सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय असुविधांच्या गर्तेत
१२५ वर्षाची परंपरा असलेले व
सावंतवाडी तालुक्यातील गोरगरीब रुग्णांचे एकमेव आधारकें द्र असलेले
सावंतवाडी उपजिल्हा कम कुटिर रुग्णालय सध्या असुविधांच्या गर्तेत सापडले
आहे.

निधीअभावी रुग्णालयाची संस्थानकालीन इमारत
दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. तर जनरेटर बंद पडल्याने रुग्णसेवेवर परिणाम
होत आहे. रुग्णांना असुविधा प्राप्त होत असतानाच शवागृहाचीही मशीन
बिघडल्याने मृतदेहांचीही हेळसांड होत आहे. आरोग्य विभागाकडून या
रुग्णालयासाठी १ कोटी १० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, हा
निधी प्राप्त झाला नसल्याने रुग्णालय प्रशासनाला समस्यांना सामोरे जावे
लागत आहे.
१०० खाटांची क्षमता असलेल्या या
रुग्णालयात आकृतीबंधातील एकूण ९५ जागांपैकी २५ जागा रिक्त आहेत. तर मंजूर
१५ वैद्यकीय अधिका-यांपैकी केवळ ९ जागा भरलेल्या आहेत, तर ६ पदे रिक्त
आहेत. तज्ज्ञ वैद्यकीय अधिका-यांअभावी रुग्णांची परवड होत असतानाच
अत्यावश्यक सुविधांचीही या
रुग्णालयात वानवाच आहे. पुरातन इमारतीची
तात्पुरती डागडुजी करण्यात आली असली तरीही आवश्यक निधी कमी पडत आहे. जी
अवस्था इमारतींची आहे तीच इतर सुविधांचीही आहे. रुग्णांच्या वॉर्डमधील पंखे
बिघडलेले आहेत. विजेच्या इतर उपकरणांचीही तीच अवस्था आहे. पंखे बंद
असल्याने रुग्णांना डासांचा सामना करावा लागत आहे. तसेच रुग्णांना देण्यात
येणा-या गाद्या, चादर, बेडशीटची कमतरता जाणवत आहे.
सिटी स्कॅन मशीनची प्रतीक्षा कायम
काही महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करीत
रुग्णालयासाठी सिटी स्कॅन मशीनसाठी कक्ष निर्माण करण्यात आला. या मशीनसाठी
फ्लॅटफॉर्मची उभारणीही करण्यात आली. मात्र, फ्लॅटफॉर्म तयार असूनही मशीन
अद्यापि प्राप्त नाही.
रत्नागिरी येथून सिटी स्कॅन मशीन
सावंतवाडी आणण्यात येणार होती. मात्र, अद्यापि ती न पोहोचल्याने रुग्णालय
सध्या सिटी स्कॅन मशीनच्या प्रतीक्षेत आहे.
त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन
सिटी स्कॅन करावे लागत आहे. आधीच तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी नसल्याने
रुग्णांना खासगी रुग्णालयाती महागडय़ा उपचारांना सामोरे जावे लागत असतानाच
सिटी स्कॅन मशीन मंजूर असूनही ती प्राप्त न झाल्याने रुग्णांच्या
नातेवाइकांना आर्थिक भरुदड सहन करावा लागत आहे.
रुग्णवाहिका निधीअभावी दुरुस्तीच्या प्रतीक्षेत
उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका काही
महिन्यांपूर्वी बिघडली होती. रुग्णवाहिकेचे इंजिन निकामी झाल्याने ती
दुरुस्तीला पाठविण्यात आली होती. मात्र, दुरुस्तीचा हा खर्च लाखांच्या घरात
पोहोचल्याने ही रुग्णवाहिका सध्या निधीच्या प्रतीक्षेत आहे.
सध्या रुग्णालयाकडे १०८ रुग्णवाहिकेची
व्यवस्था आहे. जननी सुरक्षा योजनेंतर्गत एक रुग्णवाहिका प्राप्त आहे.
