचेच नुकसान होते. इथे हेही विशेषत्वाने नमूद करावे लागेल की विधानसभेत ते विरोधी पक्षनेते असताना सोबतच्या आरआर पाटलांसारख्या अनेक नव्या नेत्यांना बोलण्याची व भूमिका मांडण्याची भरपूर संधी देऊन त्यांच्यातील नेतृत्व घडवण्यास मदत करत होते, आणि म्हणून ते महाराष्ट्राला लाभलेले सर्वात चांगले विरोधी पक्षनेते होते हे तर विधानसभेतच बोलले गेले आहे. पण हीच नवे नेतृत्व घडविण्याची भूमिका त्यांनी तालुक्यात किंबहुना आदिवासी समाजात सुद्धा घ्यायला हवी होती असे मला वाटते. आपण जसे खंबीरपणे लढलो तसेच किंवा त्याहून अधिक खंबीरपणे लढणारी नवी फळी तयार झाली पाहीजे ही भूमिका फक्त राजकीयच नाही तर प्रत्येक क्षेत्रातील व संस्थेतील नेतृत्वाची असली पाहिजे. पण असे एकही उदाहरण आज संपूर्ण देशात आढळत नाही आणि दुर्दैवाने पिचड साहेबही त्याला अपवाद नव्हते असेच म्हणावे लागेल. खरेतर सक्रिय राजकारणातून बाजूला होऊन त्यांनी दहा वर्षांपूर्वीच जी एकप्रकारची निवृत्ती घेतली होती तेव्हाच महाराष्ट्राच्या व आदिवासी समाजाच्या विकासात एक पोकळी निर्माण झाली होती. नेत्याच्या भूमिकेतून ते केव्हाच रिटायर झाले होते आता फक्त ते शरीराने जगातून निघून गेले आहेत. पण जरी राजकीय दृष्ट्या सक्रिय नसले तरी महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांचा ते एक मोठा आधारस्तंभ होते हे नक्की. सक्रिय व सत्तेत नसले तरी त्यांचे नुसते असणे हा सुद्धा आदिवासी समाजाला एक मोठा आधार होता. त्यांचे कार्य म्हणजे समाजासाठी एक दिशा देणारा एक मार्गदर्शकच आहे. मात्र त्यांचे कार्य जरी अमर राहणार असले तरी व्यक्तिरूपातली त्यांची प्रेरणा व त्यांचा समाजाला वाटणारा दृढ आधार हे मात्र आता कायमस्वरूपी हरवून गेले आहेत. समाजाच्या कित्येक जबाबदाऱ्या एकनिष्ठपणे व एकट्याने आपल्या खंबीर खांद्यावर पेलून धरणारे पिचड साहेब हे जाताना आदिवासी समाजासाठी, अकोले तालुक्यासाठी व महाराष्ट्रासाठी सुद्धा एक अत्यंत मोठी व कदाचित कधीही भरू शकणार नाही अशी पोकळी निर्माण करून गेले आहेत. सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा एक अत्यंत प्रभावी व प्रतिभाशाली नेता आपण गमावला आहे. राजूर गावाने, अकोले तालुक्याने, आदिवासी समाजाने व महाराष्ट्राने एक अत्यंत मौल्यवान असे व्यक्तिरत्न गमावले आहे. पण जोपर्यंत या जगात पीडितांना, वंचितांना, दुर्बलांना, गोरगरीब आदिवासींना संघर्ष आणि झुंज देत राहावी लागेल तोपर्यंत पिचड साहेबांचे आयुष्य व त्यांचे कार्य हे एखाद्या अजरामर दीपस्तंभासारखे समाजाला दिशा व ऊर्जा देण्याचे काम करत राहील हे मात्र नक्की. पिचड साहेबांना विनम्र व भावपूर्ण श्रद्धांजली मृत्यू दि. 6 डिसेंबर 2024. शब्दांकन - श्री. राहुल भांगरे

Sunday, December 22, 2024

प्रेरणा’दायी गुरु प्रा.एस.झेड.देशमुख – सर - मुरारी देशपांडे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन (२२.१२.२०२४

    ‘प्रेरणा’दायी गुरु प्रा.एस.झेड.देशमुख – सर - मुरारी देशपांडे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन (२२.१२.२०२४
) ^^^^^^^^^^^^^^^^^ …........’लाथ मारीन तिथे पाणी काढीन’हा वाक्प्रचार उच्चारणे फार सोपे आहे.तसे करून दाखवणे भलते कठीण.आयुष्यभर हा वाक्प्रचार आपल्या कणखर वागण्याने खरा करून दाखविला तो आमचे गुरु आदरणीय एस.झेड.देशमुख सरांनी.असंख्य तरुणांच्या आयुष्याला आकार देणारा हा शिल्पकार आज ऐशीच्या उंबरठ्यावर सुद्धा अथकपणे युवाशक्तीची शिल्पे साकारण्यात मग्न आहे.’एस झेड’या आद्याक्षरांना हजारो युवकांच्या जीवनात ‘प्रेरणा’मंत्राचे स्थान आहे.या नावात इतकं पावित्र्य आणि इतकं सामर्थ्य सामावलं ते सरांच्या निरपेक्ष पण तितक्याच बाणेदार स्वभावामुळे.      त्या उंचखडकच्या मातीतच काहीतरी रसायन असलं पाहिजे. 75 वर्षांपूर्वीचा अकोले तालुका.प्रगतीचा प्रकाश कसा असतो ते तोपर्यंत तालुक्याने पाहिलंही नव्हतं.आणि अशा तालुक्यातील एक लहानसं खेडं उंचखडक! अंगातील धमक आणि बुद्धिमत्तेची चमक कधीच लपत नाही म्हणतात.त्या लहानशा गावांत जन्मलेल्या देशमुख सरांनी आपल्या कर्तृत्वाने प्रचंड उंची गाठली.अडचणींचे अभेद्य खडक निश्चयाने फोडून काढले.परिस्थिती अनुकूल नसेल तर जगण्यात काही अर्थ नाही असं म्हणत हताश न होता सर अर्थशास्त्रात निष्णात झाले.उच्च शिक्षणाचे वारे नसलेल्या भागातून अकोले तालुक्यातील पहिले सी ए होण्याचा बहुमान त्यांनी मिळविला.अर्थशास्त्रीय ज्ञानाचा उपयोग हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनाला अर्थ देण्यासाठी केला.संस्कार,शिक्षण,राजकारण,समाजकारण,प्रबोधन अशी पंचारती सरांनी समाजाला आजवर समर्पित केली.ठामपणे यशाची एकेक पायरी चढत कीर्तीचा’सोपान’ त्यांनी सहज गाठला.       अकोल्याच्या मॉडर्न हायस्कूल मध्ये शिकत असताना किशोरावस्थेतील सरांचे गुण स्वर्गीय फडके सर आणि प्राचार्य अनंतराव देशपांडे यांनी हेरले.त्यांनी या विद्यार्थ्याकडे खास लक्ष पुरविले.त्यातून महाराष्ट्राला मिळाला एक अभ्यासू,ओजस्वी वक्ता.ज्या वक्त्याने गेली चाळीस वर्षे महाराष्ट्र पिंजून काढला.युवकांच्या मनात स्वाभिमानाचे स्फुल्लींग चेतविले.अन्यायावर कठोर प्रहार करायला प्रवृत्त केले.शिवचरित्रावरील त्यांची व्याख्याने युवकांना झपाटून टाकणारी ठरली.स्वतः ची पदरमोड करून राज्याचा कानाकोपरा त्यांनी शिवमय करून टाकला.स्वातंत्र्यवीर सावरकर,स्वामी विवेकानंद,चन्द्रशेखर आझाद,हुतात्मा वीर चाफेकर बंधू,समर्थ रामदास स्वामी,भगवद्गीता,रामायण,महाभारत,अटलबिहारी वाजपेयी,शामाप्रसाद मुखर्जी,पंडित दीनदयाल उपाध्याय,या विषयांवर बोलताना श्रोत्यांना त्या त्या काळात घेऊन जाण्याचं सामर्थ्य त्यांच्या शब्दात आहे.जे जे उन्नत उदात्त सुंदर महन्मधुर ते ते त्यांच्या व्याख्यानात असते.व्याख्यानानंतर एखाद्या युवकाच्या झोपडीत जाऊन हक्काने भाकरी अन ठेचा आनंदाने खाणारे सर अनेकांनी पहिले आहेत.           आपल्या श्रद्धास्थानांसाठी जगणारा हा माणूस प्रचंड लोकसंग्रह करणारा एक स्वयंभू प्रवाह बनला.स्फटिका सारखा साफ नितळ निर्मळ प्रवाह.या प्रवाहात स्नानाचे सौभाग्य ज्यांना लाभलं ते अंतर्बाह्य उजळले.         ज्या काळात ‘जय भवानी’जय शिवाजी’अशी घोषणा दिली तरी पोलीस गुन्हे दाखल करीत त्या काळात त्यांनी पतित पावन संघटनेच्या माध्यमातून हिंदुत्ववादी युवकांना संघटीत केले.सरकारी अन्यायाच्या विरोधात पुण्यात शनिवारवाड्यासमोर घेतलेल्या हजारोंच्या सभांनी महाराष्ट्र ढवळून निघाला. किती खटल्यांना ते धीरोदात्तपणे सामोरे गेले हा तर स्वतंत्र ग्रंथाचा विषय ठरेल. सरांचा आजवरचा जीवन प्रवास पाहून या ओळी आज प्रकर्षाने आठवल्या. मिळविण्यास न्याय हा लढेन मी लढेन मी छातीवर जुलुमाच्या पुन्हा पुन्हा चढेन मी शिवबाचा होय भक्त धमन्यातुनी तेच रक्त वर्तनातुन दृढनिश्चयी सावरकर होय व्यक्त मी शाहीर क्रांतीचा कडकडतो माझा डफ जोवरी कुडीत प्राण तोवरी हे माझे तप स्वतः साठी कधीच काही न मागणारे सर समाजासाठी लढताना मात्र आजही थकत नाहीत.तरुणाच्या उत्साहाने चौफेर वावरणारे सर सतत माणसांच्या गराड्यात असतात.मोठा नावलौकिक मिळवूनही या माणूसवेड्या माणसाने आपले साधे माणूसपण टिकवून ठेवले आहे.औपचारिकतेच्या चौकटीत बंदिस्त न झालेला हा चैतन्याचा झरा असाच खळाळत निरंतर वाहात राहो हीच परमेश्वराकडे प्रार्थना ....🌹🕉️🙏🚩

Wednesday, December 18, 2024

फोफासंडी

फोफसंडी : महाराष्ट्रातील सर्वात कमी सुर्यप्रकाश मिळणारे म्हणजेच सर्वात उशीरा सुर्योदय आणि सर्वात आधी सुर्यास्त होणारे गाव. सूर्योदय दोन-अडीच तास उशिरा व सूर्यास्त दोन-अडीच तास लवकर होतो. म्हणजे दिवस हा फक्त सहा ते सात तासांचाच असतो. कुंजीरगडाच्या पायथ्याशी असलेले हे महाराष्ट्रातील सर्वात दुर्गम छोटे खेडेगाव. हे गाव चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेला आहे. नाशिक पासून साधारणपणे ११० किमी अंतरावर असलेले हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात येते. मांडवी नदीचे उगम या गावाच्या हद्दीत होतो. इथल्या एका गुहेत मांडव्य ऋषींनी तपश्चर्या केली होती. त्यांच्या नांवावरूनच या नदीचे नाव मांडवी पडले आहे. पावसाळ्यात या ठिकाणी तुफान पाऊस पडतो. निसर्ग सौंदर्याची या गावावर मुक्तहस्ते उधळण केलेली आहे. फोफसंडी गावाला हे नाव मिळण्याचा इतिहास देखील खूपच रंजक आहे. पॉप नावाचा एक इंग्रज अधिकारी दर रविवारी (संडे) सुट्टी च्या दिवशी विश्रांती साठी या गावात जात असे. त्यावरूनच या गावाचे नाव फॉपसंडे पडले. पुढे त्याचाच अपभ्रंश होऊन फोफसंडी हे नाव रूढ झाले. त्या ब्रिटिश अधिकारी राहत असलेल्या गेस्ट हाऊस चे अवशेष अजून शिल्लक आहेत. (मजकूर सौजन्य : अशोक दारके)

