कोकणात आजपासून शिमगोत्सवाला प्रारंभ
कोकणात आजपासून शिमगोत्सवाला सुरुवात होणार असून, पारंपरिक पद्धतीने सर्वच ठिकाणी होळीचे पूजन केले जाणार आहे.

सुमारे १५ दिवस चालणा-या या सणात होळी,
रंगपंचमी आदी विविध उत्सव साजरे केले जाणार आहेत. येथील विविध गावांमध्ये
होळीच्या पहिल्या दिवशी शेवराचे झाड तोडून त्याची होळी उभी केली जाते.
या होळीची पुढील ८ दिवस पूजा, आरती करून
पौर्णिमेला पेटवण्यात येते. या उत्सवात होळी पेटवण्यासाठी लहानांपासून
मोठय़ांपर्यंत सर्वाचा उत्साह दांडगा असतो. आपापसातील भांडण – तंटे मिटवून
या सणात ग्रामस्थ एकत्र येत असतात.
होळी पेटवत असताना मारण्यात येणा-या बोंबा
किंवा फाका यांच्यामध्ये वैविध्य असते. या उत्सवात विविध गावांमधील खेळे
हे देखील प्रमुख आकर्षण असते. या खेळयासोबत गावागावातील फिरणारा संकासूर
लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वाचे मनोरंजन करतो.
या कालावधीतच उन्हाचा तडाखा वाढत असताना
देखील प्रथा, परंपरा जपण्यासाठी गावागावातील खेळे अनवाणी पायाने फिरत
असतात. होमात नवीन जोडप्यांनी नारळ टाकून पुढील संसारासाठी आशीर्वाद
घेण्याची परंपरा आहे.
शिमगोत्सवातील पुढचा टप्पा म्हणजे सहाण
भरण्याचा कार्यक्रम. गावातील ग्रामदेवतांच्या पालख्या सहाणेवर आणल्या
जातात. तेथे ग्रामस्थ त्या देवतांचे दर्शन घेतात. दन, लाट फिरवणे आदी विविध
परंपरा यावेळी राबवल्या जातात.
No comments:
Post a Comment