सह्याद्रीतील किलबिल
सह्याद्री म्हटला की, आठवतात
उंच टोकदार कडे, उंचच उंच टेकडीवरून कोसळणारे धबधबे, नद्यांचे रुणुझुणू
वाहणारे पाणी.. आणि या हिरवळीत दिसणारे पशू-पक्षी! आता या सह्याद्रीत
हत्ती, पटेरी वाघ यांच्यासह काळे वाघही दाखल झाले आहेत. प्राणी संपत्तीने
समृद्ध असलेले हे जंगल वेगवेगळ्या धरणप्रकल्पांमुळे विपुल पाण्याचे
क्षेत्र होऊ लागले आहे. या सा-या वातावरणात वन्यजीव संवर्धनही मोठया
प्रमाणावर वाढत आहेत. सह्याद्रीप्रेमी भाऊ काटदरे नेहमीच जंगलचे मित्र
असतात. त्यांनी या भटकंतीतील अनुभव सांगितले आहेत.
आकाशाला गवसणी घालणा-या.. अनेक
नद्या-उपनद्यांना जन्म देणा-या.. उंचच उंच धबधब्यांना अंगाखांद्यावर
खेळविणा-या..असंख्य वन्यजीवांना आपल्या पंखाखाली आश्रय देणा-या
सह्याद्रीच्या पर्वतरांगा भारताच्या दक्षिणेस कणखरपणे उभ्या आहेत.
दख्खनच्या पठाराला समांतर विस्तारलेल्या या पर्वतरांगा निमुळत्या कोकण
किनारपट्टीला भारताच्या मुख्य भूमीपेक्षा वेगळेपण देतात. म्हणूनच
सह्याद्रीचे आगळेपण विशेष आहे. या सह्याद्रीच्या पश्चिम घाटात
जैवविविधतेबरोबरच शेकडो पक्ष्यांच्या जाती आहेत. त्यामुळे सह्याद्रीच्या
द-याखो-यांत सातत्याने किलबिलाट घुमत असतो.
जागतिक स्तरावरील जैवविविधतेने संपन्न अशा
पहिल्या दहा जागांपैकी एक असा तुरा सह्याद्रीच्या शिरपेचात रोवलेला आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगेत ५०० फुलझाडे, १३४ सस्तन प्राणी, १७९ उभयचर
प्राणी, असंख्य शोध न लागलेल्या वनस्पती आढळतात. जागतिक स्तरावरील ३२५ हून
अधिक अस्तित्व धोक्यात असलेल्या वनस्पती येथे आढळतात. अंदाजे १६०० कि. मी.
सह्याद्रीच्या रांगा गुजरात-महाराष्ट्राच्या सीमेपासून केरळ ते
कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या आहेत.
यात महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक,
तामिळनाडू व केरळ यांची सरासरी उंची १२०० मीटर आहे. ६५ लाख वर्षापूर्वी
जेव्हा भारत आणि मादागास्कर वेगवेगळे झाले तेव्हा दख्खनच्या पठाराचा
दक्षिणेकडील भाग तुटला व १०० फूट उंचवटा राहिला, याचेच कालांतराने
पर्वतरांगांमध्ये रूपांतर झाले. या पर्वतरांगांमध्ये त्याच्या उंचीनुसार व
सपाटीनुसार वेगवेगळे अधिवास पाहायला मिळतात. त्यातील सर्वात महत्त्वाचे
म्हणजे जंगल, गवताळ प्रदेश, पाणथळ प्रदेश, झुडपे, समुद्रकिनारे, शेती यांचा
समावेश होता.
सह्याद्रीच्या प्रदेशात अतिवृष्टी होते.
छोटे खळखळणारे ओढे मिळून प्रचंड धबधबे तयार होतात व एक अनोखा असा आवाज करत
उंच डोंगरांच्या कडयावरून जलदगतीने वाहतात. सह्याद्रीच्या खोलगट भागांत
नद्यांना पूर येऊन आपल्याबरोबर आणलेल्या जीवनसत्त्वाने शेजारची भातशेती
संपन्न करतात. डोंगरमाथ्यावरच्या पावसामुळे तेथे सुंदर व घनदाट अशी वने
तयार होतात.
पर्वतांच्या उतारांवर ओलसर पानझाडीची वने
पसरलेली आहेत. अशा वनात फिरताना आपल्याला पक्ष्यांचा गोड किलबिलाट ऐकायला
येतो. काही आपल्या प्रेमिकांसाठी गातात तर काही आपल्या पिल्लांना मायेने
साद घालत असतात. काही इतर नर पक्ष्यांपासून आपली टेरिटोरी प्रांत संरक्षित
करतात. कोतवालासारखे काही पक्षी उत्कृष्ट नक्कल करू शकतात. ज्याने त्यांचे
शत्रू अचंबित होतात. केवळ दृष्टी अननुभवी पक्षी निरीक्षकाला अपुरी पडते.