Tuesday, December 17, 2024

प्राणी, पक्ष्यांची वाढती संख्या

Marathi Newsmaharashtraahmednagar newsIncrease In The Number Of Animals And Birds In Kalsubai Wildlife Sanctuary कळसूबाई अभयारण्यात प्राणी-पक्ष्यांच्या संख्येत वाढ प्राणी, पक्ष्यांची वाढती संख्यावन्यप्राणी गणनेतील चित्र; मुबलक पाणी ‌उपलब्ध असल्याचा परिणामम टा... प्राणी, पक्ष्यांची वाढती संख्या वन्यप्राणी गणनेतील चित्र; मुबलक पाणी ‌उपलब्ध असल्याचा परिणाम म. टा. वृत्तसेवा, अकोले कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य, भंडारदरा वन परिक्षेत्रामध्ये भंडारदरा धरण व घाटघर उदंचन प्रकल्पासारखे मोठे पाणवठे असून या वर्षी मुबलक प्रमाणात पावसाने या अभयारण्यावर प्रसन्नता दाखविल्याने वन्य प्राण्यासाठी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवली नाही. परिणामी बौद्ध पोर्णिमेच्या दिवशी झालेल्या वन्य प्राण्यांच्या प्रगणनेमध्ये या अभयारण्यात प्राणी व पक्षांची संख्या वाढल्याचे दिसून आले. मात्र, चिमणी व कावळे यासारख्या पक्षांच्या संख्येत होणारी घट ही चिंतेची बाब मानली जात आहे. हरिश्चंद्रगड अभयारण्यात ३० एप्रिल ते १ मे या कालावधीत मुंगुस १०, सांबर ६६,ससा १९, वानर १७९, कोल्हे ९, रानमांजर ७, रानडुक्कर ४५, तरस ५, माकड ४४, खोकड २, खार ७, ससान निरंक, भेकर १५, सायाळ निरंक, उदमांजर १, बिबट तीन असे एकूण ४०२ वन्यप्राणी आढळले असल्याचे वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी सांगितले. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वन्य प्राणी व पक्षांची गणना दरवर्षी बौद्ध पोर्णिमेच्या दिवशी वन विभागाकडून केली जाते. याहीवर्षी ३० एप्रिल रोजी प्रगणना करण्यात आली. या साठी या विभागाकडून हरिश्चंद्र कळसुबाई अभयारण्य, राजुर वन परिक्षेत्रामध्ये रात्रीच्या वेळी जंगलात नैसर्गिक पाणवठ्यावर निरीक्षण मनोरे व झाडावर मचाण बांधून पाणवठ्यावर येणाऱ्या प्राण्यांची प्रगणना करण्यात आली. या प्रगणनेसाठी वनकर्मचाऱ्यांबरोबरच काही वन्यजीव प्रेमी युवकांनीही सह‌भाग घेतला. या प्राण्यांची मोजणी करण्यासाठी एकूण सात ठिकाणांची निवड करण्यात आली होती. या मध्ये वानर, माकड, रानमांजर, तरस, भेकर, निलगाय यांच्यासह तीन बिबट्यांची नोंद झाली असून एक रानगवा सुद्धा पाणवठ्यावर पाणी पिताना आढळून आला. प्रत्यक्षात रानगव्यांची संख्या ही जास्त असण्याची शक्याता आजुबाजूच्या गावातील नागरिकांनी बोलून दाखविली. सात ठिकाणी घेण्यात आलेल्या प्रगणनेसाठी घाटघर (घाटनदेवी), साम्रद (सांदनदरी), रतनवाडी (गणपतीचे तळे), पांजरे (गुजर माळी), उडदावणे (पेणाची माळी), कोलटेंभे (नान्हीचे पानी) व तेरूंगणच्या पाणवठ्याची निवड करण्यात आली होती. तर हरिश्चंद्र गड अभयारण्यात कुमशेत, आबित, कोथळे, विहिर, पाचनई अशा सात ठिकाणी प्रगणना करण्यात आली. रानडुक्करांची संख्या या जंगलात मुबलक आढळली. माकड, वानर, भेकर, रानमांजर, निलगाय यांना हे अभयारण्य सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य असल्याचे दिसत आहे. तर पक्षांच्या बाबतीत बगळा, लावरी, साळुंखी, रानकोबंडी, रानकोंबडा, बहिरी ससाना, बुलबुल, घुबड यारख्या बऱ्याच पक्षांचे वास्तव्य या अभयारण्यात वाढल्याचे दिसून आले. या बौद्ध पोर्णिमेच्या दिवशी एकुण ८१६ वन्यप्राण्यांची प्रगणना २४ तासात करण्यात आली. ३९६ पक्षांची नोंद या कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य वनपरिक्षेत्र भंडारदरा या नोंदवहीत झाली आहे. अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पातच दरवर्षी बौद्ध पोर्णिमेला वन्यप्राण्याची प्रगणना करण्यात येत असते. या वर्षी जंगलामध्ये पाणवठ्यावर मुबलक प्रमाणात पाणी असूनु घाटघर जलविद्युत प्रकल्प व भंडारदरा धरण परिसरात प्राण्यांना मुबलक प्रमाणात पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत आहे. उन्हाळ्यात पाणी मुबलक उपलब्ध असल्याकारणाने दिवसेंदिवस वन्य प्राणी व पक्षांची संख्या या अभयारण्यात वाढत आहे. ही प्रगणना पूर्ण करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी ए. एन. आडे व डी. डी. पडवळे यांच्या अधिपत्याखाली आठ वनरक्षक, चार वनपाल, १२ वनमजूर व अनेक वन्यजीव प्रेमींनी या वन्यप्राण्यांच्या प्रगणनेत भाग घेतला. कोट- भंडारदरा धरणाच्या परिसरात काही वर्षांपूर्वी चिमणी व कावळ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळून येत होती. परंतु ती संख्या आता नगण्य झाली असून अभयारण्यामध्ये २५ चिमण्या व फक्त १५ कावळेच पाणवठ्यावर आढळून आल्याने या दोन पक्षांची जातच नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे. डी. डी. पडवळे वनपरिक्षेत्र अधिकारी कोट - वानर, माकड, ससा, भेकर या प्राण्यांची संख्या वाढत असून बिबट्या फक्त एकच दिसल्याने बिबटे उसाच्या रानाकडे सरकल्याचे दिसत आहे. पक्षी गणनेत काही पक्षी कमी तर काही नवीन पक्षी अभयारण्यात दिसू लागले आहेत. ए. एन. आडे वनपरिक्षेत्र अधिकारी, राजूर

