Saturday, September 5, 2020

thkababa

श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !

लेखक- भाऊसाहेब चासकर

सह्याद्रीच्या डोंगररांगात कळसुबाईच्या कुशीत थबथबणारा पाऊस, रोरावत वाहणारा बेफाम वारा, कोकणकडय़ावरुन आपल्याच मस्तीत कोसळणाऱ्या धबधब्यांचा धीरगंभीर आवाज, अगणित ओढ्या-नाल्यांचा खळखळाट, बिबट्याया डरकाळ्या, मोरांचा केकारव, कावळ्यांची कावकाव, अनेकानेक पक्ष्यांची किलबिल असे निसर्गाचे संगीत ऐकतच ठकाबाबा गांगड लहानाचे मोठे झाले. उपजीविकेचे साधन म्हणून बाबा पशुपालन करत. अगदी लहान असल्यापासून बाबा रानात गुरे चारायला जात. तिकडे गेले की निबीड अरण्यातल्या, नीरव शांततेत सभोवतालच्या पशुपक्ष्यांचे आवाज त्यांच्या कानावर पडायचे. जंगलाचे बारकाईने निरीक्षण करणारे ठकाबाबा गुरे राखताना पशुपक्ष्यांच्या आवाजाला प्रतिसाद देऊ लागले. बाबांची कावकाव, चिवचिव ऐकली की घवाघवा कावळे गोळा होत. बाबा भूऽऽभूऽऽ आवाज काढू लागले की कुत्री जोरजोरात भुंकत खवळून बाबांच्या अंगावर धावून येत. इतके अलौकिक कसब बाबांना साधले होते. बाबा रूढ अर्थाने शाळेत गेले नव्हते. मात्र बिनभिंतीच्या शाळेत शिकताना बाबांनी आपल्या अचाट कौशल्याच्या बळावर निसर्गाची अफाट परिभाषा अवगत केली होती. म्हणूनच तर बाबा ‘निसर्गाचा आवाज’ बनू शकले. निसर्गाचा हा आवाज नुकताच निसर्गतत्त्वात विलीन झाला...

उडदावणे (तालुका अकोले) हे बाबांचे गाव. नगर जिल्ह्याच्या पश्चिमेच्या टोकाकडील भंडारदरा धरणापासून १२ किलोमीटर अंतरावर हे गाव वसले आहे. कळसुबाईच्या शिखराच्या दक्षिण बाजूच्या उतारावरून जर एखादा दगड घरंगळत आला तर तो आरामात बाबांच्या अंगणात पोहोचेल! ठकाबाबा शाळेत गेले नाहीत. अगदी लहान असल्यापासून ठाकरी तमाशात सोंगाड्याची भूमिका करत असत. काही दिवस त्यांनी मावशीची भूमिकाही वठवली होती. तमाशातल्या संवादाचे स्क्रिप्ट वगैरे लिहिलेले नसायचे. रंगमंचावर प्रवेश झाला की उत्स्फूर्तपणे सुचेल ते बोलायचे. तिथले संवाद आणि अभिनय सारे सारे बाबांच्या अलौकिक प्रतिभेची साक्ष देणारे होते. सोंगाड्या आणि मावशीची भूमिका साकारताना बाबा श्रोत्यांना खळखळून हसवायचे. आठ नऊ वर्षे बाबांनी तमाशात नाच्याचे काम केले. नृत्य सादर करतानाच्या त्यांच्या लकबी पाहण्याजोग्या असत. बोहाडा हा आदिवासींचा अनोखा सांस्कृतिक उत्सव. यात बाबा सोंगं नाचवत. बाबा जातिवंत लोककलाकार. इरसाल आणि मिश्कील स्वभावाचे. पेंद्या आणि वाकड्या ही त्यांच्या अत्यंत आवडीची पात्रं. बोहाडीमध्ये ही पात्रं विशेष आकर्षण बिंदू असत. बाबा स्वत: अस्सल गमत्या होते. विविध उत्सवाच्या वेळेस ठाकरी लोकगीते आपल्या विशेष शैलीत ते सादर करत. उत्स्फूर्तता ही जर का प्रतिभा मोजायची मोजपट्टी ठरवली तर या निकषावर बाबा उच्च कोटीतले प्रतिभावंत होते!