कारण पक्षी अनेकदा घनदाट पानांमध्ये दडून राहतात.
कधी कधी अशी संधी चालून येते की एखाद्या
छोटयाशा आवारात विविध प्रकारचे पक्षी काही क्षणातच पाहायला मिळतात. अशा
पक्ष्यांच्या थव्यांना ‘मिक्स हंटिंग फ्लोक्स’ म्हणतात. सगळ्याच जातीचे
पक्षी यात सामील होतात. निर्भयी कोतवाल पळसाच्या प्रज्वलित फुलांवर मध
पिताना दिसतो. तेवढयात जणू काही लाल रत्न असलेली अंगारक पक्ष्यांची जोडी
येऊन झाडावर बसते तेव्हा आपण अगदी नि:शब्द होतो.
उद्योगी मधमाशा मध गोळा करण्यात मग्न
असतात. जेव्हा हिरवेगार वेडा राघूंचा थवा त्यांच्यावर तुटून पडतो. माशीमार
असतातच. त्यातील टीबीएफसी नर आपल्या निळ्या-नारंगी कोटमध्ये रुबाबदार
दिसतो. राजेशाही थाटात स्वर्गीय नर्तक नावाचा पक्षी जणू पांढरी शुभ्र
पायघोळ झगा घालून कीटकांच्या मागे भरारी मारत असतो. ज्योतीसारखी उजळणारी
पाठ असलेला सुतारपक्षी झाडाच्या खोडांवर आपल्या लांब जीभेने भक्ष्य खुरपत
असतो. तेवढयात साधा दिसणारा ioro गवतासारखा हिरवागार woodshrike चंचल
fantail उडून येतात. सह्याद्रीच्या वनात फिरताना तुम्हाला अनेकदा अशा
पक्ष्यांचे संमिश्र थवे दिसतील तेव्हा आपल्या मनाच्या कोपरांत एक मोहक
चित्र अनुभवण्यास मिळेल.
सह्याद्रीच्या काही भागात खुरटलेली झुडपे
आढळतात. करकोचासारखे पक्षी अशा प्रदेशात पाहायला मिळतात. आपण तित्तराला तर
ओळखतच असाल. महाराष्ट्रातील काही भागात त्याला अत्यंत क्रूरतेने मारून
त्याचे मांस खाल्ले जाते. इवलेसे सहजा न सापडणारे वटवटे पक्षी अशा प्रदेशात
राहतात. त्यातील एक म्हणजे श्वेतकंठी वटवटया जो महाराष्ट्रात हिवाळ्यात
स्थलांतर करतो. नावाप्रमाणेच त्याचा गळा पांढरा शुभ्र असतो. झुडुपांमध्ये
आढळणारे पक्षी शोधायचे म्हटले तर कठीण. कारण ते मनुष्याची नजर चुकवून गुपित
राहतात. या पक्ष्यांना अचूक ओळखणे वर्षानुवर्षे पक्ष्यांचे निरीक्षण
करणा-यालादेखील अवघड ठरते.
सह्याद्रीतील मोठया प्रमाणात वाहणा-या
नद्यांमुळे इथे अनेक पाणथळ जागा तयार झाल्या आहेत. या पाणथळ जागांमध्ये
पक्ष्यांचे प्रचंड थवे दिसतात. बदके तर उत्तरेतील लडाखच्या शिखरांमधून
लांबलचक सफर करून इथे पोहोचतात. पाणकावळे, तुतारी, पाणकोंबडी, बगळा, उघडचोच
करकोचांसारखे पक्षी निवांतपणे पाण्याच्या काठावर मासे, बेडूक, कीटक शोधत
असतात. तिरंदाज नावाचा एक पक्षी आपली मान सापासारखी डोलवत पाण्यात पोहताना
दिसतो. यामुळे इंग्लिशमध्ये त्याला ‘स्नेक बर्ड’ असे नाव पडले आहे.
सह्याद्रीचा काही भाग गवताळ प्रदेशात
समाविष्ट होतो. तेथील चांडोल व वटवटे विणीच्या हंगामातील मनोरंजक
प्रदर्शनासाठी सुप्रसिद्ध आहेत. मादीला खूश करायला आकाशात विविध गोलांटया
मारतात व सुंदर आवाजात गायन करतात. अशा मोहक प्रदर्शनास कुठली मादी नकार
देऊ शकते. गवताच्या बिया खाणा-या मुनियादेखील अशा अधिवासांत आढळतात. या
चिमुकल्या पक्ष्यांचे थवे लांब गवतावर बसून त्यातील बिया आपल्या चोचीने
खाताना दिसतात.