Saturday, December 14, 2024

पिचड साहेब तुम्ही पुन्हा या

मधुकरराव पिचड राजूरच्या एका शिक्षकाच्या घरात जन्मलेला एक मुलगा ज्याला स्वतःची जन्मतारीख सुद्धा माहीत नव्हती त्यामुळे ते 1 जून ही कॉमन जन्मतारीखच लावत असत त्या मधुकरराव पिचड यांचे आयुष्य हा एक खरेचच अचंबित करणारा प्रवास होता. एक साधारण आदिवासी मुलगा कुठल्याही पार्श्वभूमीविना केवळ स्वकर्तृत्वाने देशातील सर्वात महत्वाच्या आदिवासी नेत्यांपैकी एक बनतो, महाराष्ट्राच्या राजकारणातील मुख्य फळीतील नेता बनतो ही खरेच आश्चर्याची बाब आहे. पुण्याला फर्ग्युसन कॉलेजला शिक्षण घेत असलेल्या मधुकरराव पिचड यांना तिथेच विद्यार्थी नेत्याच्या रूपाने राजकारणाचे बाळकडू मिळाले. त्यानंतर तालुक्यात आल्यावर त्यांनी समाजकार्यात स्वतःला झोकून घेतले. सत्तरच्या दशकात पंचायत समिती सदस्य व सभापती म्हणून सुरू झालेली त्यांची राजकिय कारकीर्द सलग सात वेळा म्हणजे जवळजवळ 35 वर्षे तालुक्याचा आमदार तसेच विविध महत्वाची कॅबिनेट मंत्रीपदे भूषविण्यात व्यतीत झाली. 1978 च्या पहील्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागून थेट चौथ्या स्थानी फेकले गेलेल्या मधुकरराव पिचड यांनी दोनच वर्षांनी 1980 मध्ये विधानसभा जिंकून त्यानंतर सलग 7 वेळा निवडून येत तब्बल 35 वर्षे एकहाती विधानसभेत अकोले तालुक्याचा व आदिवासी जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडला. राजूर येथे तालुक्यातील पहिले दूध संकलन केंद्र त्यांनीच सुरू केले. त्या केंद्रात पहील्या दिवशी केवळ 30 लिटर दुध जमा झाले होते. पण संथ सुरुवात असली तरी ही अकोले तालुक्याच्या जनतेसाठीची एका प्रमुख आर्थिक स्रोताची मजबूत पायाभरणी होती. तेव्हा 30 लिटरने सुरू झालेले दूध संकलन आज तालुक्यात रोजच्या एकूण 2 लाख लिटरपर्यंत येऊन पोचले आहे. पिचड साहेबांना महाराष्ट्राचे जलनायक म्हंटले जाते. अकोले तालुक्यात आज तब्बल 19 धरणे आहेत. केटी बंधाऱ्यांची तर गणतीच नाही. एक भंडारदरा सोडले तर बहुतेक ही सगळी धरणे पिचड साहेबांच्याच काळात बांधली गेली असावीत. निळवंडे धरण हा तर साहेबांच्या परफेक्ट धोरणांचा व दूरदृष्टीचा मानबिंदू आहे. निळवंडे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या बाबतीत पिचड साहेबांनी केलेले कार्य हे राज्यातच नाही तर देशात एक आदर्श कार्य म्हणून नावाजले जाते. कित्येक धरणे व वीजप्रकल्प बांधून पिचड साहेबांनी नुसता अकोले तालुकाच नाही तर सगळा नगर जिल्हा सुजलाम करण्यात प्रमुख वाटा उचलला आहे. धरणांच्या रूपाने पिचड साहेबांनी तालुक्याच्या व जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राला एक नवी संजीवनीच दिली आहे. सोबतीला रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून त्यांनी रोजगार निर्मिती बरोबरच आदिवासी भागातील कितीतरी पडीक जमीन ही पिकाखाली आणली व आदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासास वेग मिळवून दिला. शेजारचा संगमनेर तालुका हा अकोले तालुक्यापेक्षा अतिशय समृद्ध आणि प्रगत व श्रीमंत तालुका समजला जातो. पण मी साधारण 1998 ते 2002 या काळात संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात फिरलो असता लक्षात आले की संगमनेर या तालुक्याच्या ठिकाणापासून अगदी 10-15 किमी इतकेच अंतर असलेल्या काही गावांत देखील बरे रस्ते नव्हते की एसटी सुद्धा जात नव्हती. त्याउलट त्याचवेळी अकोले तालुक्यातील पेठेची वाडी या अतिदुर्गम गावात सुद्धा कच्चा का होईना पण मोटारेबल रस्ता होता. पाचनई या दुर्गम गावात पिचड साहेबांच्या काळातच पक्का डांबरी रस्ता बनला होता व एसटी सुद्धा जात होती. अगदी प्रत्येक वाडीवस्तीवर जात नसली तरी अपवाद वगळता तालुक्यातील जवळजवळ प्रत्येक गावात एसटी जात होती. म्हणजे दूध संकलनातून आर्थिक मिळकत देऊन, शेतजमीनीला पाणी उपलब्ध करून देऊन ते थांबले नाहीत तर विकासासाठी आवश्यक असलेले दळणवळणासाठीचे रस्तेही त्यांनी अगदी अतिदुर्गम भागापर्यंत निर्माण करून घेतले. अकोले तालुक्याची कनेक्टिव्हिटी इतर अनेक तालुक्यांपेक्षा त्यांनी नक्कीच खूप उत्तम केली. अकोले तालुका हा मुखत्वे आदिवासी तालुका असल्याने व अतिपर्जन्यवृष्टीचा तालुका असल्याने इथे साखर कारखाना चालू शकणार नाही या मतप्रवाहाला छेद देत पिचड साहेबांनी जिद्दीने अगस्ती सहकारी कारखाना स्थापन केला व अगदी यशस्वीपणे तो आजतागायत चालवूनही दाखवला. आज तालुक्याच्या आर्थिक समृद्धीत अगस्ती कारखान्याचाच सर्वात मोठा वाटा आहे असे निर्विवादपणे म्हणता येईल. शिक्षण हाच समाजाच्या विकासाचा सर्वात महत्वाचा मार्ग आहे हे ओळखून पिचड साहेबांनी शिक्षणाची गंगा खेडोपाड्यातील गरीब आदिवासी व दुर्बल घटकापर्यंत नेण्यासाठी आदिवासी उन्नती संस्थेची स्थापना करून तालुक्यात अनेक ठिकाणी शाळा व आश्रम शाळांचे जाळे उभे केले. आज अनेक शिक्षणसम्राटांनी शिक्षण क्षेत्रात भरमसाठ फी आकारून त्याला आर्थिक मिळकतीचे एक बाजारी साधन बनवून ठेवले आहे. पण उन्नतीच्या शाळांच्या माध्यमातून पिचड साहेबांनी विनामूल्य वा अगदी नाममात्र फी घेऊन आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गोरगरीब आदिवासी बांधवांच्या लेकरांना शिक्षणाची संधी मिळवून दिली आहे. महाराष्ट्रातील आदिवासी जनतेसाठी पिचड साहेबांचे योगदान अगदी अतुलनीय असेच आहे. आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट बनवण्याचे व मांडण्याचे काम संपूर्ण देशात सगळ्यात आधी पिचड साहेबांनीच केले. मुख्यमंत्री श्री शरद पवार यांच्या सोबतीने त्यांनी स्वतंत्र आदिवासी मंत्रालय व आदिवासी बजेटची निर्मिती केली तसेच समाजकल्याण मंत्रालयातून वेगळा व स्वतंत्र असा आदिवासी विकास विभाग सुद्धा स्थापन केला. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून अनेक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प उभारले जाऊन तसेच विविध कल्याणकारी योजना राबवून महाराष्ट्राच्या आदिवासींचे जीवनमान उंचावण्यात मोलाची भूमिका बजावली जात आहे. स्वतंत्र आदिवासी बजेट मांडण्याचे जे महत्वाचे काम देशात सर्वप्रथम पिचड साहेबांनी केले त्यांच्यानंतर देशातील इतरही अनेक राज्यांनी पिचड साहेबांचा कित्ता गिरवत स्वतंत्र आदिवासी बजेटचा स्वीकार केला. आदिवासी मंत्रालयाची स्थापना आणि पहिले मंत्रिपद हे पिचड साहेबांनीच भूषविले. आदिवासींमधील बोगस आदिवासींची घुसखोरी थांबवण्यासाठी पिचड साहेबांनी खूप महत्वाचे प्रयत्न केले. गोविंदजी गारे आणि मधुकरराव पिचड यांनी या बाबतीत फार मोठे योगदान दिलेले आहे. आजही महाराष्ट्रातील बोगस आदिवासींचे सर्वात मोठे शत्रू हे मधुकरराव पिचड आणि गोविंदजी गारे हेच आहेत. महाराष्ट्रात आदिवासी जमीन कायदा व वनहक्क कायदा यांच्या सुदृढीकरणात व अंमलबजावणीत त्यांनी अतिशय महत्वाचे योगदान दिले. ते सक्रिय असतानाच्या काळात आदिवासींच्या विविध महत्वाच्या प्रश्नांवर चोख आणि नेमक्या मार्गाने प्रशासकीय व राजकीय पातळीवर नेटाने झुंज देणारे महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही त्यांच्याइतके सामर्थ्यवान व प्रभावी नेतृत्व अन्य कोणतेही नव्हते असे म्हणता येईल. वैयक्तिकरित्या तर त्यांनी किती जणांची मदत केली व किती आयुष्ये घडवली याला गणती नाही. कित्येक जणांनी माझे आयुष्य हे केवळ त्यांच्यामुळेच घडले असे सांगितलेले व लिहिलेले मी ऐकले व वाचले आहे. पिचड साहेब हे बहुआयामी असे नेते होते. महाराष्ट्र राज्याची आदिवासी विकास, कृषी, रोहयो, पशुसंवर्धन, वन व पर्यावरण मंत्री, दुग्ध विकास, मत्स्य विकास मंत्री, परिवहन व पूनर्वसन विकास मंत्री अशी विविध क्षेत्रातील मंत्रीपदे त्यांनी सक्षमपणे व कार्यक्षमरीत्या भूषविली आहेत. काही जिल्ह्यांचे पालकमंत्रीही ते राहीले आहेत. असे किती नेते आहेत या देशात ज्यांनी इतक्या विविध क्षेत्रांत यशस्वीपणे मंत्रीपदे भूषवली आहेत? फार पूर्वी एक प्रशासकीय अधिकारी मला म्हणाले होते की महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ सलगपणे लाल दिव्याची गाडी वापरणारा माणूस कोण असेल? मी म्हणालो शरद पवार, कारण तेच तेव्हा सर्वात मोठे नेते होते. पण ते अधिकारी म्हणाले शरद पवार नाहीत तर ते आहेत तुझ्याच तालुक्याचे आमदार म्हणजे मधुकरराव पिचड. तर असे होते की जेव्हा महाराष्ट्रात पहिल्यांदा काँग्रेस जाऊन युतीचे सरकार आले होते तेव्हाही पिचड साहेब हे विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. विरोधी पक्षनेत्याला सुद्धा कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा असतो आणि त्यामुळे लाल दिव्याची गाडी त्यांना त्या पाच वर्षांत सत्ता नसतानाही मिळाली होती. विरोधी बाकांवर बसल्यामुळे इतर कोणत्याही नेत्याला ही सुविधा व बहुमान मिळाला नाही. सलग ३० वर्षे त्यांना हा बहुमान मिळाला. अकोल्यात ऐंशीच्या दशकात पाण्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे पिचड यांच्यावर खटले दाखल झाले होते. त्यामुळे १९८४ मध्ये नव्याने सरकार स्थापन करणाऱ्या वसंतदादा पाटील यांनी त्यांना मंत्रिपद देण्याचा निर्णय घेतल्यावर अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता. हे कळल्यावर केवळ मधुकरराव पिचड यांच्यावरील हे खटले रद्द करून त्यांना मंत्रिपदाची शपथ घेता यावी म्हणून वसंतदादा पाटलांनी चक्क आपला शपथविधी चार तास थांबवून ठेवला होता. आजकालच्या शपथविधीचें ग्रँड सोहळे पाहता एका नव्याने व पहील्यांदाच आमदार झालेल्या व्यक्तीसाठी चक्क मुख्यमंत्र्यांनीच सगळा शपथविधी पुढे ढकलणे ही बाब ती व्यक्ती किती महत्वाचे नेतृत्व होते हेच अधोरेखित करते. व्यक्तिगतरित्या बोलायचे झाल्यास पिचड साहेब हे एक अगदी राजबिंडे आणि रुबाबदार असे व्यक्तिमत्व होते. मला तर त्यांच्या चेहऱ्यात राज कपूर यांचीच छटा दिसत असे, तसाच अतिशय गोरा वर्ण आणि तसेच नाक व चेहरा.! पिचड साहेब हे अतिशय बुद्धिमान व्यक्ती तर होतेच पण त्यांची स्मरणशक्ती सुद्धा अत्यंत दांडगी होती. तालुक्यातील प्रत्येक गावातील अनेक लोकांना ते नुसते नावानेच नाही तर त्यांच्या आयुष्यात काय चालले आहे या तपशिलांनिशी ओळखत असत. कुठे काय काम चालू आहे वा कोणते काम रखडले आहे याची त्यांना पूर्ण आणि अपडेटेड माहिती असे. कधी काय झाले होते व तेव्हा कोणता माणूस कसा वागला होता हे त्यांच्या कायमचे आठवणीत राहत असे. एवढेच नाही तर मूळचे हाडाचे काँग्रेसी असल्याने (शेवटी मुलाच्या आग्रहामुळे बीजेपीत गेले असले तरी) त्यांनी नेहमी अहिंसा आणि सहिष्णूतेचाच पुरस्कार केला. त्यांनी कधी कुणावर हिंसक डूख धरला नाही की कुणाचे बदल्याच्या भावनेतून नुकसान केले नाही. स्वतः आदिवासी समाजाचे असूनही त्यांनी कधीही बिगर आदिवासींसोबत भेदभावाची वा अलिप्ततेची भूमिका घेतली नाही. आणि उलटपक्षी अंदर की बात सांगायचीच झाली तर आजही त्यांच्या अगदी जवळच्या बहुतांश कार्यकर्त्यांना देखील वाटते की उलट त्यांनी बिगर आदिवासींनाच अंमळ जास्त फेवर दिला. आजच्या फक्त माझी जात आणि फक्त माझा धर्म हेच श्रेष्ठ या वैचारिक घाणीत लोळण्याच्या वातावरणात सगळ्यांना असे समानपणे सोबत घेऊन चालण्याची पिचड साहेबांची ही जीवन कारकीर्द म्हणजे खरेच एक सन्माननीय अपवादच म्हणावी लागेल. त्यांना राजकीय विरोधक व शत्रू खूप असतीलही पण ते सगळे त्यांच्या राजकीय भूमिकेचे विरोधक आहेत. एक व्यक्ती म्हणून पिचड साहेब हे नक्कीच अजातशत्रू होते. जे लोक त्यांना सोडून विरोधात गेले ते सुद्धा हे मान्य करतील की पिचड साहेबांनी कधीही कुणावर पातळी सोडून टीका केली नाही वा कुणाचे आयुष्य ते विरोधात गेले म्हणून सूडाने उध्वस्त केले नाही (हेही खूपच दुर्मिळ आहे). या माणसात सूड व हिंसक भावनाच नव्हती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही अशीच त्यांची वर्तणूक होती. उलट जे त्यांना सोडून गेले ते बहुतांश लोक हे स्वतःची वैयक्तिक राजकीय महत्वाकांक्षा जोपासण्यासाठी किंवा पिचड साहेबांपासून मिळणारा आर्थिक लाभ थांबल्यानेच गेले असे लक्षात येते. अर्थात पिचड साहेबांचेही काही राजकीय निर्णय चुकले असतील, काही चुका त्यांच्याकडून घडल्याही असतील, कारण शेवटी ते मनुष्यच होते. पण माझी जाण त्यांच्या चुका शोधण्याइतकी वा त्यांना दोष देण्याइतकी सक्षम नाही हे मी नम्रपणे नमूद करतो. मात्र त्याचवेळी पिचड साहेबांची एक मला वाटणारी सर्वात मोठी कमतरता अशी की त्यांनी तालुक्यात वा एकंदरच आदिवासी समाजात नेतृत्वाची पुढची खंबीर व त्यांच्यासारखीच अभ्यासू, कार्यशील, झुंजार व वैचारिक नवी पिढी निर्माण केली नाही. यशवंतराव भांगरे यांनी मधुकर पिचड यांच्यातील नेतृत्व घडवले पण मधुकरराव पिचड हे स्वतः मात्र दुसरे मधुकर पिचड घडवू शकले नाहीत. अर्थात हे देशात प्रत्येक नेतृत्वाच्या बाबतीत म्हणता येईल. लोक आपले स्थान अबाधित रहावे म्हणून नवे प्रतिभाशाली नेतृत्व घडवत नाहीत. पण या भूमिकेमुळे समाजाचे व देशाचेच नुकसान होते. इथे हेही विशेषत्वाने नमूद करावे लागेल की विधानसभेत ते विरोधी पक्षनेते असताना सोबतच्या आरआर पाटलांसारख्या अनेक नव्या नेत्यांना बोलण्याची व भूमिका मांडण्याची भरपूर संधी देऊन त्यांच्यातील नेतृत्व घडवण्यास मदत करत होते, आणि म्हणून ते महाराष्ट्राला लाभलेले सर्वात चांगले विरोधी पक्षनेते होते हे तर विधानसभेतच बोलले गेले आहे. पण हीच नवे नेतृत्व घडविण्याची भूमिका त्यांनी तालुक्यात किंबहुना आदिवासी समाजात सुद्धा घ्यायला हवी होती असे मला वाटते. आपण जसे खंबीरपणे लढलो तसेच किंवा त्याहून अधिक खंबीरपणे लढणारी नवी फळी तयार झाली पाहीजे ही भूमिका फक्त राजकीयच नाही तर प्रत्येक क्षेत्रातील व संस्थेतील नेतृत्वाची असली पाहिजे. पण असे एकही उदाहरण आज संपूर्ण देशात आढळत नाही आणि दुर्दैवाने पिचड साहेबही त्याला अपवाद नव्हते असेच म्हणावे लागेल. खरेतर सक्रिय राजकारणातून बाजूला होऊन त्यांनी दहा वर्षांपूर्वीच जी एकप्रकारची निवृत्ती घेतली होती तेव्हाच महाराष्ट्राच्या व आदिवासी समाजाच्या विकासात एक पोकळी निर्माण झाली होती. नेत्याच्या भूमिकेतून ते केव्हाच रिटायर झाले होते आता फक्त ते शरीराने जगातून निघून गेले आहेत. पण जरी राजकीय दृष्ट्या सक्रिय नसले तरी महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांचा ते एक मोठा आधारस्तंभ होते हे नक्की. सक्रिय व सत्तेत नसले तरी त्यांचे नुसते असणे हा सुद्धा आदिवासी समाजाला एक मोठा आधार होता. त्यांचे कार्य म्हणजे समाजासाठी दिशा देणारा एक मार्गदर्शकच आहे. मात्र त्यांचे कार्य जरी अमर राहणार असले तरी व्यक्तिरूपातली त्यांची प्रेरणा व त्यांचा समाजाला वाटणारा दृढ आधार हे मात्र आता कायमस्वरूपी हरवून गेले आहेत. समाजाच्या कित्येक जबाबदाऱ्या एकनिष्ठपणे व एकट्याने आपल्या खंबीर खांद्यावर पेलून धरणारे पिचड साहेब हे जाताना आदिवासी समाजासाठी, अकोले तालुक्यासाठी व महाराष्ट्रासाठी सुद्धा एक अत्यंत मोठी व कदाचित कधीही भरू शकणार नाही अशी पोकळी निर्माण करून गेले आहेत. सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा एक अत्यंत प्रभावी व प्रतिभाशाली नेता आपण गमावला आहे. राजूर गावाने, अकोले तालुक्याने, आदिवासी समाजाने व महाराष्ट्राने एक अत्यंत मौल्यवान असे व्यक्तिरत्न गमावले आहे. पण जोपर्यंत या जगात पीडितांना, वंचितांना, दुर्बलांना, गोरगरीब आदिवासींना संघर्ष आणि झुंज देत राहावी लागेल तोपर्यंत पिचड साहेबांचे आयुष्य व त्यांचे कार्य हे एखाद्या अजरामर दीपस्तंभासारखे समाजाला दिशा व ऊर्जा देण्याचे काम करत राहील हे मात्र नक्की. पिचड साहेबांना विनम्र व भावपूर्ण श्रद्धांजली मृत्यू दि. 6 डिसेंबर 2024. :- राहुल भांगरे

Wednesday, December 11, 2024

चंद्रकांत ढवळपुरीकर:

लोकसाहित्य - चंद्रकांत ढवळपुरीकर: (२३ जुलै १९३२). ढोलकी फडाच्या तमाशाचे मालक, ज्येष्ठ कलावंत. पूर्ण नाव चंद्रकांत शिवराम जाधव. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे झाला . त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. एक बहीण व सात भाऊ असा त्यांचा घरचा परिवार. चंद्रकांतजी बालवयात गुरे सांभाळून जेमतेम इयत्ता ३ री पर्यंत शिक्षण घेऊ शकले. त्यांचा जन्म गोंधळी समाजातला आहे . बालवयातच ते आपल्या मामांच्या तमाशात काम करू लागले. विष्णूबुवा बेल्हेकर सह देविदास रांधेकर या तमाशात प्रथम बिगारी काम करीत असतानाच नंतर ते नृत्य कला शिकले. ते नाचाची उत्तम भूमिका करीत असत. १९५५ मध्ये जगताप पाटील पिंपळेकर यांच्या फडात त्यांनी वगात छोट्या मोठ्या भूमिका केल्या. त्यांचा आत्मविश्वास वाढला, संवादातून संभाषण कौशल्य विकसित झाले. १९५६ साली तुकाराम खेडकर सह विठ्ठल कवठेकर या तमाशात त्यांनी प्रवेश केला. तुकाराम खेडकर हे कुशल तमाशा कलावंत होते. त्यांचे अभिनय कौशल्य अप्रतिम होते. ते शब्दसृष्टीचे उपासक होते. त्यांचा चंद्रकांतजींवर चांगलाच प्रभाव पडला. त्याच तमाशात चंद्रकांतजी उर्फ भाऊ खलनायक म्हणून प्रसिद्ध झाले. १९५८ मध्ये माधवराव नगरकर तमाशा मंडळात सारंगपूरची होळी या वगात खलनायकाची भूमिका अत्यंत चांगल्या प्रकारे सादर केली. १९५९ ते १९६२ पर्यंत तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर तमाशा मंडळात त्यांच्या कलेला बहर आला. त्यांची खलनायकाची भूमिका पाहण्यासाठी तमाशाचा तंबू खचून भरत असे. त्याच काळात पानिपतचा सूड हा त्यांनी भूमिका केलेला ऐतिहासिक वग अतिशय गाजला. त्या वगात ‘ सादुल्ला ‘ नावाची खलनायकाची भूमिका त्यांनी यशस्वीपणे सादर केली. त्याच काळात त्यांनी काळ रक्त,लडूसिंग, गवळ्याची भूमिका सादर केल्या. ते रसिकांचे खलनायक म्हणून प्रसिद्ध झाले. महाराष्ट्रातील तमाम तमाशा रसिकांनी त्यांना वगसम्राट ही पदवी बहाल केली. १९६३ ते १९६४ या कालावधीत जगताप पाटील पिंपळेकर या तमाशा मंडळात दत्ता महाडिक पुणेकर यांच्याशी त्यांचा परिचय झाला. परिचयातून स्नेह वाढला. दत्ता महाडिक यांच्यासारखा उत्कृष्ट कलावंताचे ते मित्र बनवले. स्वतःच्या मालकीचे लोकनाट्य मंडळ असावे अशी प्रेरणा त्यांना झाली. त्याचाच परिणाम म्हणून १९६४ मध्ये वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर सह बाबुराव सविंदणेकर नावाने तमाशा फड सुरु केला. बिगारी कामगार बनून दाखल झालेला तमाशातील कामगार तमाशा मंडळाचा मालक बनला; परंतु आर्थिक पाठबळ नसल्याने त्यांच्यापुढे अडचणी निर्माण झाल्या. १९६६ सालापासून चंद्रकांत ढवळीपुरीकर सह दत्ता महाडिक पुणेकर तमाशा मंडळ अस्तित्वात आले. या तमाशा मंडळाने त्यांच्या वैभवाच्या व प्रसिद्धीच्या शिखरावर नेले. त्यांनी गणपतराव चव्हाण सविंदणेकर यांना गुरुस्थानी मानले होते. त्यांची गाजलेली वगनाट्य व त्यातील भूमिका : महाराष्ट्र झुकत नाही – गणोजी शिर्के, महाराष्ट्रा तू जागा रहा – बहिर्जी नाईक, चित्ता फाडला जावळीचा – चंद्रराव मोरे, चिचोंलीचा देशमुख – देशमुख , गवळ्याची रंभा – रंगभल महाराज ,संत तुकाराम – मंबाजी, भक्त पुंडलिक – अंबाजी पाटील, चाकणचा किल्लेदार – फिरंगोजी नरसाळे, ज्ञानेश्वर माझी माऊली – दादभट, झाला उद्धार वाल्मिकीचा – वाल्मिकी, याशिवाय त्यांची रक्तात भिजला बांगला , असे पुढारी ठार करा , पुढाऱ्यांनी काढली शाळा , पुढारी पाहिजे गावाला , तिथं मठातील सैतान , मुंबईचा रेल्वे हमाल, काय दिले या स्वातंत्र्याने ,यासाठी स्वातंत्र्य हवे का ?, इंदिरा मठाचे गुपित , करा ठार हे गॅंगवॉर , रनात रंगली इंदिरा , राजीव गांधी झिंदाबाद , ही झुंज मुरारबाजीची , संत सावता माळी , करितो चोखोबा जोहार , संत एकनाथ , खुर्चीसाठी वाटलं ते , संभाळ तुझ्या सौभाग्याला , चांडाळ चौकडी गाव गुंडांची, तिकीट मिळालं गुंडाला , लोकशाहीचे मारेकरी अशी अनेक वगनाट्ये गाजली. महाराष्ट्र झुकत नाही या वगनाट्याने तर त्यांची कीर्ती आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचविली. इराण सरकारचे सांस्कृतिक मंडळ भारतातील सांस्कृतिक जीवनाचा विकास कशाप्रकारे झाला आहे याचा अभ्यास करण्यासाठी १९६७ साली महाराष्ट्रात आले होते. त्यांनी भाऊंच्या वगनाट्याचे शूटिंग करून नेले आणि ते इराण च्या दूरचित्रवाणीवरून प्रसारित केले. चंद्रकांत ढवळीपुरकर यांना मिळालेले पुरस्कार : ढवळपुरी ग्रामस्थांकडून ६५ वी निमित्त सत्कार व पुरस्कार (१९९४), विठ्ठलराव विखे पाटील कला गौरव पुरस्कार (२००१) , पुणे महानगरपालिका पट्ठे बापूराव पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद दादू इंदुरीकर स्मृती पारितोषिक (२००३) , पुणे नवरात्रौ महोत्सव पुरस्कार (२००४), महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार (२००४) , उत्कृष्ट तमाशा अभिनय सम्राट ( पवळा पुरस्कार – २००१ ) , सहकार महर्षी जयंती समारंभ पुरस्कार (२००५), नाद निनाद तमाशा महोत्सव पुरस्कार (२००६), नांदेड जिल्हापरिषद तमाशा महोत्सव पुरस्कार (१९९०). तमाशा करत असताना त्यांनी अनेक गावातील शाळांना व मंदिरांना भरघोस देणग्या दिल्या. ढवळपुरी गावातली शाळा बांधली. मारुती मंदिर व दत्त मंदिर बांधले. ह्यात असे पर्यंत शालेयपयोगी वस्तूंचे मुलांना वाटप केले. त्यांनी १६ ऑक्टोबर २००९ साली जगाचा निरोप घेतला . अखिल महाराष्ट्र तमाशा परिषदेत त्यांनी अध्यक्षस्थान भूषविले. सध्या त्यांची दोन्ही मुले किरण चंद्रकांत जाधव ( किरण कुमार ढवळीपुरकर ) व संतोष चंद्रकांत जाधव ( संतोष ढवळीपुरकर ) लोकनाट्य तमाशा मंडळाचे काम आजतागायत सांभाळत आहेत. संदर्भ : क्षेत्र संशोधन पारनेर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील बऱ्याच जणांना चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्या बद्दल माहिती नाही त्यासाठी खास शेअर केले आहे