इथल्या आदिवासींचे कांबडनृत्य प्रसिद्ध आहे. सन १९६५ सालच्या प्रजासत्ताकदिनी येथील आदिवासी कलाकारांचे पथक दिल्लीतील राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी झाले. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या लोकनृत्याने सांस्कृतिक कार्यक्रमात पहिला क्रमांक मिळविला. तत्कालिन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांच्या हस्ते कलाकारांना सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. या पथकात ठकाबाबांचा सिंहाचा वाटा होता. पथकातील कलाकारांची पंतप्रधानांनी आणि इंदिरा गांधींनी आवर्जून विचारपूस केली. काही मदत हवी असल्यास ती देऊ केली. खुद्द पंतप्रधानांनी सांगूनही या भोळयाभाबडया आदिवासींनी काहीही मागितले नाही. कोणतेही शहर बघितलेले नसलेल्या आदिवासींना दिल्ली बघायला मिळाली याचाच कोण आनंद झालेला!

पुढे काही कारणाने ठाकरी तमाशे मोडले. बाबा गुरे राखायला रानावनात जात. रानावर, शेती-शिवारावर आणि जगण्यावर बाबांनी भरभरून प्रेम केले. भंडारदरा परिसरातल्या अभिजात निसर्गात निरनिराळे ऋतू सोहळे सुरु असतात. जलोत्सव, फुलोत्सव, काजव्यांचा उत्सव... हे ऋतूविभ्रम बघायला मोठ्या संख्येने पर्यटक इकडे येतात. प्राणी-पक्ष्यांचे आवाज काढत, लोकगीते म्हणून दाखवत बाबा पर्यटकांचे मनोरंजन करु लागले. त्यातून बाबांना दोन पैसे मिळू लागले. इतर दिवशी शेतातली कामे करायची, गुरे राखायची आणि शनिवार-रविवार भंडारदऱ्यात यायचे. धरणाच्या सांडव्यावर, बागेत, हॉटेल्स किंवा विश्रामगृहांच्या परिसरात बाबांचा डेरा पडे. दहा-पाच पर्यटक जमले, की एकपात्री प्रयोग सुरु होई. बाबांच्या हातात लॅमिनेशन केलेला एक कागद असे. त्यावर बाबा कोणत्या पक्ष्यांचे, प्राण्यांचे आवाज काढतात हे लिहिलेले असायचे. मोराचा आवाज काढा, अशी फर्माईश आली रे आली की बाबा तो आवाज काढत. प्राणी-पक्षी यांचे हुबेहुब आवाज बाबा काढत. वाऱ्याचा, तांडवनृत्य करणाऱ्या पावसाचे दृश्य आपल्या आवाजातून ते ताकदीने उभे करत. लहान बाळाच्या रडण्याच्या भावस्पर्शी आवाज ऐकणाऱ्याच्या काळजात शिरायचा. खालचा ओठ नाकावर टेकवत ते क्षणात चेहऱ्याचा आकार बदलायचे. हे करताना ते स्वत:चा श्वास बराच वेळ रोखून धरत. गोलाकार पोट मळणारे, चेहरा आणि मानेची रचना नागफणीच्या आकाराची करणारे अवलिया आणि हरहुन्नरी कलावंत होते ठकाबाबा. पर्यटक बाबांच्या कलेला भरभरून दाद देत. बाबांचा आत्मविश्वास दुणावत गेला.

