Monday, June 1, 2015

देवाचा डोंगर

येथे अस्सल ग्रामीण संस्कृती पाहायला मिळते. भाकरी आणि चटणीच्या घासाबरोबर मिळणारे धारोष्ण दूध आणि साथीला भणभणता वारा.. सारेच कसे स्वर्गीय सुखाचा आनंद देणारे. येथील धनगर बांधव शुरवीर आणि काटकही. वाघालाही नमवणारे अन् मी मी म्हणणा-या प्राण्यांना आपलेसे करणारे. डोंगरावरचे शिवस्थान आध्यात्माचा ठेवाच म्हणायला हवा!
dongarपाच मिनिटांत शंभर पावलांमध्ये दोन जिल्ह्यांच्या चार तालुक्यांमधून भ्रमंती सहज शक्य आहे. असे सांगितल्यावर विश्वास ठेवणार नाही. पण तुम्हाला यात कोणतीही अतिशयोक्ती याचे भान देवाच्या डोंगरावर पोहोचल्यावर लक्षात येईल. या स्थानाची तुलना दुस-या कशाशीही नको अगम्य, अविस्मरणीय आणि बरंच काही येथेच मिळविता येते, अनुभवता येते.. ढगांचे नृत्य, भणभणता वारा याचि देही याचि डोळा झेलावा मग मन पाखरू कसे होते.
भूतकाळ, वर्तमान सारं कधी विसरलो हे समजतही नाही. या स्थानावर सारं काही भरभरून घ्यावं. मस्तवाल वारा, नाक-कान गच्च करतो. धुक्याचे लोट अंगाखांद्यावर खेळू लागतात. जंगली प्राणी डोळय़ांसमोर मुक्तपणे हिंडत असतात. जैवविविधता तर येथे विपुल आहे. विशेष म्हणजे शहरी वस्तीत नेहमी गुणगुणत असणारी मच्छर कडीकुलपात राहणा-यांनाही अस्वस्थ करते. पण या भागात याचे नामोनिशान नाही.
येथे आकाशातील चांदणे न्याहाळात बसावे, पूर्ण आकाश अंगावर घेऊन झोपून जावे. तुम्हाला गंमत वाटेल पण दम्याचा कुणी रुग्ण असेल त्याने या चांदण्यात शेळया-मेंढय़ांच्या सहवासात झोप घ्यावी. दमा कुठच्या कुठे नाहीसा होतो. यामुळेच की, काय शेळया-मेंढयासोबत वावरणा-या या भागातील बांधवाच्या दिशेला ‘दमा’ फिरकतही नाही.  जगणं कसं असतं आणि असलेल्या सुविधांमधून आनंद कसा घ्यायचा हे येथे आल्यावर समजते.
डोंगरद-यात राहणारे धनगर बांधवांचे समृद्ध जग आणि सर्व सुविधा असूनही चिंतेच्या आठया डोक्यावर घेऊन वावरणारे आपले जग यात मग जमीन अस्मान दिसू लागते. हे स्थान आहे दापोलीच्या जामगे गावानजीकचे. येथे अस्सल कोकणाचे आदरातिथ्य धनगर बांधवांमध्ये न्याहाळता येते.
सूर्योदय आणि सूर्यास्त याच डोंगरावरून पाहावा म्हणजे स्वर्गीय आनंदाची पर्वणीच अनुभवता येते. आध्यात्म आणि पर्यटन याची सांगड येथे जीवाभावाने सांधली गेली आहे. देवाच्या डोंगरावरच्या देव टेंबीवर शिवाचे मंदिर आहे.
devदगडी बांधकामात साकारलेले मंदिर शिवकालात तानाजी मालुसरेंनी बांधले असावे असे काही उल्लेख सापडतात. सुमारे ५०० एकर क्षेत्रावर असलेली ही टेकडी रायगड, रत्नागिरी जिल्हयाच्या सीमेवर आहे. येथे मंडणगड, खेड, दापोली आणि रायगडमधील महाड तालुक्याची सीमा हद्द पोहोचते आणि या सर्व हद्दींचा केंद्रबिंदू शिवमंदिर आहे. डोंगर परिसरात धनगर बांधवांची मोठी वस्ती आहे. वस्ती जवळजवळ असली तरी दिशा जशा बदलतात तसे प्रत्येक वस्तीचे तालुके बदलून गेले आहेत.