Tuesday, December 10, 2024

नाळ... नाळ... नाळ

ABORIGINAL PUBLICATION: नाळ... नाळ... नाळ... पूर्वेकडून सूर्य उगवायच्या आत गावातली पाच दहा माणसं व लक्ष्मी आय यांच्यासोबत किसन लांडे राजूरच्या दिशेने पायी चालत निघाला होता. कालच त्याने राजूरच्या बाजारातून नवीन आणलेला ड्रेस घातला होता. त्यामुळे इतरांपेक्षा तो जरा उठून दिसत होता. तासाभराची पायपीट करत ते राजूरच्या मोटारआड्यावर पोहचले. साकीरवाडी गावाला जाणारी सकाळी ९ ची एस.टी. फलाटावर लागली होती. सगळे घाईनेच आपापले सीट पकडून गाडीत बसले. निळवंडे धरणाच्या कामावर जाऊन साचवलेल्या पैशातून त्याने सगळ्यांचे तिकीट काढले. किसनला फक्त आपल्याला साकीरवाडी गावाला जायचे आहे इतकेच माहित होते. तिथे गेल्यावर कोणाच्या घरी जायचे याची कल्पना त्याला नव्हती. एस.टी.चा कंडक्टर जोरात ओरडला, “साकीरवाडीला उतरणा-यांनी लवकर पुढे या.” त्याचा आवाज ऐकताच किसन पटकन आपल्या सीटवरून उठला व दरवाजाच्या दिशेने चालत पुढे आला. त्याच्याबरोबर इतरही माणसं उठली व पुढे आली. गाडी थांबली. सगळे पटकन उतरायला लागले. उतरता उतरता महाद्या काका किसनला म्हणाले, “आरं पोरा इथं कोणाच्या घरी जायाचाय?” किसनने महाद्या काकांना काहीच उत्तर दिले नाही. फक्त गालातल्या गालात हसला. एस.टी.तून खाली उतरल्यावर सगळे रस्त्याच्या कडेला असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली थांबले. तेवढ्यात किसनचा मामा लांबूनच हाक मारत त्यांच्याजवळ आला. किसनचा मामा खडकीचा, पण शेती आणि मॉलमजुरी करण्यातून वेळ मिळत नसल्याने तो पिम्परकणे येथे तसा कमीच यायचा. चार दिवसापूर्वीच तो किसनला पोर पहायला जायचे आहे म्हणून सांगायला आला होता. पण पोर कोणाची हे विचारायची हिम्मत किसनने केली नव्हती. किसनची आई व वडील वारल्यापासून शिक्षणाचा खर्च तसा याच कुंडलिक मामाने केला होता. किसनने बी.एड. केल्यावर आता नोकरी लागल्यावर लग्न करावे असे गावातल्या लोकांना वाटत होते. पण किसन एकटाच असल्याने त्याच्या लग्नाची घाई मामाने केली होती. किसनला लग्न करायचे आहे कि नाही याचे मत तसे कोणी विचारात घेतले नव्हतेच. कुंडलिक मामाच्या मागे चालत चालत सर्व एका कौलारू घराच्या अंगणात आले. पाहुणे येणार असल्याचा निरोप त्यांना अगोदरच असल्याने घरातील सर्व स्वागताला अंगणात आले होते. पाहुण्यांची ओळख पाळख झाल्यावर घोंगडीवर बसायला सांगितले. सर्व बसत नाहीत तोच पाणी घेऊन एक सुंदर व गोरीपान पोरगी काहीसी लाजत आली. पोरीच्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याची हिम्मत किसनची नव्हती. हा एका कोपऱ्यात खाली मान घालून बसला होता. त्याने फक्त तिच्या हातातला तांब्या बघितला. बाकी वर नजर करून बघायची इतक्या माणसात हिम्मत केली नाही. कुंडलिक मामा, महाद्या काका, लक्ष्मी आय व सोबत आलेले सर्व इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यात रमून गेले. या गप्पा जवळपास अर्धा तास चालल्या. घरातून बाई माणसाचा आवाज आला, “अहो पाहुण्यांना जेऊ घालणार आहात कि नाहीत....फार लांबून आलेत त्ये...” यावर सगळे हसायला लागले. नाथू भांगरा म्हणजे गावातले एक प्रतिष्ठीत व्यक्तिमत्त्व... त्यांच्या दारात आलेला माणूस असा जेवल्याबिगर कधीही जात नाही. नाथूने आवाज दिला, “अगं राधे मी यांना असं कसं जाऊ देईल व्हय... बिगर दोन घास खाल्याचं” नाथूने आपल्या गप्पांना आवर घालत सर्वांना जेऊन घेण्याची विनंती केली. जेवता जेवताही गप्पांची मैफिल पुन्हा रंगात आली होती. सर्वांचे जेवण झाले. सर्वांना पानसुपारी दिली गेली. किसन अजूनही तसा गप्पच होता. नाथू भांगरा आपल्या हातातल्या आडकित्त्यात कात सुपारी कापू लागला. तसा किसनला त्या आडकित्त्यात आपली मान अडकलीय कि काय असा भास झाला. तो आपल्या मामाला म्हणाला, “मामा लै उशीर झालाय, आता निघाया पाह्यजे.” “अरे हो रे...जायचंय...पण ज्या कामाला आलोय, त्ये तर बाजूलाच राहिलं..” नाथू तिकडून बोलला, “प्वॉर काय करतंय?” “बी.एड.झालंय,” कुंडलिक मामा उत्तरला. “प्वॉराचे आई बाप?” “त्ये तर कधीच देवाघरी गेल्येत...याला म्याच शिकावला...” मामाचे वाक्य कानावर पडताच किसनच्या मनात धस्स झालं...पण काहीच बोलला नाही. “काम धंद्याचे काय?” “चार पाच ठिकाणी अर्ज केलेत...त्यातला एखादा तरी कॉल येया पहिज्ये” “घरा बिराचं कसं काय?” “अहो पिंपरकण्यात लै मोठा घर हाय...त्याच्या आय बापानं आधीच बांधून ठिवलाय. तुम्ही त्याची काळजी करू नका..तुमची पोर राज्य करील असं सगळं हाय” महाद्या काका बोलले. “तुमची पोर श्यात करणार आसल तर त्ये बी चिक्कार हाय...” लक्ष्मी आयनं पुढचं बोलून टाकलं. “बरं त्ये देण्या-घेण्याचं कसं करायचं?” “आम्हाला काही नको...फक्त तुमची पोर द्या.” कुंडलिक मामा बोलला. “माना-पानाचं जाऊ द्या.... पर त्ये गावाच्या रितीप्रमाणं द्याज काय द्येनार त्ये सांगा..” नाथू बोलला. “अहो पाव्हणं प्वॉर आमचं एकटं...ना माय ना बाप....त्ये काय द्येणार....तुम्हीच सांगा झेपंल असं काही तरी...” महाद्या काका वडीलकीच्या नात्याने बोलले. “प्वॉताभर तांदूळ द्या...बाकी काही नको...तुम्ही आमचीच माणसा..पण रीत राखाया पहिज्ये म्हणून...” “दिला....रीतीप्रमाणं प्वॉताभर तांदूळ मी मह्या घरून देईल.” सगळी बोलणी झाली. कुंडलिक मामाने सर्वांना गाडीत बसवून दिले आणि तो त्याच्या रस्त्याने निघून गेला. सर्व राजुरात उतरल्यावर किसनला पोर तुला आवडली का म्हणून विचारू लागले. किसन बिच्चारा आपला गालातल्या गालात हसत पायी चालत सर्वांच्या पुढे निघाला होता. आपलं लग्न जमलंय हि कल्पनाच त्याला आता हळू चालू देत नव्हती. देवकी आणि किसनच्या लग्नाची नाथू भांग-याने मोठी जय्यत तयारी केली होती. शिकलेला जावई मिळाला म्हणून तो मिशीला ताव मारत सर्वांची विचारपूस करत होता. लग्नात जेवण, मान पान सगळं झाल्यावर व-हाड निघालं. सर्वांनी आपल्या बैलगाड्या जोडल्या. नवरा - नवरीची गाडी सजलेली होती. गाणी म्हणत म्हणत सर्व साकीरवाडीच्या घाटातून निघाले. राजुरामधून गाड्या उताराला लागल्या होत्या. लग्नाच्या गाण्यांचा आवाज राजूरच्या पेठेने ऐकला होता. आता प्रवरा नदी ओलांडून गाड्या धुराळा उडवत पिंपरकणे गावाच्या जवळ आल्या होत्या. पिंपरकणे गाव देवकी दुरूनच न्याहाळत होती. सगळीकडे चार पाचशे कौलांची घरे जणू काही आपल्याच स्वागताला सजलेत असे तिला वाटत होते. सर्वांच्या गाड्या देवळासमोर आल्या, तेव्हा सूर्य मावळतीला गेला होता. आकाशात सोनेरी किरणांनी जणू नवीन जोडप्यांच्या स्वागताला रांगोळी काढली होती. देवळात नवरा नवरीला बसायला आदिवासी रितीप्रमाणे घोंगडी अंथरली होती. किसनच्या घरात कोणी नव्हते, पण सारा गाव त्याला आपलं मानत होता. त्यामुळे सगळेच देवळात जमले होते. कोणी नाव घ्या म्हणून हट्ट धरत होते, तर कोणी कसं वाटलं आमचं गाव म्हणून देवकीला विचारत होते. लगीन होऊन महिना उलटून गेला होता. आता नियमितपणे विचारपूस करणारे तसे कोणी किसन व देवकीच्या घराकडे फिरकत नव्हते. देवकीची सर्व मूळ झाल्याने ती आता आपल्या संसारात रमली होती. आपली शेती करत किसन नोकरीसाठी मुलाखती द्यायला शहरात जात होता. किसन मुलाखतीला गेल्यावर नाचणी, वरईची व इतर राबाची कामं तिच करत होती. घरात जरी दोघंच असली, तरी ती भाताच्या आवणीसाठी आजूबाजूंच्या शेतात इर्जुकीला जात होती. जोवर नोकरी लागत नाही, तोवर आपण चार पाच गुरं पाळायला काय हरकत आहे म्हणून देवकी किसनकडे हट्ट करत होती. किसनने देवकीचे ऐकत आपल्या मामाच्या गावाला जाऊन काही गायी आणल्या. कधी किसन तर कधी देवकी त्या गायी चरायला रानात नेत असत. लग्न होऊन एक वर्ष कसं संपलं हे किसन व देवकीला समजलंच नाही. “अहो मी मह्या आयबापाकडे जाऊन येत्ये” गव-यांचा कलवड रचता रचता ती किसनला बोलली.” “का गं असं अचानक?” “अहो या वर्षी म्हणे निळवंडे धरणात पाणी धरणार हायेत...मग आपला राजुरा जायाचा रस्ता बंद व्हईल... मग आपल्याला काय लागल त्या आणता येणार नै.” “थांब दोन चार दिसानं आपली कामा उराकली का जा..” “तुमचं तर प्रत्येक टायमाला आसंच असतंय...कधी मला येळ्येवं मह्या माह्येराला जाऊ देत नै.” “जा बाय जा तुला जव्हा वाटल तव्हा.” दुसऱ्या दिवशी देवकीने लवकरच उठून किसनच्या वाट्याच्या दोन भाकरी थाबुन व आपल्या सोबत घेऊन जाण्यासाठी काही भाकरी थाबुन घेतल्या. गुरांना चारा पाणी करून ती चालतच राजूरच्या दिशेने निघाली. चार दोन दिवस राहून ती पुन्हा आपल्या घरी आली. येताना आपल्याला लागणारे मीठ, मिरची व इतर घरातील जिनसा घेऊन आली होती. त्यामुळे तिच्याकडे असणारे सगळे पैसे संपले होते. पाऊस सुरु झाला तसे नदीत पाणी भरायला सुरुवात झाली. पिंपरकणे येथून राजूरला जाणारा रस्ता बंद झाला. एखाद्याला राजूरला जायचे असेल तर त्याला वाकीमार्गे वळसा घालून जावे लागणार होते. त्यासाठी लागणारे तिकिटाचे पैसे अधिकचे आता खर्च होणार होते. पहिल्यांदाच नदीत पाणी साठले असल्याने होड्यांची सोय देखील नव्हती. त्यात गणा लांडे याला कोणाकडून तरी एक लहानशी होडी मिळाली होती. पण त्यात फक्त तीन चार माणसे बसू शकत होती. त्यात पाऊस पडत असल्यावर ती होडी चालवण्याची हिम्मत गणा करत नव्हता. एके दिवशी कोंबडा आरवला तसा देवकी आपली गोधडी आवरून घाईत उठली. सगळीकडे अजूनही काळोखच होता. अंधाराला तिने तसं मित्रच मानलं होतं. कारण पावसाळा म्हटला कि विजेचा लपंडाव हा नित्याचाच. त्यामुळे पिम्परकणे येथे आल्यापासून तिचा दिवस सूर्य पूर्वेकडून उगवायच्या आत अंधारात सुरु होत असे. रोज सकाळी गावाला जाग यायच्या आत ती आपली हातातली कामे उरकण्याचा प्रयत्न करत होती. पडवीतल्या जनावरांना चारा टाकण्याच्या अगोदर शेण उचलण्यासाठी ती तिकडे जायला निघाली. पण अचानक तिच्या पोटात कळ मारून आली. डोक्यावरचा पदर कंबरेला करकचून बांधला व ती तशीच कामाला लागली. बाहेर थोडा थोडा पाऊस पडत असल्याने डोक्यावर शेणाची पाटी घेऊन उकिरड्यावर जात असताना शेणाचे ओघळ पावसाच्या पाण्याबरोबर तिच्या तोंडावरून खाली ओघळत आले होते. शेणाचा गालावरून खाली आलेला ओघळ एका हाताने पुसत तिच्या मनात विचार आला कि आज आपण तपासणी करायला डॉक्टरकडे गेले पाहिजे. कारणही तसेच होते. कारण पोटातल्या कळा आज तिला जरा वेगळाच संकेत देत होत्या. हातातली कामे उरकत असताना पूर्वेकडून सूर्य उगवून आला होता. सूर्याचे दर्शन होताच तिच्या मनात धस्स झालं होतं....सूर्य उगवला म्हणजे देवगाव, वाकी मार्गे राजूरला जाणारी बस आता निघून गेली असेल. आता दवाखान्यात कसं जायच्या या चिंतेत तिच्या पोटातील कळ अधिकच जोर करत होती. तिला होणाऱ्या वेदना समजून घ्यायला अजून किसन झोपेतून उठला नव्हता. रात्रभर पडलेल्या पावसाने अंगणात चिखल झाला होता. हातात खराटा घेऊन ती अंगणात झाडू मारण्यासाठी पुढे झाली, तितक्यात तिला रस्त्यावरून जाताना महाद्या काका दिसले. तसे त्यांना लाडाने सारा गाव महाद्या काका अशीच हाक मारायचे. “काका राजुरा जाणारी इस्टी गेली का हो?” देवकीने त्यांना हाक मारून विचारले. “का गं बाय....आज त्या इस्टीचा काय काम काढला?” “काय नाय काका आसंच इच्चारलं...” ती हळूच पुटपुटली. “ती मढं उकरी कव्हाच गेली... आता तर ती देवगावात पोहचली आसल..” महाद्या काकांचे इस्टी गेली असल्याचे शब्द कानावर पडताच ती जणू आपल्यावर डोंगर कोसळला कि काय म्हणून खाली बसली. अचानक खाली बसल्याने तिच्या पोटात अधिक दुखू लागले. लग्न झाल्यापासून पहिल्यांदा तिच्या पोटात असे दुखत असल्याने ती कोणाला काही सांगायला तयार नव्हती. किसन सोडता घरात तसं दुसरं कोणी नव्हतं. त्यामुळे आपलं दुखणं पोटातल्या पोटात गिळून ती काम करत होती. आता तिला माहित होतं कि एस टी गेली म्हणजे आपण राजुरला दवाखान्यात जाऊ शकत नाही. खाजगी गाडीने राजूरला जाण्याइतके पैसे आपल्या नवऱ्याकडे नाहीत याची तिला जाणीव होती. देवकीचा नवरा, किसन शिकलेला होता, पण राजूरच्या पोष्टात आलेले त्याचे नोकरीचे पत्र त्याला वेळेत न पोहचल्याने त्याला नोकरी लागू शकली नव्हती. राजूर आणि पिम्परकणे हे अंतर अवघ्या एका तासाचे पायी चालत जाण्याचे असले, तरी निळवंडे धरणाचे पाणी अडवायला सुरुवात केल्यापासून हे अंतर वाढले होते. त्यामुळे राजूरच्या पोष्टात आलेली पत्रे पिम्परकणे येथे पोहचायला अनेकदा महिना लागू लागला होता. आता तर किसनचे राजूरला जाणे बंद झाल्याने नोकरीसाठी कुठे अर्ज करणेही बंद झाले होते. त्यात लग्न झाल्याने त्याला घरातील जबाबदारी पार पाडावी लागत होती. बाहेर रिमझिम पावसासोबत आता रात्रभर गायब असलेले वादळ पुन्हा गावकुसाच्या आसऱ्याला घोंगावू लागले होते. सकाळी दर्शन दिलेला सुर्यनारायण आता ढगांच्या आड गायब झाला होता. बाहेरच्या वादळाने चुलीचा धूर काही बाहेर पडायचे नाव घेत नव्हता. देवकीने आता भाकरी थापायला सुरुवात केली होती. ओल्या लाकडांचा धूर तिच्या डोळ्यांची आगआग करत होता. त्यात पोटातली कळ अधूनमधून त्रास देत होती. धुराशी दोन हात करत तिने तव्यावर भाकर टाकली. ताम्ब्यातलं थोडं पाणी हातावर घेऊन तिनं तव्यावरच्या भाकरीवरून हात फिरवला व दुसरी भाकर थापायला लागली. दुसरी भाकर थापून झाल्यावर तिनं चुलीतली लाकडं हलवून इस्तव बाहेर ओढला व त्यावर तव्यावरची भाकर अधिक खरपूस भाजण्यासाठी टाकली. खाटवटीट असलेली भाकर तव्यावर टाकली. आहारावर टाकलेली भाकर हाताने फिरवत असतानाच बाहेरून महाद्या काकाने आवाज दिला. “देवके...अगं ये देवके....!” हातातली भाकर टोपल्यात टाकून आवाजाच्या दिशेने ओ देत ती घाईघाईने बाहेर आली. “काय झालं काका... सकाळीच तर तुम्ही मला येथून शेतात जाताना दिसला होता. आता काय झालं? इतक्या जोरानं हाका मारताय...” “अगं इथं काय बोलत बसलीय...तिकडे तो किसन शेतात गुरं घेऊन गेला होता.” “हो काका....त्यांना मीच तर गुरं शेतात घेऊन जायला सांगितलं होतं.” “अगं पोरी इथं बोलत काय बसलीस....चल तिकडं शेतात...