मात्र, सावंतवाडी तालुक्याचा आवाका, डोंगराळ भाग असल्याने अपघातांची वाढती
संख्या व रुग्णांचीही मोठी संख्या या प्रमाणात आवश्यक वैद्यकीय सुविधा येथे
उपलब्ध नसल्याने नेहमीच रुग्णवाहिकेची गरज पडते. अनेकवेळा रुग्णांना
गोवा-बांबुळी तसेच ओरोस रु ग्णालयात हलवावे लागते. त्यामुळे रुग्णवाहिकेची
कमतरता जाणवते.
दुरुस्तीसाठी आवश्यक खर्चाचा प्रस्ताव
पाठवूनही हा निधी प्राप्त न झाल्याने रुग्णवाहिका गॅरेजमध्येच पडून आहे.
त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे.
ब्लड बँकही सुविधांच्या प्रतीक्षेत
सावंतवाडी रुग्णालयातील ब्लड बँक अद्ययावत
अशीच आहे. या ब्लड बँकेचे कार्यही चांगल्या प्रकारे चालते. अलीकडेच या
ब्लड बँकेला कुटुंब कल्याण योजनेंतर्गत उत्कृष्ट कार्यासाठी शासनाकडून
गौरविण्यात आले आहे. मात्र, ब्लड बँकेत आवश्यक रक्तसाठा असूनही जनरेटरची
सुविधा नसल्याने वीज खंडीत झाल्यास मोठी समस्या उद्भवत आहे.
तसेच जनरेटची व्यवस्था नसल्याने
रुग्णालयातील इतर विभागांचीही मोठी गैरसोय होत आहे. चोवीस तास सेवा देणा-या
ब्लड बँकेत इनव्हर्टरचीही आवश्यकता आहे. अनेक अद्ययावत सुविधा उपलब्ध
असूनही मायक्रोस्कोपसारख्या आवश्यक सुविधांची मात्र वानवा असून पंधरा
वर्षापूर्वीचे साहित्य आजही वापरले जात आहे. त्यामुळे नवीन साहित्य उपलब्ध
झाल्यास ब्लड बँकचा कारभार अधिक सुरळीत होण्यास मदत होऊ शकते.
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक
सावंत हे सिंधुदुर्गातील असूनही सिंधुदुर्गातील शासकीय रुग्णालयांची अशी
परवड होणे हे खेदजनक आहे. पालकमंत्री हे देखील सावंतवाडीचेच असताना
त्यांच्याच मतदारसंघातीलच नव्हे तर त्यांच्या शहरातील या रुग्णालयाला
निधीची कमतरता भासत असल्याने पालकमंत्र्यांच्या कार्यक्षमतेबाबतही सवाल
उपस्थित होत आहे.
मशीन बिघडल्याने शवगृह बंद : मृतदेहांची हेळसांड
कुटिर रुग्णालयातील शवागृहाची मशीन
सद्य:स्थितीत बिघडली आहे. मशीनचा कॉम्प्रेसर व स्टॅबिलायझर खराब झाल्याने
ही मशीन सध्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. ही मशीन नादुरुस्त झाल्यानंतर
ती त्वरित दुरुस्त करणे गरजेचे होते.
मात्र, ही मशीन हिमाचल प्रदेशच्या कंपनीची
असल्याने कंपनीकडून त्याची दुरुस्ती करणे अशक्य आहे. त्यामुळे
दुरुस्तीसाठी सुमारे २५ हजार रुपये खर्च आवश्यक असल्याने हा निधी कसा
उपलब्ध करावा हे संकट सध्या प्रशासनासमोर आहे.
वर्षभरापूर्वी ही मशीन आणण्यात आली होती.
सुमारे २ लाख २५ हजार रुपये किमतीची ही मशीन वर्षभरातच बिघडली आहे. या
मशीनच्या दुरुस्तीसाठी कोटेशन काढण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली
आहे. मात्र, या प्रक्रियेला वेळ जात असल्याने सद्य:स्थितीत मृतदेहांची
हेळसांड होऊ लागली आहे. यामुळे सावंतवाडीतील मृतदेह ओरोसला न्यावे लागत
आहेत.
No comments:
Post a Comment