यानुसार धनगर बांधवांच्या रेशनकार्डवर नोंद पाहायला मिळते. येथे मंदाताई भेटली. मंदाताईंचे वय ५३ र्वष. वाघालाही न घाबरणा-या धनगर वस्तीतील हे एक व्यक्तीमत्त्व. प्रेमाचा मूर्तिमंत झराच जणू.. मंदाताईचे माहेर आणि सासर येथीलच दृष्टिपथात असणारं घर. पण प्रशासकीयदृष्टया तिचे सासर, माहेर दोन तालुक्यात विभागते. मंदाताईने दिलेल्या माहितीनंतर असे लक्षात येते की, तिचे माहेर मंडणगड तालुक्यात, सासर खेडमध्ये तर म्हशींचा गोठा दापोलीत आणि शेती महाडमध्ये. या सर्व प्रशासकीय सीमा हद्द असल्या तरी येथे पोहोचल्यावर मात्र या सर्व हद्दी विसरायला होतात.
येथील धनगर वस्तीत गोकुळ नेहमीच फुललेले. दह्या-दुधांचे रांजण नेहमीच सर्वासाठी खुले ठेवलेले. वस्ती शे-पाचशे जणांचीच. २०-२५ घरांचा पुंजका असल्याप्रमाणे प्रत्येक हद्दीत विसावलेली. मळकटलेली, कळकटलेली घरे. मात्र आतली माणसं ओतप्रोत प्रेम करणारी. अस्सल तुपाचे भोजन जेवायचे तर याच वस्तीवर पोहोचायला हवे.
चटणी-भाकरीची लज्जत भणभणत्या वा-यात चाखायला हवी. धारोष्ण दूध कितीही प्यावे.. पाहुण्यांच्या सुखासाठी आपल्या झोळीत किती आहे याची तमा न बाळगणारे व्यक्तिमत्त्व येथेच पाहायला मिळतात. या वस्तींमध्ये दिसतात अवाढव्य दगडी जाती. ज्याच्यावर आजही भात भरडले जाते. अस्सल ग्रामीण संस्कृतीचे अनेक पैलू येथे पाहायला मिळतात.
देवाच्या डोंगरावर पोहोचायचे तर दापोलीतून जामदे वाडीमार्गे रस्ता आहे. तुळशी गावातून पायवाट निघतात पण धनगर बांधवांशिवाय सामान्य माणूस त्या वाटेने जाऊ शकणार नाही. गेल्या काही वर्षाच्या पाठपुराव्यानंतर या वस्तीपर्यंत आता बारमाही रस्ता पोहोचला आहे. यामुळे देवाच्या डोंगरावर थेट गाडीने पोहोचता येते. रस्ता जेथे संपतो तेथून ५०० मीटपर्यंत ३९८ पाय-या आहेत. या पाय-या चढल्या की दगडी बांधकामात साकारलेल्या शिवमंदिराच्या प्रांगणात पोहोचतो. हे शिवलिंगाचे जागृत देवस्थान म्हणून
प्रसिद्ध आहे.
fortपाऊस लवकर येणार की उशिरा या शिवमंदिरातून पाहिले जाते. मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयात शिवमंदिरात शिवलिंगाच्या गाभा-यात जलाभिषेक केला जातो. शिवलिंग भरले जाते. हे भरताना किती कुंभ पाणी लागले यावर यावर्षीचा पावसाळा कसा येणार हे सांगितले जाते आणि अगदी तसेच घडत आले आहे, असे येथील बांधव सांगतात. पंचक्रोशीत शिवाच्या जलाभिषेकाबाबत मे महिन्यात उत्सुकता असते. डोंगरावर होळी उत्सवही मोठा होतो. देवाच्या डोंगरावर होळी पेटली की मग पंचक्रोशीतील होळी धडधडू लागतात.
विशेष नवरात्रोत्सवात येथे पोहोचायला हवे. प्रत्येकाच्या घरात तुपात केलेल्या पदार्थाचे रानमेव्याचे ताट तुमच्यासाठी हजर असते. या डोंगरावर पोहोचल्यावर येणारा अनुभव आणि मिळणारा आत्मविश्वास.. हे सारे येथे पोहोचल्यानंतरच समजून घेता येईल.
