Monday, August 17, 2015

|

व्यवसायाभिमुख शेतीतून प्रगतीचा चढता आलेख!

पूर्वी शेती उच्च, नोकरी दुय्यम, धंदा कनिष्ठ अशी वर्गवारी होती. ही मध्यंतरीच्या कालावधीत बदलून नोकरी उच्च मानली जाऊ लागली.
farming 1पूर्वी शेती उच्च, नोकरी दुय्यम, धंदा कनिष्ठ अशी वर्गवारी होती. ही मध्यंतरीच्या कालावधीत बदलून नोकरी उच्च मानली जाऊ लागली. पण आताची परिस्थिती पाहिली तर पुन्हा एकदा शेतीला उच्च स्थान मिळाले आहे.
नवनवीन बदलांना आत्मसात करीत आधुनिक पद्धतीने व्यवसायाभिमुख शेतीशिवाय आता पर्यायच उरला नाही. या संबंध घडामोडीत ख-या अर्थाने प्रगतीचा आलेख उंचावयाचा असल्यास शेतीकडे वळलेच पाहिजे.
दोडामार्ग तालुक्यात यासाठी अगदी पोषक वातावरण आहे. मुंबई, कर्नाटक, गोवा ही महत्त्वाची बाजारपेठेची शहरे जवळच्या अंतरावर आहेत. शिवाय तिलारी येथे मोठे धरण, त्याच्यासोबत विर्डी व शिरवल या ठिकाणची धरणे यांच्या प्रशासनाकडून सिंचन क्षेत्राचे नियोजन झाल्यास शेतकरी सुजलाम सुफलाम होणार आहे.
दोडामार्ग तालुका निर्मितीनंतर गेल्या काही वर्षात दोडामार्ग तालुक्याची कृषी क्षेत्रातील प्रगती निश्चितच वाखणण्याजोगी आहे. शासनाने महत्त्वाकांक्षी दृष्टिकोन समोर ठेवून तालुक्यात तिलारी प्रकल्प साकारल्याने त्याचा फायदा शेतक-यांना होऊ लागला आहे. त्यामुळे एरव्ही मुंबई-पुण्यासारख्या शहरात नोकरीच्या निमित्ताने धावणारी तालुक्यातील तरुण पिढी आता शेती बागायतीकडे वळू लागली आहे.
शेतीतून उत्पन्न मिळविण्यासाठी आता तालुक्यातील युवा पिढी पुढे सरसावल्याने निश्चितच कृषी क्षेत्रातील ही क्रोंती तालुक्याला विकासाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवणारी ठरेल यात तीळमात्र शंका नाही. त्यासाठी तिलारी प्रकल्पाने अधिकाधिक पडीक क्षेत्र सिंचनाखाली आणणे आवश्यक आहे.
शासनाने दूरदृष्टी बाळगून तालुक्यात गोवा राज्याच्या सहकार्याने दीड हजार कोटींचा तिलारी धरण प्रकल्प साकारला आहे. शिवाय तालुक्यातील माटणे मतदारसंघ ओलिताखाली आणण्याच्या दृष्टीने ४८ कोटी रुपयांच्या विर्डी धरण प्रकल्पाचे कामही सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात दोडामार्ग तालुका कृषी क्षेत्रात जिल्ह्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत सर्वात पुढे गेलेला दिसणार आहे.
तिलारी धरणात चालू वर्षी १६ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. या पाण्याचा उपयोग फळबागा फुलविण्यासाठी होत आहे. तालुक्यातील तरुण पिढी मुबंई- पुण्यासारख्या शहरांकडे नोकरीसाठी न जाता आता कृषी व्यवसायांकडे वळू लागली आहे. त्यामुळेच आज तिलारी धरणाच्या पाण्यावर फुलविलेल्या केळी बागा घोटगेवाडी, घोटगे- परमे, कुडासे, मणेरी या परिसरात पाहावयास मिळतात.
गेल्या पाच वर्षात केळी बागायतीच्या लागवडीतून या भागात लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे. तालुक्यातील कुंब्रल, कोलझर पंचक्रोशीतही नारळ, सुपारी बागायती बहरू लागली आहे. नवनवीन कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून येथील बागायतदारांनी मोठया कष्टाने सुपारी व नारळ बागा फु लविल्या आहेत. शासनाच्या कृषी विभागाकडून राबविण्यात येणा-या १०० टक्के फलोत्पादन योजनेचाही पुरेपूर वापर करून आर्थिकदृष्टया सक्षम बनविणा-या काजू पिकाचीही मोठया प्रमाणात लागवड केली आहे.
आतापर्यंत तालुक्यातील साडेसहाशे हेक्टर जमिनीवर नारळ लागवड, ६ हजार ५०० हेक्टर जमिनीवर फळझाड लागवड, १२३ हेक्टर जमिनीवर मसाला पीक तर १ लाख हेक्टर जमिनीवर भातपीक लागवड करण्यात आली आहे.
निश्चितच गेल्या काही वर्षात दोडामार्ग तालुक्याची कृषी क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती झाली आहे. त्यामुळे भविष्यात निश्चितच त्याचा परिणाम तालुक्याच्या विकासावर होणार असून आगामी काळात तालुक्याला विकास प्रक्रियेत आणण्यात कृषी क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे.
सिंचनाखाली क्षेत्र वाढणे आवश्यक
दोडामार्ग तालुक्यात तिलारी या ठिकाणी असणारे धरण जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी एकटे पुरसे आहे. पण समाधानकारक बाब म्हणजे शिरवल आणि विर्डी या ठिकाणीही धरणे साकारत आहेत. या ठिकाणच्या पाण्याचा वापर शेतक-यांसाठी होणे आवश्यक असून केवळ कागदोपत्री सिंचनाखाली क्षेत्रात वाढ न होता. शेतक-यांच्या जमिनीपर्यंत पाणी पोहोचणे आवश्यक असून तसे नियोजन संबंधित विभागाकडून केले पाहिजे.
.. तर लाखोची उलाढाल
काजू, आंबा, रबर, तेलताड, नारळ, केळी, सुपारी या उत्पादनासाठी दोडामार्गात पोषक वातावरण आहे. जवळ बाजारपेठ आहे. ही उत्पादने व्यावसायिक पद्धतीने घेतल्यास प्रतिवर्षी लाखो रुपयांची उलाढाल शक्य आहे. त्या उलट नोकरी हजाराचा टप्पा पार करू शकत नाही.

No comments:

Post a Comment