किसन चक्कर येऊन पडला आहे. त्याला काय झालंय काय माहित. पण तो काही बोलत नाही. मी आपला राम्या आणि सुभ्या यांना त्याच्याकडे पाठवलं आहे. तू चाल लवकर...” तव्यावरची भाकर तशीच ठेऊन, पिठाचा हात तसाच घेऊन ती शेताच्या दिशेने धावत सुटली. चिखल तुडवत तुडवत ती धापा टाकत महाद्या काकांच्या मागे किसन जिथे चक्कर येऊन पडला होता तिथे गेली. किसनची झालेली अवस्था पाहून त्याला काय झालंय याची कोणालाच कल्पना येत नव्हती. तिथला गडबड गोंधळ ऐकून इतरही गुराखी व शेतात काम करणारे शेतकरी तिथे जमा झाले होते. किसन बेशुद्ध असल्याने त्याला नक्की काय झालंय यावर गर्दीत तर्क वितर्क लावले जात होते. “आरं त्याला बैलानं मारलं आसल..” “देवाच्या फेऱ्यात सापडला कायनु ब्वा..?” “भूता बितानं त धरला नसल..?” “आरं पान बिन लागला कि काय नीट ह्येरा..” लहू लांबूनच ओरडला. तिथे आलेला प्रत्येक जण आपलं मत मांडत होता. देवकी मात्र किसनची ती अवस्था पाहून गर्भगळीत झाली होती. ती किसनच्या तोंडावरून हात फिरवत हमसून हमसून रडत होती. तिचा हुंदका मात्र त्या गोंधळात कोणाला ऐकू येत नव्हता. देवकी शिकलेली होती. तिला वाटत होतं त्याला नक्की काय झालंय यावर चर्चा करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा त्याला काही करून दवाखान्यात घेऊन जायला हवं. पण दवाखान्यात जायचं म्हणजे एखादी गाडी पहायला हवी आणि गावात तर कोणाकडेही गाडी नव्हती. त्यात नदीला पाणी आल्याने राजूरला जाणारा रस्ता बंद झाला होता. त्यामुळे बैलगाडीने किंवा झोळी करून त्याला राजूरला नेणे शक्य नव्हते. तसेच गाडी करायची म्हणजे त्याला पैसे लागणार....गाडी करण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. म्हणून ती अजूनही गप्पच होती. बराच वेळ गोंधळात गेल्यावर महाद्या काका जोरात ओरडले, “इथं काय येळ दवडीत बसल्यात कायनू ब्वा...त्याला देवळात बिवळात न्येलं पहिज्ये.” किसनला देवाची अडचण असावी यावर देवकी सोडून सर्वांचे एकमत झाल्याने त्याला झोळी करून नेले पाहिजे यासाठी धावपळ सुरु झाली. देवकीच्या पोटातलं दुखणं कळ मारत होतं...पण किसनची झालेली अवस्था पाहून तिचं दुखणं बाजूला पडलं होतं. सखादादाच्या पिंट्याने एक लांब लाकूड आणून त्याला आपल्या खांद्यावरील घोंगडी बांधली व त्याची झोळी बनवली. सर्वांनी मिळून त्या झोळीत किसनला ठेऊन पिचडांच्या राजाने पुढची व थिगळ्यांच्या खंड्याने मागची बाजू आपल्या खांद्यावर घेतली व ते गावाच्या दिशेने चालू लागले. देवकीच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. परंतु पैशाची नड असल्याने ती काही बोलत नव्हती. सर्वांच्या मागे ती जीव मुठीत धरून चालत होती. अधून मधून कंबरेला पहाटे बांधलेला पदर अधिक घट्ट बांधत होती. वाढलेल्या गवतातून वाट काढत काढत चिखल तुडवत ते सर्व गावातल्या देवळात आले. किसनला देवळात ठेवले. एक जण लगबगीने पांडू भगत ज्या झापावर राहत होता, तिकडे धावत गेला. पांडू भगत देवळात येईपर्यंत दुपार टळून गेली होती. पांडूने आल्या आल्या किसनचा हात आपल्या हातात घेतला. नाडी तपासली. त्याच्या हाता पायाची बारकाईने तपासणी केली. उजव्या पायाच्या अंगठ्याजवळ त्याला काही तरी चावल्याच्या खुणा स्पष्ट दिसल्या होत्या. किसनला काय झालंय हे त्याला समजून चुकलं होतं. त्यामुळे त्याच्याही तोडावर घाम आला होता. पांडूच्या चेहऱ्यावरील भाव पाहून देवकीला धोका किती आहे याची कल्पना आली होती. पांडूने आपल्या पिशवीतून काही झाडपाला काढून तो दगडावर कुटू लागला. त्याचा रस काढून त्याने किसनच्या ओठांवर ओतला. त्यातील काही रस जिभेवरून घशाच्या खाली उतरल्याची खात्री पांडूने केली. देवकीला त्याने घाबरू नको... देवाला मी साकडं घालतो...सगळं काही ठीक होईल. तू आता घरी जा आणि संध्याकाळी परत ये. “नाही काका....मी यांना सोडून नै जाणार...आणि जाऊनही म्या घरी काय करणार...?” देवकी बोलली. “आगं पोरी तू इढं रहून तरी काय करशील.... आम्ही समदी हाये इढं... तू व्हय घरी अन दोन घास खाऊन इ...आम्ही आहोत इढं,” महाद्या काका देवकीला बोलले. सगळ्यांच्या आग्रहास्तव इच्छा नसतानाही ती घाईने घरी गेली. घराची कडीही तिने लावली नव्हती. घरात जाताच तिला विझून गेलेली चूल आणि तव्यावर जळून खाक झालेली भाकर दिसली. ते चित्र पाहताच तिच्या पोटात जोरात कळ मारून आली आणि ती वेदनेने जमिनीवर लोळू लागली. तिकडे किसन देवळात निश्चल पडला आहे आणि इकडे देवकी पोटाच्या वेदनेने विव्हळत होती. तिचं असं ओरडणं ऐकून बाजूची मंगल धावत आली. देवकीला नक्की काय झालंय हे तिला समजेना. तिने घाईतच लक्ष्मी आयला बोलावलं. तिने देवकीला पाणी देऊन जरा शांत राहण्यास सांगितले. पण देवकीला वेदना सहन होत नसल्याने ती हात पाय जमिनीवर मारत ओरडत होती. लक्ष्मी आयने देवकीचा हात हातात घेतला आणि सांगितले कि अरे हि तर पोटुशी आहे. इला काहीही करून दवाखान्यात न्यायला पाहिजे. हिच्या पोटातला गर्भ सरकला असावा म्हणून इला त्रास होतोय. तिकडे किसन देवळात आणि इकडे घरात देवकी...दोघेही एकमेकांचे आधारस्तंभ आता अडचणीत होते. कोणी कोणाला आधार द्यायचा हा प्रश्न होता. दवाखान्यात जायचे तर आता वेळ पुरणार नव्हता. पावसाळ्याचे दिवस असल्याने या वेळेला जीव धोक्यात घालून कोणी होडी चालवणार नाही. त्यामुळे राजूरला दवाखान्यात जायचे तर सकाळच्या एस.टी.चीच वाट पहावी लागणार होती. सगळा नाईलाज होता. पांडू भगत आपल्या झाडपाल्याच्या रसाचा उपयोग करून किसनच्या शरीरातील सापाचे विष कमी करण्याचा प्रयत्न करत होता. परंतु किसनच्या चामडीचा रंग हळूहळू काळा पडू लागला होता. पांडूला आपली हतबलता समजून चुकली होती. त्याने महाद्या काकांना एका कोपऱ्यात बोलावून त्याच्या कानात काही तरी कुजबुज केली. महाद्या काका धावतच होडीवाल्या गण्याच्या झोपडीकडे गेला. त्याच्या हातापाया पडला. काही करून आपल्याला किसनला राजूरला दवाखान्यात नेले पाहिजे हे समजावू लागला. या वादळात व हेलकावे खाणाऱ्या पाण्यावरून होडी चालविणे फारच जोखमीचे काम आहे असे गणा सांगत होता. पण महाद्या काकाचे आर्जवी बोलणे पाहून तो शेवटी तयार झाला. पण यातही एक अडचण होती. अनेक दिवस होडी उपयोगात नसल्याने ती चालते कि नाही याची खात्री करावी लागणार होती. अनेक दिवस होडी पडून राहिली तर तिच्या फटीतून पाणी होडीत घुसण्याची शक्यता असते. तसे झाले तर या अंधारातजीव गमावण्याची नामुष्की सर्वांवर येऊ शकते. त्यात वादळ पण सुरु आहे, होडी चालवणे धोकादायक होईल. क्षणाचाही विलंब न करता गण्याने होडी तपासली आणि काही धोका नसल्याची खात्री केली. महाद्या काका घाईने परत देवळात आले व सर्वांना सांगू लागले कि किसनला सर्पदंश झालेला आहे. आता फार वेळ देवाला साकडं घालून हातावर हात ठेऊन गप्प बसणं फायद्याचं ठरणार नाही. त्याला काहीही करून दवाखान्यात घेऊन जावे लागेल. या धावपळीत लक्ष्मी आय पण देवळात आली होती. तिने महाद्या काकांना देवकीची अवस्थाही बिकट असल्याची माहिती दिली. दोघांना होडीतून घेऊन जाणे शक्य होईल का याची खात्री करण्यासाठी गण्याला निरोप दिला. गण्याने या अंधारात चार पाच माणसांना होडीतून घेऊन जाण्यास नकार दिला. सर्वांनी त्याला फार विनंती केली, परंतु इतक्या सर्वांचा जीव मी धोक्यात घालू शकत नसल्याचे तो म्हणत होता. शेवटी लक्ष्मी आयने किसनपेक्षा देवकी दोन जीवांची असल्याने तिला दवाखान्यात घेऊन जाणे आवश्यक असल्याचे मत मांडले. देवकी मात्र पोटातल्या वेदनांकडे दुर्लक्ष्य करत किसनला दवाखान्यात घेऊन जाण्याचा आग्रह करत होती. आपण दोन फेऱ्या मारू आणि तुझ्या नंतर किसनला पण दवाखान्यात आणू असे महाद्या काकाने समजावल्यावर ती दवाखान्यात जायला तयार झाली. गण्याने डोक्यावर घोंगडी पांघरली व अंधारात चाचपडत होडी नदीच्या पाण्यात नेऊन सोडली. पाण्यातल्या लाटांवर होडी अधिकच हेलकावे खाऊ लागल्यावर त्याच्या मनात भीतीचे काहूर सुरु झाले होते...पण प्रसंग कठीण असल्याने तो धीर धरून महाद्या काकांना आवाज देऊ लागला, “महाद्या काका... म्या व्हडी पाण्यात सोडलीय...तुम्ही या लवकर. परत पाऊस सुरु झाला, तं अवघड व्हइल सगळं.” लक्ष्मी आयने घाईत हाताला येईल ती देवकीची साडी व पांघरण्यासाठी एक दोन गोधड्या पिशवीत भरल्या व आपली सून सुशीलाला देवकीचा हात धरून होडी पर्यंत त्यांना पोहोचविण्यास सांगितले. घरापासून बरंच लांब चालत जावं लागणार होतं. पण त्याला काही इलाज नव्हता. सुशीलाच्या हाताला धरून त्या अंधारात देवकी चाचपडत चालत होती. पोटात कळ आली कि खाली बसत होती. शेजारचा सोम्या कंदील घेऊन उजेड दाखवायला सोबत आला होता, पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. कारण सोसाट्याचा वारा सुटल्याने कंदिलाची वात नावालाच पेटत होती. त्या मिणमिणत्या प्रकाशात कसेबसे ते प्रवरा नदीच्या किनारी पोहचले व गणाची होडी कुठंय ते शोधू लागले. लक्ष्मी आय, देवकी व महाद्या काका अशा तिघांना घेऊन होडी राजूरच्या दिशेने जाऊ लागली. अधूनमधून येणाऱ्या हवेच्या झोताने होडीची दिशा अंधारात भरकटत होती. परंतु प्रवरेच्या बाजूच्या टोकाला असलेल्या घराच्या समोरील लाईटच्या अंदाजाने गणा होडी चालवत होता. धरणाच्या पाण्यात विजेच्या तारा देखील बुडालेल्या होत्या. त्यांना चुकवत होडी पुढे घेऊन जाण्याचे काम गणा मोठ्या शिताफीने करत होता. त्या तारांना चुकून होडी अडकली तर सगळंच अवघड होईल याची जाणीव गणाला होती. हेलकावे खाणाऱ्या पाण्यावरून चालणारी होडी आणि त्यात देवकीच्या मनात चाललेले विचारांचे काहूर जणूकाही नियतीचा एक वेगळाच खेळ असावा असेच देवकीला वाटत होते. तिच्या मनात सतत येत होते कि जर निळवंडे धरण नसते, तर तिला सकाळीच पोटात कळा येत असताना किसनला घेऊन राजूरच्या दवाखान्यात जाता आले असते. पण दुर्दैवाने निळवंडे धरणाने अनेकांच्या शेतीच्या विकासाला आधार दिला असला, तरी अनेकांची तहान भागविणारे पाणी आज देवकीच्या तोंडचे पाणी पळविण्यास कारणीभूत ठरले होते. होडी अनेक लाटा व वादळाचा सामना करत पुढे जात असताना गणा मात्र आपण त्या कडेला पोहचू कि नाही याबाबत मनात शंका घेऊन होडीला मोठ्या ताकदीने वल्हवित होता. होडी नदीच्या किनाऱ्याला लागणार तोच पावसाने आपला जोर वाढवला होता...वाराही आपले रूप त्या अंधारात दाखवत होता. कशीबशी गणाने होडी किनाऱ्याला लावली. देवकीला हात देऊन तिला उतरवले, नंतर महाद्या काका व लक्ष्मी आय उतरली. पावसाने जोर वाढवल्याने गणाने आपल्या डोक्यावरील घोंगडी देवकीच्या अंगावर टाकली. लक्ष्मी आय व महाद्या काका हे दोघेही चांगलेच भिजले होते. ते सर्वच थंडीने कुडकुड करत होते. थोडा वेळ आडोश्याला थांबावे असे वाटत असताना देवकीला लवकरात लवकर दवाखान्यात घेऊन जाणे गरजेचे आहे असे सर्वांना वाटले. महाद्या काका, गणा, लक्ष्मी आय हे तिघेच त्या अंधारात देवकीच्या सोबत होते. गणा जर होडी घेऊन परत माघारी फिरला तर देवकीला राजूरपर्यंत चालणे शक्य होईल का हा प्रश्न महाद्या काकाच्या मनात डोकावला. तसे त्याने गणाला बोलून दाखवले. गणाला देखील परिस्थितीचे गांभीर्य समजले व क्षणाचा विलंब न लावता त्याने नदीच्या कडेला आपली होडी बांधली व बाजूलाच पडलेले एक लांब लाकूड शोधून आणले. त्याला नुकतीच देवकीला दिलेली घोंगडी बांधली. देवकीच्या पोटातील कळा थांबायचे नाव घेत नव्हत्या. महाद्या काकाने देवकीला घोंगडीच्या झोळीत बसवले व एक बाजू आपल्या खाद्यावर घेतली व दुसरी बाजू गणाला घ्यायला सांगितली. महाद्या काका वयाच्या मानाने झपाझप पावले टाकत होता. पाठीमागून गणाला पुढील रस्ता दिसत नसल्याने अनेकदा काट्यांवर पाय टाकून पुढे जावे लागत होते. त्या अंधारात गोधड्या व इतर कपड्यांची पिशवी डोक्यावर घेऊन लक्ष्मी आय मागे मागे चालत होती. आकाशात ढगांनी एकदमच गर्दी केली होती. पावसाने चांगलाच जोर धरला होता. त्यामुळे चढाला चालताना महाद्या काका जपून चालत होता. पाय घसरून पडण्याची त्याला भीती वाटत होती. लक्ष्मी आय आता चढाला सर्वांच्या पुढे चालत चालली होती. ती यांना रस्ता चांगला आहे कि नाही याची खात्री करून देत होती. एकदाचा घाट संपला आणि राजूरची घरे दिसू लागली. रात्रीचा उशीर झाल्याने व त्यात पाऊस पडत असल्याने रस्त्यावर एक माणूसही दिसत नव्हता. निवाऱ्याला लपलेली व थंडीने कुडकुडलेली कुत्री यांची चाहूल लागल्याने जोराने भुंकू लागली होती. काही कुत्री अंगावर धाऊन येत होती. लक्ष्मी आय त्यांना हाड हाड म्हणून हाकलण्याचा प्रयत्न करत होती. पण ती कुत्री ऐकण्याच्या स्थितीत नव्हती. कुंभाराच्या भट्टीपासून पुढे जात असताना चार दोन कार्टी गप्पा मारत वळचणीचे पाणी अंगावर पडू नये म्हणून घराच्या व्हरांड्यात उभी राहिली होती. महाद्या काका व गणाच्या खांद्यावरील झोळी पाहून त्यांचे तोंड वाकडे झाल्याचे लक्ष्मी आयने बघितले. सरकारी दवाखान्याचा बोर्ड लांबूनच दिसल्यावर महाद्या काकाला हायसे वाटले. कारण इतके अंतर खांद्यावर ओझे घेऊन चालणे त्यांना तसे जड वाटत होते. पण नाईलाज होता. दवाखान्याच्या गेटजवळ आल्यावर महाद्या काकाने आपली झोळीची बाजू अगोदर अलगद पायरीवर टेकवली. त्यानंतर गणाने आपली बाजू खाली टेकवत देवकीला सावरण्याचा प्रयत्न केला. पाठीमागून आलेल्या लक्ष्मी आयने तिला हात देत तिथे असलेल्या बाकड्यावर बसवले. रात्रीची वेळ असल्याने दवाखान्यात आलेल्या पेशंटची चौकशी करायला लवकर कोणी आले नाही. देवकीला आपल्या पोटातल्या कळा असह्य होत असतानाही किसनला कधी दवाखान्यात आणणार याची काळजी जास्त वाटत होती. ती गणाला लवकर जाऊन किसनला दवाखान्यात घेऊन येण्याची विनंती करत होती. गणा तिला जातो म्हणून आधार देत होता. पण मनात मात्र तो एकट्याने इतक्या रात्री परत जाण्यास इच्छुक नव्हता. देवकीच्या पोटातल्या कळा थांबायचे नाव घेत नव्हत्या. तिची ती अवस्था पाहून लक्ष्मी आय अधिक काळजी करत होती. ती सारखी महाद्या काकांना डॉक्टर आलेत का बघा याची चौकशी करायला सांगत होती. सरकारी दवाखाना म्हटला कि इतकी वेळ वाट पहावीच लागणार याची जाणीव महाद्या काकांना होती आणि त्यात हि रात्रीची वेळ असल्याने आपल्याला डॉक्टर भेटेल कि नाही याची खात्री महाद्या काकांना नव्हती. तासाभरात डॉक्टर आले. त्यांनी देवकीला पोट कधीपासून दुखत आहे याची विचारपूस केली. पहाटेपासून पोट दुखत असल्याचे सांगताच, डॉक्टर तिच्यावर ओरडू लागले. इतका उशीर का झाला? असे काही बाही प्रश्न विचारून रात्रीच्या वेळी उठावे लागल्याचा राग व्यक्त करत होते. देवकी मात्र किसनच्या काळजीत असल्याने काहीच बोलत नव्हती. सकाळची एसटी गेल्यावर राजूरला यायला काय कसरत करावी लागते हे डॉक्टरला कोण सांगणार हे मनातल्या मनात ती स्वत:लाच सांगत होती. डॉक्टरांनी तिला प्रसूती कळा येत असल्याची कल्पना लक्ष्मी आयला दिली. तेव्हा घड्याळात रात्रीचे बारा वाजले असल्याची खात्री गणाने केली. आता कधी जायचे आणि कधी किसनला घेऊन यायचे हा विचार महाद्या काका व गणा करत होते. नाईलाजाने गणा व महाद्या काका दवाखान्याच्या व्हरांड्यात भिंतीला टेकून बसले व भिजलेल्या कपड्यांचे पाणी झटकू लागले. पाणी झटकता झटकता दोघांचाही डोळा कधी लागला हे त्यांना कळलेच नाही. पहाटे चार वाजता गणा झोपेतून उठला व कोणाला काही न सांगता नदीच्या दिशेने चालू लागला. सकाळची एस.