१९७२ नंतर देवाच्या डोंगरावरील झरे अचानक आटले तेव्हापासून या भागाची दुर्दैवी बाजू समोर आली.
जस-जसा वैशाख वणवा सुरू होतो.तसे देवाच्या डोंगरावर झरे पेटू लागतात. येथील वस्तीची मग पाण्यासाठी मैलोन् मैल पायपीट सुरू होते. देवाच्या डोंगरावर नळपाणी योजना होईल, असे सांगण्यात आले होते. गेले २० ते २५ वर्षे नळपाणी योजनेत आश्वासने दिली जातात. नळपाणी योजना कधी होणार. आमच्या डोक्यावरचा हंडा उतरणार कधी निदान आमच्या नशिबात जे आहे ते मुलांच्या नशिबी येऊ नये. अस मंदाताई सांगतात.
काळजाला हात घालणारे प्रेम
त्या दिवशी संध्याकाळी देवाच्या डोंगरावर जेव्हा पोहोचलो तेव्हा योगायोगानेच मंदाताईंची भेट झाली. कष्टाचा कुठेही बाऊ नाही, निखळ हास्यांनी त्यांनी आमचे स्वागत केले. त्यांची अदरातिथ्यासाठी पार घालमेल उडाली. सुनेला त्यांनी चहा आणायला सांगितला. आम्ही चहा पीत नाही, असे सांगताच ती अवघडली. पावणं चटणी-भाकरीला तरी नाय म्हणू नका..  मलाही हे त्यांचं हे प्रेम झेपेनासे झाले होते. घाबरतच आमच्या मित्राने मंदाताईंना सांगितले. हे कांदा पण खात नाहीत..
मंदाताई क्षणभर आमच्याकडे बघतच राहिली. दुस-या क्षणी त्या तडक घराबाहेर पडल्या. अंगणातूनच त्यांनी चंपे ऽऽ अशी साद घातली, आम्ही बघतच राहिलो. आता आणखी काय   आम्ही एकमेकांकडे प्रश्नांकित नजरेने पाहिले. दोन-तीन मिनिटे स्तब्धतेतच गेली.
मंदाताईंच्या हाकावर हाका सुरू होत्या. तिच्या हाकेबरोबर काही क्षणात गळयातील घाटीची कू ण.. कूण.. (छोटी घंटा) कानावर येऊ लागली होती. तिच्या हाकेबरोबर चरायला गेलेली चंपा ही म्हैस हुंकार देत अंगणात हजर झाली होती.
हा प्रसंगच एखाद्या स्वप्नात असल्याप्रमाणे ..
मंदाताईंनी तिच्या मस्तकावर हात फिरवत ‘अगं पाहुणे आलेत, अन् चहा बी पिणात बघं.. म्हणून तुला साद घातली.. असं सांगतचं तिने खुंटावरच्या दाव्याने तिला बांधले सुद्धा! लगबगीने घरात गेली.
लोटा आणला आणि कासेवर पाणी मारून कास धुतानाच शेजारी आई आल्याचे पाहून झोकांडया देणा-या चंपाच्या रेडूकुला तिने  मोकळे केले. पुढच्या काही सेकंदात तिने धारोष्ण दूध काढून दूध भरल्या हातांनीच आमच्यासमोर लोटा  धरला. बेटा याला न्हाय म्हणायच न्हाय.. ती हसतच म्हणाली..
माझ्या डोळयात तिच्या या मायेने अश्रू भरले होते. अनोळखी माणसावर एवढा जिव्हाळा.. काळजाला थेट हात घालणारा.. पुढचा प्रसंग माझ्या दृष्टीने अवघडल्यासारखाच होता. आपुलकी आणि माया याचा एक वेगळाच अनुभव मला देवाच्या डोंगराने दिला होता..

problemडोंगर देवाचा की समस्यांचा
देवाच्या डोंगरावर सर्वाधिक पाऊस पडूनसुद्धा पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने निसर्गाचे पाणी क्षणार्धात समुद्राकडे वाहून जाते व हिवाळा संपला की देवाच्या डोंगरावरील भटक्या धनगर समाजाची पाण्यासाठी भटकंती सुरू होते.