विसेक वर्षे बाबा भंडारदऱ्याला येणाऱ्या पर्यटकांचे मनोरंजन केंद्र बनले होते. कोणी पैसे दिले नाहीत म्हणून ते नाराज झाले नाहीत. आपल्या अंगी असलेली कला लोकांपर्यंत पोहोचते आहे, याचे त्यांना जास्त अप्रूप असायचे. भंडारदरा परिसरात सिनेमांचे शुटींग सुरु असे. बाबांच्या अंगी असलेले गुण बघून त्यांना काही दिग्दर्शकांनी त्यांना सिनेमांत काम करायची संधी दिली. चिनू, भागमभाग, सरगम अशा सिनेमांत लहानशा भूमिका कल्या. विशेष काम नसले की ठकाबाबा कंदमुळांच्या शोधात ते रानात हिंडत. ओढ्यांकाठी खेकडे पकडत. धरणातून पकडून आणलेले मासे स्वत: करून खाणे त्यांच्या विशेष आवडीचा भाग होता.

वेगवेगळ्या पुरस्कारांनी ठकाबाबांचा सन्मान झाला. राज्याच्या सांस्कृतिक विभागाने पुरस्कार देऊन गौरव केला. मात्र त्यांची वृद्ध कलावंत पेंशनची केस अनेक वर्षे तशीच तरंगत राहिली होती. कलेवर निस्सीम प्रेम करणाऱ्या या कलाकाराला दीड हजार रुपयांची पेन्शन सुरु होण्यासाठी २०१६ साल उजाडले. तेव्हा बाबा ८५ वर्षांचे होते. सामान्य लोकांपासून थेट देशाच्या पंतप्रधानांपर्यंत अनेकांच्या कौतुकाचा धनी ठरलेला, वाहवा मिळवलेला हा कलावंत अखेरपर्यंत आर्थिक वंचनेत आयुष्य कंठत राहिला. कोरड्या कौतुकाने ठकाबाबांच्या पदरात काही पडले नाही. भाकरीच्या चंद्राच्या शोधात त्यांना आयुष्य कंठावे लागले. सुमार म्हणता येतील असे अनेक कलावंत सुखनैव जगत असताना ठकाबाबा मात्र उपेक्षेचे धनी राहिले. अर्थात निसर्गाच्या सहवासात अत्यंत श्रीमंत आयुष्य जगलेल्या बाबांना याविषयी त्यांच्या मनात खेद, खंत असे काहीही नव्हते. त्यांना विमानात बसायची अनिवार इच्छा होती. केंद्रे नावाच्या उद्योजकांनी बाबांची कला बघितली. त्यांनी बाबांना हॅलिकोप्टरमध्ये बसवून ही इच्छाही पूर्ण केली. आता मला खुशाल मरण येऊ दे, अशी बाबांची त्यानंतरची प्रतिक्रिया!

ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता. बाबांनी अखेरपर्यंत रानाला जपले आणि रानाने बाबांना जपले, मोठे केले, नाव दिले. वयाच्या ८७व्या वर्षी ते कलेवर निस्सीम प्रेम करत होते. जाण्यापूर्वी दोन दिवस आधी बाबांनी त्यांचा मुलगा सखारामला बोलवले. जवळ बसवले. दोन्ही हातांनी हात घट्ट पकडले. म्हणाले, “गावातला बोहाडा चालू ठिवा. कला जिती ठिवा. मी गेल्याव घरातल्या, गावातल्या लोकांनी कोणीच रडायचं न्हाई. ढोल वाजवायचे. गाणी सांगायची...” त्यांच्या इच्छेनुसार सखाराम, नातेवाईकांनी आणि गाववाल्यांनी बाबांना अखेरचा निरोप दिला. कळसुबाईच्या आसमंतात ढोलाचा आवाज निनादला, ढोलकीने ताल धरला, ताशा कडाडला. मरणाचा सोहळा झाला. मात्र ‘निसर्गाचा आवाज’ जेव्हा निसर्गत्त्वात विलीन झाला तेव्हा वारा स्तब्ध झाला होता. प्राणी थबकले होते. पक्ष्यांची किलबिल थांबली होती. सारं सारं रान क्षणभर मुकं झालं होतं...
----------
(लेखक प्रयोगशील शिक्षक आणि निसर्ग निरीक्षक आहेत.) ९४२२८५५१५१

No comments:

Post a Comment