टी. जायच्या आत त्याने किसनला दोघां-तिघांच्या मदतीने मोटार आड्यावर आणले. एस.टी.आल्यावर किसनला उचलून गणा गाडीत बसू लागला. किसनची अवस्था बघून कंडक्टर त्यांना गाडीत बसू देत नव्हता. या बाचाबाचीत एस.टी. जवळपास अर्धा तास जागची हालत नव्हती. शेवटी गावक-यांच्या विनंतीवरून किसनला गाडीत बसवून गणा व रंगा राजुरच्या रस्त्याला लागले. किसन हालत नसल्याने गणा चिंताग्रस्त होता. रात्रभर पांडू भगत काय काय प्रयत्न करत होता याची माहिती रंगा सांगत होता, परंतु गणाला रात्रीचा होडीचा प्रवास डोळ्यासमोर दिसत होता. एस.टी.राजूरच्या मोटार आड्यावर आली. प्रत्येकाला गाडीतून उतरण्याची घाई होती. फक्त किसन मात्र निश्चल होता. गणा व रंगा दोघांनी त्याला झोळीत घालून सरकारी दवाखान्यात नेले. एका खोलीत कॉटवर किसनला ठेऊन गणा महाद्या काकांना भेटला व देवकी कशी आहे म्हणून चौकशी केली. सकाळी ७ वाजता तिला मुलगी झाली असल्याची खबर महाद्या काकाने देताच गणाला काहीसा आनंद झाला. परंतु तो आनंद फार काळ टिकला नाही. कारण तिकडे डॉक्टरांनी किसनला तपासले होते आणि त्याच्यासोबत कोण आहे म्हणून जोरात ओरडत होते. डॉक्टरांच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच महाद्या काका व गणा धावत तिकडे गेले. डॉक्टरांनी पेशंटची अवस्था अतिशय वाईट असून विष संपूर्ण अंगात भिनल्याने आम्ही काहीच करू शकत नाही अशी माहिती दिली. कालच तुम्ही याला दवाखान्यात आणायला हवे होते. आता फार उशीर झाला आहे. तुम्हाला पेशंट वाचवायचे असेल तर तालुक्याला घेऊन जावे लागेल, कारण आमच्याकडे सर्पदंशावरील लस शिल्लक नसल्याने आम्ही काहीच करू शकत नाही असे बोलले. “लस नाही..म्हणजे काय...आम्ही गरिबांनी कुठं जायाचं ?” महाद्या काका बोलले. “सॉरी काका...मी काहीच करू शकत नाही.” डॉक्टर बोलले. लस नाही... म्हणजे किसनला अकोल्याला न्यावे लागणार... पण अकोल्याला न्यायचे तर पैसे पाहिजे. तेवढे पैसे कोणाकडेच नव्हते. आता काय करायचे या विचारात सर्वांच्या डोळ्यात पाणी आले होते. महाद्या काका लक्ष्मी आयकडे गेले आणि काय झालंय हे सांगितले. लक्ष्मी आयने पैशाची निकड जास्त महत्त्वाची आहे हे ओळखून मागचा पुढचा विचार न करता आपल्या गळ्यातील मंगळसूत्र महाद्या काकाच्या हातात दिले आणि म्हटले कि याचे पैसे किती मिळतात ते बघा आणि किसनला काही करून अकोल्याला घेऊन जा. लक्ष्मी आय आणि किसन हे फक्त शेजारी होते. तसे रक्ताचे नाते काहीच नव्हते. पण तरी देखील अडचणीच्या वेळी आपलं मंगळसूत्र दिल्याचे पाहून महाद्या काकाचा थकवा देखील गायब झाला होता. हातातले मंगळसूत्र घेऊन महाद्या काका सन्तु वाण्याच्या घरी गेला. कारण त्याचं दुकान उघडायला अजून बराच वेळ होता. दुकान उघडण्याची वाट पाहिली तर फार उशीर होईल याचा विचार महाद्या काकाने केला होता. सन्तु वाणी देवपूजा करण्यात व्यस्त होता. ते पाहून महाद्या काका बाहेर व्हरांड्यात बसले. पुजा उरकून सन्तु वाणी देवघरातून आत जायला निघताच, त्याचे लक्ष्य महाद्या काकाकडे गेले. “काय काका...साज सकाळीच...काय काम काढलं?” “जरा अडचण होती...म्हणून आलो...” “मग काय मदत करू मी” महाद्या काकाने क्षणाचाही विलंब न करता आपल्या हातातले मंगळसूत्र सन्तु वाण्याच्या हातात दिले. सन्तु वाण्याची आणि महाद्या काकाची जुनी ओळख असल्याने हातात दिलेले मंगळसूत्र खरं सोनं आहे कि नाही हे न तपासता तिजोरी उघडली. हातात नोटा घेऊन मोजू लागला. तेवढ्यात त्याची बायको ओरडली, “अहो तुम्ही सोन्याची तर खात्री केलीच नाही आणि पैसे द्यायला निघालात.” “अगं सोन्यासारखी माणसं हि. इतक्या सकाळी आपल्या घरी इतक्या दूरवरून आलीत म्हणजे काही तरी मोठी अडचण असेल. तू नको यात लक्ष्य घालू.” त्याने बायकोला वरवर उत्तर देत काही नोटा महाद्या काकाच्या हातात ठेवल्या व आपल्या वहीत पेनाने लिहून त्यावर महाद्या काकांचा अंगठा घेतला. हातातल्या नोटा न मोजता त्याने दवाखान्याकडे धाव घेतली. किसनला अकोल्याला घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका शोधली. सरकारी रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकत नसल्याने खाजगी रुग्णवाहिका दवाखान्याच्या गेटवर उभी करून महाद्या काका आत गेले. डॉक्टरांना आम्ही पेशंट अकोल्याला नेत आहोत असे सांगितले. डॉक्टरांनी एक चिट्ठी लिहून महाद्या काकांच्या हातात दिली व अकोल्यात गेल्यावर डॉक्टरांना दाखविण्यास सांगितले. एकीकडे किसनला अकोल्याला घेऊन जाण्याची लगबग सुरु असताना देवकी आपल्या चिमुकलीच्या कोवळ्या चेहऱ्याकडे पाहून आपली वेळ मारून नेत होती. किसनला दवाखान्यात आणले कि नाही याबाबत तिला कोणीच काही सांगत नव्हते. ती लक्ष्मी आयला अधूनमधून याबाबत विचारत होती, पण ती देखील याबाबत काही सांगत नव्हती. महाद्या काका, गणा व रंगा यांनी मिळून किसनला रुग्णवाहिकेत नेले व सीटवर आडवे झोपवून वाहकाला अकोल्याला जाण्याची सुचना केली. गाडी भरधाव वेगाने सायरन वाजवत निघाली. सायरनचा आवाज देवकीने ऐकला देखील. पण तिला कल्पना नव्हती कि त्यात किसन आहे म्हणून. अकोल्याचा रस्त्याने गाडी धावत होती. गाडी खड्ड्यांतून जाताच महाद्या काकाचे डोके वर आपटत होते. पण त्याची त्यांना फिकीर नव्हती. किसनचं काय होईल याचीच काळजी त्यांना अधिक वाटत होती. वेगवेगळे विचार मनात येत असतानाच ते किसनची नाडी तपासून बघत होते. शरीराचा रंग अगदीच काळा पडल्याने त्यांची धाकधूक वाढली होती. एकदाची गाडी रस्त्याच्या कडेला थांबली. अकोल्याचा दवाखाना रस्त्यालगत असल्याने महाद्या काका अगोदर खाली उतरले व खिशातला कागद घेऊन ते दवाखान्यात गेले. तो कागद पाहून डॉक्टर घाईने रुग्णवाहिकेजवळ आले व गळ्यातला स्टेथस्कोप कानाला लावून किसनला तपासू लागले. “फार उशीर झालाय...” डॉक्टर बोलले. “...म्हणजे काय डॉक्टर ?” महाद्या काकांना विचारले. “अहो तुमचे पेशंट कधीच दगावले आहे..” “काय....असं कसं काय...? “अहो खरंच...” डॉक्टरांचे ते वाक्य ऐकताच रोज आपल्याशी गप्पा मारणारा, गुरांमागे धावणारा किसन त्यांना आठवू लागला. ते गपकन खाली बसले व हमसून हमसून रडू लागले. गणा व रंगा यांना नक्की काय झालेय याची कल्पना यायला उशीर लागला नाही. डॉक्टरांनी किसनला शवविच्छेदन करण्यासाठी पाठवून दिले. त्यासाठी वेळ लागणार असल्याने महाद्या काकांनी गणाला देवकीच्या आई वडिलांना निरोप देण्यासाठी साकीरवाडी येथे जाण्यास सांगितले. तर रंगाला आपल्या गावी पिंपरकणे येथे जाऊन गावातील लोकांना निरोप देण्यास सांगितले. दोघांच्या हातात भाड्याला पैसे देऊन महाद्या काका दवाखान्याच्या बाकड्यावर बसून रडू लागले. गणाने सरळ साकीरवाडीला न जाता राजूर येथे दवाखान्यात जाऊन लक्ष्मी आयला याची कल्पना दिली. लक्ष्मी आयने देवकीला याची माहिती देण्यास नकार दिला व गणा बाहेरूनच साकीरवाडी येथे जाण्यास सांगितले. देवकीला दवाखान्यात आता तीन दिवस झाले होते. तिची आई व वडील किसनचा अंत्यविधी करून राजूरला तिला पाहण्यासाठी आले होते. तीन दिवस झाले तरी किसन आपल्याला भेटायला का आला नाही म्हणून ती चिंताग्रस्त होती. दुपारच्या वेळी डॉक्टर आले... त्यांनी देवकीला तपासले व घरी घेऊन जाण्यास हरकत नाही असे सांगितले. आपल्या सोबत आणलेल्या गोधड्या व इतर कपडे यांची पिशवी लक्ष्मी आयने भरली. देवकीच्या आईने बाळाला आपल्या हातात अलगद घेतले. सर्व जण राजूरच्या मोटार आड्यावर आले. अनेक गाड्या आल्या आणि गेल्या, पण यांची गाडी यायला उशीर होता. तिथे बाकड्यावर बसून सगळे जण गंभीर होते. कोणी कोणाशी काहीच बोलत नव्हते. देवकी सारखी किसनची चौकशी करत होती. पण त्याबाबत तिला कोणी काही सांगायला तयार नव्हते. राजूरच्या डेपोतून माईकवर पुकारण्यात आले... साकीरवाडी येथे जाणारी बस २ नंबर फलाटावर लागलेली आहे. साकीरवाडी शब्द ऐकताच देवकीचे वडील उठले व बसकडे पळत जाऊन जागा पकडू लागले. देवकीला क्षणात काय होतंय हे कळत नव्हते. आपण साकीरवाडीला का चाललोय हे ती सारखी विचारत होती. पण लक्ष्मी आय तिला समजावत होती, “कि तू वली बाळंतीण आहे. पिंपरकण्याला गेल्यावर तुझ्याकडे आणि बाळाकडे कोण लक्ष्य देणार..? तेव्हा तू आईकडे जा आणि नंतर ये.” कंडक्टरने बेल मारली. गाडी सुरु झाली. लक्ष्मी आयने खिडकीतून देवकीला बाळाची आणि तुझी काळजी घे असा जोरात आवाज दिला. एस.टी. भरधाव वेगाने साकीरवाडीच्या घाटात वळणे घेत घाट चढत होती. गाडीच्या तुटलेल्या खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या बाभळीच्या झाडांकडे पाहून देवकीच्या मनात असंख्य विचारांचे काहूर माजले होते. पण त्याचं उत्तर कोणी देत नव्हते. साकीरवाडीत देवकी उतरल्यावर गावातील आजूबाजूच्या बाया माणसे तिच्यामागे चालत घराकडे येत होती. नेहमी हसून स्वागत करणारे गाव आज असे का उदास झालेय हेच तिला काही कळत नव्हते. देवकी घराच्या उंबऱ्यातून आत येणार तोच राही मावशीने तिला थांबवले. दोन दगड आणून तिच्या हातातील बांगड्या फोडायला सुरुवात केली. बांगड्या फोडून झाल्यावर तिच्या कपाळावरील कुंकू देवकीला काही कळायच्या आत पुसले. देवकीला काय घडलेय याची कल्पना यायला उशीर लागला नाही. ज्या गावाने हिरवा चुडा देऊन बोळवण केली होती, तेच गाव आज माझा कुंकू पुसायला असे पुढे येईल याची तिला कल्पना करवत नव्हती. तिने अंग टाकून धाय मोकलून किसनच्या नावाने हंबरडा फोडला. तोपर्यंत सारा गाव जमला होता. सर्वांनी आता तुला सोन्यासारख्या पोरीकडे पाहून स्वताला सावरायला पाहिजे म्हणून समजूत काढायला सुरुवात केली. किसनच्या आठवणीत तिला आपल्या चिमुकल्या मुलीकडे लक्ष्य द्यायची देखील इच्छा होत नव्हती. वेळेत जेवण न केल्याने तिचे दुध देखील कमी झाले होते. बाळाला पिण्यासाठी दुध नसल्याने ते देखील भुकेमुळे सारखे रडत होते. बाळाची अवस्था बघून सगळे देवकीला समजावून सांगत होते. पण देवकीच्या डोळ्यातील अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. किसनच्या दिवस कार्यासाठी देवकीला तिचे आई वडील पिंपरकणे येथे घेऊन आले. बाळाला पाहण्यासाठी सारा गाव जमला होता. देवकीचा चेहरा अगदीच निस्तेज झाला होता. आलेला प्रत्येकजण पोरगी अगदी किसनवर गेलीय म्हणून देवकीचे दुख हलके करण्याचा प्रयत्न करत होते. दिवस कार्य पार पडत असताना सारा गाव तिच्या दुखात सहभागी झाला होता. पण तिचं दुख हलकं होत नव्हतं. ज्या गावात किसनचा हात धरून आपण आलो, आज त्याच गावात किसन आपल्यासोबत नाही याची उणीव तिला सहन होत नव्हती. तिच्या डोळ्यातून गालावर ओघळणारे अश्रू अधून मधून येणा-या पावसाच्या सरींमध्ये गडप होत होते. दिवस कार्य एकदाचे पार पडले. सर्व पाहुणे निघून गेल्यावर देवकी आपल्या घरातील सर्व साहित्य आवरून आपल्या आई वडिलांसोबत साकीरवाडी येथे जायला निघाली. आपल्या घराला कुलूप लावत असताना लक्ष्मी आय तिथे आली व देवकीला आता कधी येशील ग बाई म्हणून विचारू लागली. देवकी लक्ष्मी आयच्या प्रश्नाला उत्तर न देता तिच्या गळ्यात पडून रडू लागली. सर्वांनी देवकीला समजावून सांगितले व आपल्याला जायला हवं म्हणून बोलू लागले. माझं शेवटचं तोंड पहायला तरी तुझ्या पोरीला घेऊन येशील ना म्हणून लक्ष्मी आयने देवकीकडे गळ घातली. आयला हो म्हणून देवकी आपले डोळे पदराने पुसत आईच्या मागे चालू लागली. इकडे लक्ष्मी आय देखील रडत रडत अंगणात भिंतीचा आधार घेत खाली बसली. दिवस कसे गेले हे देवकीला कळलेच नाही. देवकीच्या वडिलांनी आग्रह करूनही देवकीने दुसरे लग्न करण्यास स्पष्ट नकार दिलेला होता. तिची मुलगी आता दहावीच्या वर्गात शिकत होती. देवकीच्या हातात पण फोन आला होता. तिच्या फोनवर भल्या सकाळी निरोप आला, लक्ष्मी आय गेली. लक्ष्मी आय गेल्याचा निरोप कळताच शाळेत जाणा-या आपल्या मुलीला आज शाळेत जाऊ नकोस म्हणून देवकीने सांगितले. आपल्या भावाला घेऊन ती पिंपरकणे येथे जायला निघाली. भावाची गाडी राजूरला आली. गाडीने शेंडीकडे जाणारा रस्ता न घेता पिचड साहेबांच्या बंगल्याजवळ उजव्या हाताला वळण घेतल्याने देवकीला प्रश्न पडला कि आपण इकडे कुठे जात आहोत. तिचा भाऊ काहीच बोलला नाही. तो शांतपणे गाडी चालवत होता. त्यांची गाडी राजूरच्या पुढे उताराला लागली. वळणे घेत हळूहळू गाडी प्रवरा नदीच्या तीराजवळ आली. तिला वाटले गाडी आता होडीने जाईल. पण आता तशी काही गरज नव्हती. कारण दोन दिवसांपूर्वीच ह्या पुलाचे उद्घाटन आमदार साहेबांच्या हस्ते झाल्याचे तेथील पोस्टर दर्शवत होते. राघोजी भांगरे जलसेतूवरून गाडीत बसून जात असताना सुमारे १६ वर्षांपूर्वी काय घडले याची तिला आठवण झाली आणि हलकेच तिच्या डोळ्यात पाणी आले. आपल्या आईच्या डोळ्यात अश्रू का आले असा प्रश्न देवकीच्या मुलीला पडला. तिने आपला रुमाल काढून आईचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला....पण देवकी म्हटली अगं असू दे... हा पूल जर तेव्हाच झाला असता ना तर आपली ह्या गावाशी असलेली नाळ कधी तुटली नसती........! - Raajoo Thokal