‘तीच माणसे, त्याच समस्या, दरवर्षी पाण्यासाठी मरणयातना’, असे दुर्दैवी जगणे त्यांच्या नशिबी आले आहे. दोन जिल्ह्याच्या सीमावादात अडकलेल्या देवाचा डोंगरावरील पाणी समस्या सोडवण्यासाठी चार वाडय़ांचे मनोमीलन झाले. नळपाणी योजना राबवण्याचा ठराव झाला. मात्र, चार र्वष होऊन गेली, तरीही नळपाणी योजनेचे घोडे कागदावर अडले आहे.
येथील धनगर समाज शिवाजी महाराजांच्या काळात उदरनिर्वाहासाठी भटकंती करत कोकणात आला. कोकणात भटकंती करताना एखाद्या सुरक्षित ठिकाणी वस्ती करून राहू लागला. देवाच्या डोंगरावरील हा समाजसुद्धा भटकंती करत गाई- मेंढया घेऊन देवाच्या डोंगरावर विसावला.
आज या समाजाच्या कित्येक पिढया कोकणात होऊन गेल्या, तरीदेखील आजही त्यांच्या नशिबी उपेक्षित जगणे आले आहे. डोंगरावर स्वयंभू शंकराचे मंदिर आहे. या डोंगरावरून देवाचा डोंगर हे नाव प्रचलित झाले. देवाच्या डोंगरावर राहणा-या धनगर समाजाची ही अकरावी पिढी आहे.
शासन दरबारी देवाच्या डोंगराची ओळख झाल्यावर अलीकडे काही सुधारणा झाल्या आहेत. पर्यटनाच्या आराखडयातही त्याला स्थान मिळाले आहे.  देवाच्या डोंगरावरील चार वाडय़ांकरिता खेड पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद मराठी शाळा सुरू करण्यात आली आहे.
तुळशीवाडी, खेड तालुका, देवाचा डोंगर ही शाळा आता आठवीपर्यंत झाली आहे. परंतु, आठवीनंतर पायपीट करून जामगेला जावे लागते. दररोज १४ किलोमीटरची पायपीट नशिबी येते. त्यामुळे काही मुलगे-मुली देवाच्या डोंगरावरील शिक्षण संपले की शाळा सोडतात.
देवाच्या डोंगरावर एखादा माणूस आजारी पडला किंवा आजाराची साथ पसरली तर दवाखाना नाही, डॉक्टर नाहीत, देवाच्या डोंगरावर आरोग्य विभागाचे कर्मचारी फिरकतसुद्धा नाहीत. त्यामुळे, आजारी पडलेल्या माणसाला दापोली, खेड किंवा महाडशिवाय पर्याय नाही. रात्री-अपरात्री कोणती दुर्घटना घडल्यास कोणतेही वाहन नाही.
देवाच्या डोंगरावर लाईट आहे. परंतु, होल्टेज नसते. विजेचे दिवे होल्टेजअभावी लुकलुकत मंद प्रकाश देतात. ब-याचदा, आठ आठ दिवस वीज नसते. महावितरणचे कर्मचारी इकडे फिरकतसुद्धा नाहीत.
रोटी-बेटी व्यवहार रखडले
देवाच्या डोंगरावरील धनगर समाजाचे कुलदैवत सातारा जिल्ह्यात आहे. जत्रेला जाण्याची प्रथा कायम आहे. जुन्या रितीरिवाजाप्रमाणे लग्न करण्याची प्रथा धनगर समाजाची आहे. पाणीटंचाईमुळे धनगर समाज रोटी-बेटी व्यवहार करण्यास नाखूश असल्याने सातारा-सोलापूर-सांगली-नगर जिल्ह्यात त्यांना रोटी-बेटी व्यवहार करावा लागतो.
योजनेचे घोडे अडलेले
देवाच्या डोंगरावरील चारही वाडय़ांसाठी भोळवली धरणातून पाणी योजना राबवण्याचा निर्णय झाला. दापोली-मंडणगड पंचायत समिती वर्षापूर्वी संयुक्त पाहणी केली होती. भोळवली धरणातून पाणी उचलून नळपाणी योजना राबवण्याचे ठरले. चार वर्ष होऊन गेली, तरीही नळपाणी योजनेचे घोडे अजून कागदावरच असल्याचे दिसून येते. देवाच्या डोंगरावर आजही पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो. देवाच्या डोंगरावर राजकीय पुढा-यांचा रहिवास केवळ निवडणुकीपुरताच असतो.

No comments:

Post a Comment