दुर्दैवाने मनुष्याच्या हव्यासापोटी या
मुनियांना पकडून अनेकदा पिंज-यात बंदिस्त केले जाते. मग सुंदर मुनियांच्या
जोडया मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटसारख्या ठिकाणी केवळ १५० ते २०० रुपयांना
विकल्या जातात. अशा प्राण्यांच्या व्यवसायात घेऊन जाणारे बरेचसे पक्षी
प्रवासात मृत्यू पावतात. या निरपराध पक्ष्यांच्या इवल्याशा डोळ्यांसमोर
त्यांचा परिवार नष्ट होतो. त्यांचे उर्वरित जीवन पिंज-यात मर्यादित राहते.
निर्दयीपणे मानव सौंदर्याच्या नावाखाली आपल्या अशा केविलवाण्या परिस्थितीत
असलेल्या पक्ष्यांना घरात डांबून ठेवतो.
सह्याद्रीच्या पश्चिमेस पसरलेला
आहे..सोनेरी वाळूच्या किना-यांनी नटलेला कोकण! या किना-यावर ‘कुरव’ व
‘सुरय’ पक्ष्यांचे प्रचंड मोठे थवे पाहायला मिळतात. हे पक्षी कुशल
दर्यावादी असतात. ते अत्यंत शौर्याने समुद्राच्या खवळलेल्या लाटांमध्ये झेप
घेऊन मासे पकडतात. जलदगतीने पसरणारी शेतीदेखील काही पक्ष्यांना आसरा देते.
‘खाटीक’ पक्षी उंच झुडुपावर बसून आपल्या अवतीभोवती लक्ष ठेवून असतो.
कीटक दिसला की त्याच्यामागे उडी मारतो व
आपल्या पायात पकडून फाडून टाकतो. पोट भरले की इतर कीटक जवळील झुडपाच्या
काटय़ांवर अडकवून ठेवायचे. म्हणून त्याला खाटीक नाव पडले. निळे पंख असलेला
आकर्षक ‘नीलपंख’ शेतीमधील नुकसानकारक कीटक खातो. त्याचे विणीतील प्रदर्शन
पाहून आपण स्तंभित होतो. आकाशात वेडयावाकडया गोलांटया मारत कर्कश आवाजात
गाऊन तो आपल्या प्रेमिकेला खूश करतो. गव्हाणी घुबडाचे भक्ष्य मुख्यत:
उंदीर, घुशी आहे. परंतु, मानवाच्या अंधश्रद्धेमुळे या सोनेरी-पांढ-या
घुबडाला मारले जाते. काळ्या जादूच्या सबबीखाली या पक्ष्यांचा जीव घेतला जात
आहे.
१०० से. मी. ‘महाधनेश’ जुन्या भक्कम
झाडांच्या वनात निवास करतो. अंगठयाएवढा असलेला सूक्ष्म ‘फुलटोच्या’ देखील
इथे राहतो. पक्ष्यांच्या रंगामध्येही विविधता आढळते. खूप छोटे अंगारक
माणिकासारखे फुलांमध्ये लपाछपी खेळत असतात. ‘हळद्या’चा गडद, पिवळा रंग
पाहून मन प्रसन्न होते. शुष्क झाडाच्या तपकिरी पालवीत लाल डोके व हिरवेगार
अंगाचे ‘तुईया’ पोपट तुई-तुई आवाज गात असतात. तित्तीर, लाव्हे, वटवटे हे
वृक्षाखालील झाडाझुडपांच्या दाटीमध्ये लपून बसतात. अंधुक मातीचा रंग असणारे
हे पक्षी सहज नजरेस पडत नाहीत.
सह्याद्रीच्या रांगांतून फिरायला जातो
तेव्हा जणू काही पक्ष्यांचा ऑर्केस्ट्राच चालू असतो. पिसारा फुलवून मोर
आपले स्वागत करायला ‘म्याँव’ असे ओरडत असतो. ‘सुभगा’ची नक्कल चालू असतेच.
‘मलबारी कस्तुर’ हा त्यात वैशिष्टय़पूर्ण पक्षी आहे. विणीच्या हंगामात
कुठल्याही चित्रपटातील नटासारखा आपल्या प्रेयसीला शिट्टया मारून बोलावत
असतो. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे तो आपले समृद्ध पश्चिम घाट वगळता जगात कुठेच
सापडत नाही. पश्चिम घाटात १६ पक्ष्यांच्या जाती आढळतात.