Wednesday, December 4, 2024

कुंजर गड

अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुका हा दुर्ग संपन्न तालुका आहे. या गिरीदुर्गाच्या मधे एक अपरिचित दुर्गरत्न म्हणजे कुंजरगड हे होय. माळशेज घाटापासून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही भौगोलीकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची असलेली डोंगररांग बालाघाट म्हणून ओळखली जाते. हरिश्चंद्रगडापासून सुरु होणारी ही रांग पूर्वेकडे बीड जिल्ह्यापर्यंत जाते. हीच रांग माळशेज घाट परिसरात पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची सीमा विभागते. या रांगेमध्ये हरिश्चंद्रगडाच्या पूर्वेला कुंजरगड किल्ला दिमाखात उभा आहे. कुंजरगड हा कोंबडा किल्ला या नावानेही ओळखला जातो. कुंजरगडाला जाण्यासाठी दोन तीन मार्ग आहेत. कुंजरगडाच्या जवळ फोफसंडी नावाचे लहानसे गाव आहे. हे गाव डोंगररांगेच्या माथ्यावर असलेल्या पठारी भागात वसलेले आहे. दुर्गम ठिकाणी वसलेल्या फोफसंडीला पोहोचण्यासाठी चांगलीच पायपीट करावी लागते. कुंजरगडाला भेट देण्यासाठी एका मार्गाने चढाई करुन दुसर्‍या मार्गाने उतरल्यास एक उत्तम अशी भटकंती करता येते. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये पिंपळगाव जोगा हे धरण आहे. धरणाच्या दक्षिणेकडून अहमदनगर-कल्याण हा राजरस्ता जातो. तर पाण्याच्या फुगवट्याच्या उत्तर अंगाने खिरेश्वरला जाणारा गाडीरस्ता आहे. या रस्त्यावर गवारेवाडी नावाची लहानशी वस्ती आहे. येथे पायउतार होणे सोयीचे आहे. येथून खिरेश्वर तीन-चार कि.मी. आहे. धरणाच्या जलाशयाकडे पाठ केल्यास समोर बालाघाटाची डोंगररांग पूर्व-पश्चिम पसरलेली दिसते. या डोंगररांगेत एक नाकाड थोडे बाहेर आलेले दिसते. या नाकाडाच्या बाजूला एक घळ उंचावरुन खाली आलेली आहे. याच घळीमधून फोफसंडीला जाणारी पायवाट आहे. या वाटेची चौकशी वाडीतील गावकर्‍यांकडे केल्यास फायद्याचे ठरते. आपण तासाभरात घळीच्या माथ्यावर पोहोचतो. जशी जशी आपण उंची गाठतो तसे तसे माळशेज परिसराचा निसर्ग आपल्यासमोर उलघडत जातो. माथ्यावरुन हडसर, निमगिरी, सिंदोळा, हरिश्चंद्रगड दिसू लागतात.   घळीच्या माथ्यावरुन डावीकडे वळून आपण फोफसंडी च्या वाटेला लागायचे. अनेक टेकड्या आणि घळीना वळसे मारीत आपण दोन-एक तासात फोफसंडीमध्ये दाखल होतो. फोफसंडीतून समोरच कुंजरगडाचे दर्शन होते. गडाची येथून पुढची वाट सोपी आहे. तरी फोफसंडीतून एखादा वाटाड्या अवश्य घ्यावा कारण वाटाड्या असल्याशिवाय कुंजरगडाला असलेला एक निसर्गनिर्मित चमत्कार आपल्याला पहायला मिळणार नाही. कुंजरगड समोर ठेवल्यास डावीकडे खिंड आहे. या खिंडीमधून विहीर गावाकडे जाणारी पायवाट आहे. कुंजरगडाच्या उजवीकडून गडावर जाणारा पायर्‍यांचा मार्ग आहे. पण समोरच्या तुटलेल्या तटबंदीमधून गडप्रवेश करता येतो. कुंजरगडावर शिवाजी राजांनी मुक्काम केल्याची इ.स.१६७० मधील नोंद आहे. गडाची तटबंदी, वाड्याचे अवशेष, पाण्याची टाकी, घरांची जोती असे गडपणाचे अवशेष पहायला मिळतात. गडाच्या माथ्यावरुन मुळा नदीचे खोरे विस्तृत दिसते. हरिश्चंद्रगड, कलाड, आजोबा, घनचक्कर, भैरवगड तसेच कळसूबाई रांगही दिसते. संपूर्ण गडफेरी करण्यास तासभराचा अवधी पुरतो. गडफेरीकरुन पायर्‍यांच्या मार्गाने गड उतरावा. पायर्‍या उतरल्यावर तसेच थोडे पुढे गेल्यावर कातळात कोरलेली गुहा लागते. इथेच सोबतच्या वाटाड्याची गरज लागते. गुहेच्या आतल्या कोपर्‍यात एक सापट तयार झाली आहे. विजेर्‍यांच्या उजेडात सावधगिरीने या सापटीत शिरावे लागते. सुरवातीला काही अंतर रांगत जावून नंतर झोपून डावीकडे वळावे लागते. जमीनीलगत असलेल्या लहान भोकातून डोके आत घालून सर्व शरीर आत ओढून घ्यावे लागते. येथून आत शिरल्यावर पुढे हे भोक मोठे होत जाते. भोकाच्या टोकाला चार पाच जण उभे राहू शकतात. हे भोक कुंजरगडाच्या कड्यावर उघडत असल्याने येथून खालची दरी आणि निसर्ग उत्तम दिसतो.