मलबारी पोपट, वायनाडचा हासकस्तुर, मलबारी
राखी धनेश, पांढ-या पोटाचा टकाचोर, निलांग, राखाडी डोक्याचा बुलबुल,
तांबूस-तपकिरी वटवटया हे १५०० मीटर उंचीपर्यंत पायथ्याच्या सपाट भागापासून
ते डोंगरामध्ये आढळतात. पांढ-या पोटाचा आखूड पक्षी, काळा-नारिंगी माशीमार,
निलगिरी नीलांग, तांबूस-तपकिरी छातीचा हासकस्तुर व राखाडी छातीचा हासकस्तुर
हे पर्वतांवरच्या जंगलात आढळतात.
हासकस्तुरचा आवाज ऐकू आल्यावर कोणीतरी
हसतोय हा भास होतो. यातील मलबारी धनेश भारतातील एकमेव धनेश ज्याच्या चोचीला
सपाटशिंग नाही. मानेच्या पाठीवर चेसबोर्ड असलेले अत्यंत नैपुण्यतेने
झाडांच्या फांद्या चुकवत अतिवेगाने उडणारे निलगिरी वृक्ष कबुतर
पर्वतावरच्या जंगलाच्या पायथ्याशी आढळते. तेथे लाल रत्नासारख्या चकाकत
आपल्या बाकलेल्या चोचीने फुलांतील मध पिणारा किरमिजी पाठीचा सूर्यपक्षी
देखील सूर्यप्रकाशात राहतो.
दोन मर्यादित क्षेत्र प्रजाती
पर्वतावरच्या गवताळ प्रदेशातही दिसतात. निलगिरी तीरचिमणी व रुंद शेपटीचा
गवती वटवटया इतर दोन म. क्ष. पक्षी ‘टायटलर’चा पर्ण वटवटया व कश्मिरी
माशीमार पश्चिम हिमालयातील प्रजनन क्षेत्रातून हिवाळी स्थलांतरित म्हणून
पश्चिम घाट एकमेव पक्षीक्षेत्रात येतात. तसेच आपल्याला सह्याद्रीत अनेक
स्थलांतरित पक्षी पाहायला मिळतील. साधी भिंगरी हिवाळ्याच्या मोसमात अगदी
सहजपणे दिसते. शेकडो अमूर ससाणे हिवाळ्यामधून पूर्व आफ्रिकेत सफर करतात.
तेव्हा त्यांच्या मार्गात भारत उपखंड येतो.
काही तज्ज्ञ मानतात की, हे पक्षी
भारतानंतर अरबी समुद्रावरून उडत थेट आफ्रिकेतच विश्रांतीला थांबतात. या
ससाण्यांच्या स्थलांतराची पहिली नोंद भारतातील ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉ.
सलिम अली यांनी रायगड येथे ३ डिसेंबर १९५० रोजी केली. गेल्या काही वर्षात
मुंबई, लोणावळा येथून शेकडोंनी उडणा-या या ससाण्यांची नोंद झाली आहे. काही
पक्षी उभ्या दिशेने स्थलांतर करतात. हा स्थलांतराचा प्रवास उंच
पर्वतराजीमध्ये राहणारे पक्षी करतात.
हिवाळ्यात उंच पर्वतांची शिखरे ढगांनी
आच्छादली जातात. आसपासचे काहीच दिसत नाही. सोसाटयाचा वारा वाहत असतो.
पावसाळ्यात प्रचंड पाऊस पडतो. मग येथे खाण्याचा तुटवडा निर्माण होतो.
म्हणून पक्षी शिखरांवरून पायथळाशी येतात. पाऊस कमी झाला ती पुन्हा वरील
शिखरांवर जातात. पावसाळ्याच्या काळात तिबोटी खंडया कोकणात विणीसाठी पधारतो.
इंद्रधनुष्याच्या रंगांनी नटलेला खंडया नद्यांच्या काठांवर बीळ खणून ५ ते ७
अंडी घालतो. हा खंडया पावसाळ्याच्या गडद पालवीतून रॉकेटसारखा उडताना
दिसतो.
सह्याद्रीत मुख्यत: वने आहेत. त्यामुळे
मानवाने केलेली या वनांचा विद्ध्वंस ही एक काळजीची बाब आहे. पावसाळा संपला
की दररोज २० ते २५ लाकडाने भरलेले ट्रक सह्याद्रीच्या घाटात जाताना दिसतात.
वृक्षतोडीचे दुष्परिणाम स्थानिकांनाच भोगावे लागतात. रत्नागिरीतील मुंबके
गावाचेच उदाहरण घेऊया. टेकडीवरील झाडे तोडल्यानंतर माकडांचे कळप थेट गावात
येऊन गोंधळ घालू लागले. घरातून अन्नधान्य व बागेतील सर्व फळे चोरून ही
माकडे गावाला वेठीस धरत आहेत.
अधिवास नष्ट झाल्याने पक्ष्यांचेदेखील हाल
होतात. कंकणेर व घुबड हे वड, पिंपळसारख्या भक्कम झाडांच्या ढोलीत
वर्षानुवर्षे घरटी बनवितात. काही मिनिटांतच जेसीबीने त्यांची घरे पाडून
टाकतात. दुसरीकडे सुतार पक्षी प्रतिवर्षी झाडांच्या खोडात नवे बीळ खणून
घरटे बनवतो. वृक्षतोडीमुळे हा पक्षी मग एकाच झाडाच्या खोडात आपली घरटी
बनविण्यास भाग पडतो. ज्याने ते झाड पोकळ होऊन जाते. मग कधी वा-याच्या
जोराने तेदेखील पडते व सुताराची एकमेव घरटं बांधण्याची जागा नष्ट होते.
अधिवास नाहीसे होत असल्यामुळे पक्ष्यांना खाण्याचा तुटवडाही निर्माण होतो.
सह्याद्रीच्या विनाशक अशी आणखी एक शक्ती
आहे ती म्हणजे बेफिकीर खाणकाम. पर्वतांना फोडून स्फोट करून iron ore,
manganese, baux, limestone चे साठे खणले जातात. जैवविविधतेने संपन्न
असलेल्या आपल्या प्रदेशात होणा-या या खाणकामाचे दुष्परिणाम आपण नजरअंदाज
करू शकत नाही. यातून निर्माण झालेला कचरा पाण्याच्या साठय़ांमध्ये फेकल्याने
पाणी प्रदूषित होते. या नदीकाठांवर वर्षानुवर्षे राहिलेले पक्षी विषबाधेने
मृत्युमुखी पडतात. हळहळू पक्षी इथे येणे बंद करतात. प्रदूषित हवेने
गावक-यांना श्वसनाचे आजार होतात. इवलेसे पक्षी तर भुर्रकन उडून जातात. पण
ते जाणार तरी कुठे खाणकाम, वृक्षतोडी, औद्योगिकीकरणामुळे त्यांची घरे नष्ट
झालेली असतात.
आज ते स्वत:च्या मायभूमीत भारताच्या ५
टक्के जीडीपीचे निर्वासित ठरले आहेत. पक्ष्यांचे सौंदर्य मनमोहक असतेच. पण
त्याचबरोबर ते आपल्या शेतीसाठी उत्कृष्ट कीटकमार ठरतात. कृत्रिम
औषधांपेक्षा जास्त परिणामकारक सूर्यपक्ष्यासारखे पक्षी फुलातील मध पिताना
परागकण एका फुलातून दुस-या फुलांत पोहोचवून फलोत्पादनाचे महत्त्वाचे कार्य
करतात. गिधाड व कावळे आपले सफाई कामगार असतात. कारण ते दरुगधी व रोगराई
पसरू देत नाहीत. निसर्गातील नाजूक तराजू ते सांभाळत पक्षी जगभरातील कवींना
उत्तेजित करीत असतात.
प्राण्यांची साखळी खरं तर पर्यावरण संतुलन
राखण्यात मदत करत असते. गिधाडासारखा पक्षी स्वच्छतापक्षी म्हणून ओळखला
जातो. कावळेही याच मालिकेतील! पशू-पक्षी यांच्या सहवासात राहताना अनेक
अनुभव येतात. सध्या सह्याद्रीमध्ये हरिण, सांबर, गवे, बिबटे, पटेरी वाघ,
हत्ती अशा अनेक प्राण्यांच्या जाती ज्या दुर्मीळ म्हणून आपण ओळखतो त्या
पाहायला मिळत आहेत. त्या सर्व पक्ष्यांचे संवर्धन आणि त्यातून पर्यावरण
संतुलन या गोष्टी अधिक जोमाने व्हायला हव्यात. आता जंगल समृद्ध व्हायला
लागली आहेत. सह्याद्रीतील ओढही काहीशी कमी झाली आहे. परंतु, एवढं पुरेसं
नाही. बराच पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे आमच्या सह्याद्री भ्रमंतीत आणि
पर्यावरण संवर्धनात तुमचीही साथ असू द्या!
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home